
डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपुष्टात आला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जो बायडन यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु, ट्रम्प यांना हा पराभव मान्य नाही.
पदावरून जाताना परंपरेप्रमाणे ट्रम्प यांनी नवे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना पत्र लिहिणे अपेक्षित आहे. या कथित पत्राचा फोटो म्हणून काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. यामध्ये ट्रम्प यांनी बायडन यांना केवळ एकाच ओळीचे पत्र लिहिलेले दिसते. ‘जो, तुम्हाला माहित आहे की, मीच जिंकलो’ असे यात म्हटलेले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
काय आहे दावा
मावळेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नव्या राष्ट्राध्यक्षांना लिहिलेल्या पत्राचा फोटो म्हणून खालील फोटो शेअर होत आहे. यामध्ये म्हटले की, ‘Joe, you know I won.’

तथ्य पडताळणी
सर्वप्रथम डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांना पत्र लिहिले आहे का हे शोधले. त्यानुसार, कळाले की ट्रम्प यांनी एक पत्र लिहिलेले आहे. माध्यमांशी बोलताना बायडन यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी त्यांच्यासाठी एक पत्र लिहिलेले आहे. परंतु, त्या पत्रातील मजकूर त्यांनी सांगितला नाही.
‘ते पत्र खासगी असल्यामुळे त्याचा मी येथे उलगडा करू शकत नाही,’ असे ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी खरंच पत्रात काय लिहिले हे कळण्यास आता दुसरा मार्ग नाही.
त्यामुळे इंटरनेटवर फिरत असलेल्या पत्राची अधिकृता तपासणे गरजेचे आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिलेल्या अधिकृत पत्राशी या व्हायरल पत्राची तुलना करून पाहू.
खाली दोन्ही पत्रांमध्ये फरक स्पष्ट दिसतो की, अधिकृत पत्रामध्ये मानकचिन्ह वेगळे आहे. त्याला प्रेसिडेंशियल सील म्हणतात. ट्रम्प यांच्या पत्रावर ही सील असते. तसेच ट्रम्प यांची स्वाक्षरीसुद्धा मॅच होत नाही.

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेले पत्र बनावट असून तो केवळ एक विनोदाचा भाग आहे. ट्रम्प यांचे मूळ पत्र बायडन यांच्याकडे असून, त्यातील मजकूर त्यांनी सांगितलेला नाही.

Title:डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांना ‘मीच जिंकलो’ असे पत्र लिहिले का?
Fact Check By: Milina PatilResult: False
