कोरोनाच्या नावाखाली एका डॉक्टरने 125 रुग्णांची किडनीसाठी हत्या केल्याची बातमी खोटी. वाचा सत्य

Coronavirus False

दिल्लीत एका डॉक्टरने 125 जणांना बळजबरी कोविड-19 पॉझिटिव्ह दाखवून हत्या केली आणि त्यांची किडनी चोरली, अशी बातमी व्हायरल होत आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कळाले की, त्याने रुग्णांचे मृतदेह मगरीला खाऊ घातले, असाही व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता ही माहिती चुकीची असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअप हेल्पलाईनवर सदरील मेसेज पाठवला. यामध्ये टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा स्क्रीनशॉटसह लिहिलेले आहे की, किडनी चोरण्यासाठी 125 जणांची कोरोनाच्या नावाखाली हत्या करणाऱ्या एका डॉक्टरला दिल्ली पोलिसांनी अटक केली. या डॉक्टरने रुग्णांचे मृतदेह मगरींना खाऊ घालून विल्हेवाट लावल्याचे समोर आले.

दुसऱ्या एका मेसेजमध्ये म्हटले की, देवेंद्र शर्मा हा डॉक्टर सामान्य रुग्णांना कोविड पॉझिटिव्ह दाखवून त्यांची किडनी चोरत असे.

मग खरं काय आहे?

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हायरल मेसेजमध्ये टाईम्स ऑफ इंडियाच्या ज्या बातमीचा स्क्रीनशॉट आहे, ती बातमी शोधली. या बातमीमध्ये कुठेही कोरोना रुग्णांची हत्या झाल्याचे म्हटलेले नाही.

या बातमीनुसार, दिल्ली पोलिसांनी डॉ. देवेंद्र शर्माला 30 जुलै रोजी दिल्लीच्या बापरोला भागातून अटक केली होती. त्याने सुमारे 100 जाणांची हत्या आणि 125 अवैध किडनी ट्रान्सप्लँट केले होते. या प्रकरणी तो 2004 पासून जयपूर जेलमध्ये होता. जानेवारी 2020 मध्ये तो पॅरोलवर बाहेर आला आणि फरार झाला. तो दिल्लीत एका व्यापाऱ्याला गंडविण्याचा तयार असतानाच पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

कोण होता डॉ. देवेंद्र शर्मा?

नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार, देवेंद्र शर्मा याने 1984 साली राजस्थानमध्ये आयुर्वेदिक दवाखाना सुरू केला होता. गॅस एजन्सी मिळवण्यासाठी त्याने 1994 साली एका कंपनीत 11 लाख रुपये गुंतविले होते. परंतु, ती कंपनी फ्रॉड निघाली आणि त्याचे पैसे बुडाले. त्यामुळे त्याने बनावट गॅस एजन्सी सुरू केली. एक गँग तयार करून तो एलपीजी सिलेंडरचे ट्रक लुटू लागला. ट्रकचालकाची हत्या करून तो ट्रकची विल्हेवाट लावायचा.

त्यानंतर तो किडनी तस्करी करू लागला. 7 लाख रुपये प्रति ट्रान्सप्लँटसह त्याने 125 अवैध किडनी ट्रान्सप्लँट केले. त्याचबरोबर टॅक्सीचाकांची हत्या करून तो टॅक्सीची विक्रीदेखील करायचा. नाल्यातील मगरींसाठी मृतदेह फेकून द्यायचा. अशा तऱ्हेने त्याने शंभरपेक्षा जास्त खून केले होते. 2004 साली त्याला अटक करून जयपूर जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली. 16 वर्षांच्या शिक्षेनंतर यावर्षी जानेवारी महिन्यात 20 दिवसांच्या पॅरोलवर त्याची सुटका झाली होती.

मूळ बातमी येथे वाचा – नवभारत टाईम्सअर्काइव्ह

कोरोनाशी काही संबंध नाही

या देवेंद्र शर्माच्या अटकेची बातमी कोरोनाशी जोडून शेयर होऊ लागल्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने दिल्लीच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त राकेश पावरिया यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी माहिती दिली की, डॉ. देवेंद्र शर्माच्या गुन्ह्यांचा कोरोनाशी काही संबंध नाही. कोरोना काळात त्याने एकाही रुग्णावर उपचार केलेले नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये.

निष्कर्ष

100 पेक्षा जास्त खून करणाऱ्या डॉ. देवेंद्र शर्माने कोरोनाच्या नावाखाली किडनी तस्करी केल्याचे वृत्त खोटे आहे. जुन्या प्रकरणाचा कोरोनाशी संबंध जोडून अफवा पसरविली जात आहे. डॉ. देवेंद्र शर्मा खून केल्याप्रकरणी 2004 पासून जेलमध्ये होता. दरम्यान, पॅरोल तोडून फरार झाल्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली. त्याचा आणि कोरोनाची काही संबंध नाही.

Avatar

Title:कोरोनाच्या नावाखाली एका डॉक्टरने 125 रुग्णांची किडनीसाठी हत्या केल्याची बातमी खोटी. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False