कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रोनाल्डोने आपले हॉटेल रुग्णालयात रुपांतरीत केलेले नाही. वाचा सत्य

Coronavirus False आंतरराष्ट्रीय वैद्यकीय

चीन पाठोपाठ संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव पसरला असून जग एका असाधारण महामारीला सामोरे जात आहे. विशेषतः युरोपीय देशांमध्ये या विषाणूची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. सरकारी यंत्रणांबरोबरच आता दानशूरांचे हातदेखील मदतीसाठी पुढे येत आहेत. अशातच सोशल मीडियावर वावड्या उठल्या की, प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने पुढाकार घेत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी त्याचे आलिशान हॉटेलच रुग्णालयात रुपांतरित केले. एवढेच नाही तर तेथील डॉक्टरांना तोच पगार देणार आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता ही फेक न्यूज असल्याचे कळाले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक फेसबुक फेसबुक

तथ्य पडताळणी

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता वैद्यकीय उपचारसाधनांची कमरता जाणवू लागली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आणि दानशूर पुढे येऊन मदत करीत आहेत. रोनाल्डोनेदेखील असे केले का याचा तपास घेतला असता ही माहिती खोटी असल्याचे निदर्शनास आले.

इंटरनेटवर यासंबंधी माहिती घेतल्यावर कळाले की, रोनाल्डोच्या मालकीचे पेस्टानो सीआर-7 हॉटेल आहे. पोर्तुगालमधील लिस्बन आणि फुंचाल या दोन शहरात हे आलिशान हॉटेल आहे. सोशल मीडियावर हॉटेलसंबंधी दावे व्हायरल झाल्यानंतर हॉटेल प्रशासनाने या वृत्तास नकार दिला.

‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, स्पेनमधील मार्का नावाच्या वृत्तपत्राने सर्वप्रथम ही बातमी दिली होती की, रोनाल्डोने दोन हॉटेलपैकी एकाला कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर जगभरात ही बातमी पसरताच रोनाल्डोच्या मोठ्या मनाचे कौतुक होऊ लागले. आपापल्या देशातील श्रीमंतांना रोनाल्डोचा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात येऊ लागले. 

परंतु, जेव्हा हॉटेल प्रशासनाला यासंबंधी विचारले असता त्यांनी असा काही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. या सगळ्या खोट्या बातम्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्ही 

‘द सन’ वेबसाईटवरील बातमीनुसार, पेस्टाना सीआर-7 हॉटेलच्या प्रवक्त्याने डच वाहिनी RTL Nieuws ला माहिती दिली की, आमचे हॉटेल आहे. ते रुग्णालयात रुपांतरित केले जाणार नाही. नेहमीप्रमाणे हे हॉटेलच राहणार नाही. सोशल मीडियावर पसरविली जाणारी बातमी खोटी आहे.

रोनाल्डोनेदेखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अशी काही माहिती दिलेली नाही. यावरून स्पष्ट होते की, एका स्पॅनिश पेपरच्या चुकीच्या बातमीवरून हा सगळा गदारोळ झाला.

मूळ बातमी येथे वाचा – द सन

खुद्द रोनाल्डोच्या टीममधील एका सहकाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. त्यामुळे टीममधील प्रत्येकाची चाचणी करण्यात आली त्यामध्ये रोनाल्डोला संक्रमण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. तरीदेखील रोनाल्डोने घरात अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याने ट्विटरवर कोरोनाशी लढा देताना धैर्य बाळगण्याचा संदेश दिला. तो म्हणाला की, जग सध्या मोठ्या संकटातून जात आहे. अशावेळी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि मी हे आवाहन एक फुटबॉल खेळाडू म्हणून नाही तर एक माणूस, एक बाप आणि एक मुलगा म्हणून करीत आहे. आपण सर्वांनी जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आपापल्या देशातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

निष्कर्ष

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी क्रिस्टियानो रोनाल्डो याने त्याच्या आलिशान हॉटेलला रुग्णालयात रुपांतरित करण्याचा निर्णय घेतलेला नाही. ही एक खोटी बातमी आहे. पेस्टाना सीआर-7 हॉटेल प्रशासनाने हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर केला जाणारा दावा खोटा आहे.

Avatar

Title:कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रोनाल्डोने आपले हॉटेल रुग्णालयात रुपांतरीत केलेले नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False