पुलवामा हल्ल्याचा म्हणून 12 वर्षांपूर्वीचा जूना व्हिडियो केला जातोय शेयर. वाचा सत्य

False सामाजिक

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडियो म्हणून एक क्लिप सोशल मीडियावर फिरवली जात आहे. यामध्ये रस्त्याने जाणाऱ्या ताफ्यावर एक आत्मघाती कार बॉम्ब स्फोट घडवून आणताना दिसते. हा व्हिडियो 14 फेब्रुवारी 2019 रोजीच्या पुलवामा हल्ल्याचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ व्हिडियो पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

पुलवामा हल्ल्याचे सांगून यापूर्वी अनेक असंबंधित व्हिडियो आणि फोटो व्हायरल झालेले असल्यामुळे सर्वप्रथम हा व्हिडियो नेमका कुठला आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यासाठी व्हिडियोतील की-फ्रेम्सची निवड करून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडियो तर 12 वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

टॉम जोन्स नावाच्या युट्यूब अकाउंटवर सर्वात आधी म्हणजे 22 ऑक्टोबर 2007 रोजी हा व्हिडियो आढळला. Big Roadside Bomb on American Convoy असे या व्हिडियोचे नाव आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

इतर अनेक युट्यूब अकाउंटवरूनदेखील हा व्हिडियो वेगवेगळ्या नावाने शेयर करण्यात आलेला आहे. जसे की येथे Truck Bomb म्हणून, तर येथे इराकमधील ताजी मिलिटरी बेस बाहेर 2 सप्टेंबर 2007 रोजी झालेला कार स्फोट म्हणून हा व्हडियो शेयर केलेला आहे. तसेच व्हिडियोवर देखील 2 सप्टेंबर 2007 दुपारी सुमारे चारच्या सुमारास हा स्फोट घडल्याचा टाईम स्टॅम्प आहे.

याबाबत शोध घेतला असता मॅकक्लॅची न्यूजपेपर नावाच्या वेबसाईटने इराकमध्ये 2007 साली झालेल्या बॉम्ब स्फोटांची यादी दिलेली आहे. त्यानुसार, 2 सप्टेंबर 2007 रोजी इराकी सैनिकांच्या ताजी येथील बेस बाहेर एका आत्मघाती कारबॉम्ब हल्ला झाला होता. हा हल्ला दुपारी चार वाजता झाल्याचे बातमीत म्हटले आहे. यामध्ये 2 जवानांचा मृत्यू तर 8 जण जखमी झाले होते. परंतु, याबाबत दुसरीकडे अधिकृत असे वृत्त आढळले नाही.

निष्कर्ष

एवढे तर स्पष्ट आहे की, हा व्हिडियो गेल्या वर्षीच्या पुलवामा हल्ल्याचा नाही. हा व्हिडियो सुमारे 12 वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. आपल्याकडेदेखील असेच शंकास्पद व्हिडियो असतील तर ते फॅक्ट क्रेसेंडोला व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवा. आम्ही त्याची सत्य पडताळणी करू.

Avatar

Title:पुलवामा हल्ल्याचा म्हणून 12 वर्षांपूर्वीचा जूना व्हिडियो केला जातोय शेयर. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False