FACT CHECK: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ‘पठाण का बच्चा’ म्हणाले का?

False राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ‘मैं पठाण का बच्चा हूं’ असे म्हणतानाचा एक व्हिडियो सोशल मीडियावर पसरविला जात आहे. यावरून विरोधकांकडून मोदींवर टीका केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंदर्भात सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काईव्ह

सोशल मीडियावरील 10 सेंकदाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मैं पठाण का बच्चा हूं, मैं सच्चा बोलता हूं, सच्चा करता हूं’ असे म्हणताना दिसतात. युजरने व्हिडिओला कॅप्शन दिली की, भक्त म्हणतात, मोदीला हिंदुत्व पाहुन मतदान करा. पण मोदी तर स्वतःला पठाण का बच्चा म्हणतात.

तथ्य पडताळणी

या पोस्टसंदर्भात गुगलवर शोध घेतला असता, पंतप्रधानांच्या राजस्थानमधील टोंक येथील भाषणाचा एक व्हिडियो समोर आला. भारतीय जनता पार्टीच्या युट्युब चॅनलवर 23 फेब्रुवारी 2019 रोजी हा अपलोड करण्यात आला होता. मूळ व्हिडिओ 1 तास 21 मिनीट 19 सेकंदाचा आहे.

संपूर्ण भाषण ऐकल्यावर कळते की, इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यावर मोदींनी प्रोटोकॉल म्हणून त्यांना फोन केला होता. तेव्हा दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मोदी त्यांना म्हणाले होते की, भारत और पाकिस्तान मिलके हम गरीबी के खिलाफ लढेंगे, अशिक्षा के खिलाफ लढें, अश्रद्धा के खिलाफ लढेंगे.

यावर उत्तर देताना इम्रान खान मोदींना म्हणाले की, “मैं पठाण का बच्चा हू, मैं सच्चा बोलता हूं, सच्चा करता हूं”

59.45 मिनीटांपासून तुम्ही हा भाग ऐकू शकता. थोडक्यात काय तर, इम्रान खान यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणाबद्दल नरेंद्र मोदी आपल्या भाषणात सांगत होते. मैं पठाण का बच्चा हूं, असे इम्रान खान म्हणाल्याचे त्यांनी सांगितले.

फेसबुकवरील फक्त 10 सेंकदाची क्लिप मूळ भाषणातून वेगळी करून चुकीच्या संदर्भाने (Out of Context) प्रसारित केली जात आहे.

निष्कर्ष :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला ‘मैं पठाण का बच्चा हूं’ असे म्हटलेले नाही. इम्रान खान यांनी तसे म्हटल्याचे ते सांगत होते. मूळ भाषणाच्या व्हिडियोतून 10 सेंकदाची क्लिप वेगळी करून चुकीच्या संदर्भाने पसरविली जात आहे. म्हणून मोदींविषयी केला जाणारा दावा असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ‘पठाण का बच्चा’ म्हणाले का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False