या मुस्लिम मुलीच्या नावे खोटा मेसेज व्हायरल. तिने मुस्लिमांसाठी सबसिडी मागितलेली नाही. वाचा सत्य

False राजकीय

शबनम अंसारी नावाच्या एका कथित मुस्लिम महिलेचा फोटो शेयर करून तिच्या नावे एक खोडकर मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये ही महिला मुस्लिम समुदायासाठी मोदी-योगी सरकार काम करत नसल्याची तक्रार करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच तिला पाच मुले व चार मुली असल्याचे सांगत ती सरकारकडे सबसिडी देण्याची मागणी करीत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता तो खोटा आढळला. 

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये एका मुस्लिम महिलेचा फोटो दिलेला आहे. यामध्ये ती ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिसते. पोस्टमध्ये तिचे नाव शबनम अंसारी म्हटलेले आहे. सोबत तिचे म्हणने दिले की, “माझे पाचपैकी दोन मुले बेरोजगार आहेत. चारपैकी दोन मुलींना अद्याप निकाह शगुनचे 51 हजार मिळाले नाही. मी गर्भवती असल्यामुळे काम नाही करू शकत. योगी आणि मोदी सरकारने काही काम केलेले नाही. मुस्लिमांना दिली जाणारी सबसिडी आणि वजिफा भारत सरकार कधी वाढवणार?” (मराठी भाषांतर)

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

पोस्टमधील महिलेचा फोटो क्रॉप करून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, पोस्टमधील दावा खोटा आहे. या महिलेचे नाव शबनम अंसारी नाही आणि ती मुस्लिमांसाठी सबसिडी देण्याची मागणीदेखील केली नव्हती.

‘एनडीटीव्ही’ वृत्तवाहिनीवरील वृत्तानुसार, या महिलेचे नाव अमरीन बानो असून, ती उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरातील आहे. 2017 साली तिने तिच्या नवऱ्याला तीन तलाक दिला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती. एएनआयशी बोलताना तिने सांगतिल होते की, तिचा पती तिला खूप मारहाण करायचा, तिला खर्चाला पैसे नाही द्यायचा. अखेर मारहाणीला कंटाळून तिने नवऱ्यालाच तलाक…तलाक…तलाक म्हणत घटस्फोट दिला होता.

‘इंडिया टुडे’ने 4 मे 2017 रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, अमरीन बाने आणि तिच्या बहिणाचा दोन भावांशी 2012 साली विवाह झाला होता. त्यांचे पती त्यांना मारहाण करायचे. 2017 साली अमरीनच्या बहिणीला तिच्या भावाने तीन तलाक दिला होता. त्यानंतर दोन्ही बहिणींनी घर सोडले. अमरीननेसुद्धा तिच्या पतीच्या जाचाला कंटाळून त्यालाच तीन तलाक दिला. 

यावेळी तिने सांगितले होते की, तिचा पती तिला पैसे देत नसे. तिला मारहाण करायचा. त्यामुळे त्याच्याविरोधात तिने पोलिसांत तक्रारसुद्धा दिली होती. जसे मुस्लिम पुरुष तीन तलाक देऊ शकतात तसा मला पण द्यायचा आहे, असे ती म्हणाली होती.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, या मुस्लिम महिलेचे नाव शबनम अंसारी नाही. तसेच तिने मुस्लिम समुदायासाठी सबसिडी किंवा मोदी-योगी सरकारवर टीका केली नव्हती. या महिलेचे नाव अमरीन बानो असून, तिने तिच्या नवऱ्याला तीन तलाक दिल्यामुळे ती चर्चेत आली होती.

Avatar

Title:या मुस्लिम मुलीच्या नावे खोटा मेसेज व्हायरल. तिने मुस्लिमांसाठी सबसिडी मागितलेली नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False