
शहरातील रस्त्यांवर झोपडपट्टी आणि हातगाड्यांचे अतिक्रमण तुम्ही पाहिलेच असेल. परंतु, कधी रेल्वे पटरीवरच झोपड्या आणि फळ दुकाने थाटल्याचे कधी पाहिले आहे का? सोशल मीडियावर रेल्वेपटरीवरील अशीच झोपडपट्टी आणि फळ मार्केटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
यामध्ये झोपडपट्टी आणि फळ मार्केटमधून रेल्वे जाताना दिसते. अतिक्रमणाचा कळस दाखवणारा हा व्हिडिओ बांग्लादेशमधील असल्याचा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा ठरला. हा व्हिडिओ बांग्लादेशचा नसून भारत आणि व्हिएतनाम मधील रेल्वे ल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
फेसबुकवरील व्हायरल व्हिडिओमध्ये तीन क्लिप्स आहेत. पहिल्या क्लिपमध्ये रहिवासी इमारतींमधील अरुंद बोळीतून रेल्वे जाताना दिसते. दुसऱ्या क्लिपमध्ये रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजुने झोपड्या आहेत. रेल्वे आल्यावर लोकं पटरीवरून आपले सामान आत घेतात आणि रेल्वे गेली की परत ठेवतात. तिसऱ्या क्लिपमध्ये रेल्वे पटरीला लागूनच फळ व भाजीपाला विकला जात आहे. रेल्वे जात असताना व्यापारी आपआपले ठेले बाजुला घेतात व निघून गेल्यावर परत पटरीवर लावतात.
कॅप्शनमध्ये दावा केला जात आहे की, “नशीब हे स्थिती भारतातील नाही. हा व्हिडिओ बांग्लादेशचा आहे.”
मूळ व्हिडिओ येथे पाहा – फेसबुक | अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
या तिन्ही व्हिडिओ क्लिप्स नेमक्या कुठल्या आहेत याची तपासणी केली. त्यातून कळाले की, यातील एकही क्लिप बांग्लादेशची नाही.
व्हिडिओ क्लिप क्रमांक 1
0:00 – 0:54 दरम्यान पहिली क्लिप दिसते. यातील किफ्रेम्सला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून युट्यूबवर हा व्हिडिओ आढळला. ‘ऑन डिमाड न्यूज’ने 21 मे 2013 रोजी युट्यूबवर तो शेयर केला होता. बातमीनुसार हाहि जागा व्हिएतनाम येथील हनोइ शहरातील आहे. दिवसातून दोनदा ही रेल्वे या अरुंद बोळीतून.
व्हिडिओ क्लिप क्रमांक 2
0:55 – 2:21 दरम्यान दुसरी क्लिप आहे. गुगल रिव्हर्स इमेज सर्चने कळाले की, हा व्हिडिओ भारतातील आहे. युट्यूबवर गाय शॅचर नामक एका युजरने 31 मार्च 2017 रोजी हा व्हिडिओ अपलोड केला होता. त्याने हा व्हिडिओ कोलकाता येथील म्हटले आहे.
हा व्हिडिओ खरंच तेथील आहे का हे तपासण्यासाठी कीवर्ड्सद्वारे सर्च केले. त्यातून गेटी इमेजस या जगभरातील मीडियाला फोटो पुरवणाऱ्या संस्थेच्या वेबसाईटवर खालील फोटो आढळला. सोबतच्या माहितीनुसार, ही जागा कोलकाता शहरातील चायना बझार झोपडपट्टी आहे. United News of India या न्यूज एजन्सीनेसुद्धा गेल्यावर्षीय या जागेचा आढावा घेतला होता.

Credit – Getty Images
व्हिडिओ क्लिप क्रमांक 3
2:21 – 3:14 दरम्यान तिसरी क्लिप आहे. गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे बीबीसीने 5 एप्रिल 2018 रोजी अपलोड केलेली एक बातमी आढळली. त्यातील माहितीनुसार, हा व्हिडिओ थायलंडमधील मिकलॉन्ग शहरातील मार्केटचा आहे. दिवसातून आठवेळा ही रेल्वे या बाजारातून जाते.
हे ओपन रेल्वे मार्केट जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. अनेक लोक मार्केटमधून रेल्वे जाताना पाहण्यासाठी येथे येतात. या बाजारपेठेचा आढावा CNN आणि The Times of India ने घेतलेला आहे.
व्हायरल व्हिडिओतील रेल्वेवर “SRT 1227” असा क्रमांक आहे. गुगलवर सर्च केल्यावर शटरस्टॉक या फोटो सर्व्हिस वेबसाईटवर याच क्रमांकाच्या रेल्वेचा पुढील फोटो आढळला. कॅप्शनमध्ये हेच म्हटले की, थायलंडमधील मिकलॉन्ग शहरातील ही रेल्वे आहे.

Credit – Shutterstock
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील एकही क्लिप बांग्लादेशमधील रेल्वेची नाही. त्या अनुक्रमे व्हिएतना, भारत आणि थायलंड येथील आहेत. त्यामुळे सदरील दावा खोटा आहे.

Title:झोपडपट्टीतून रेल्वे जाण्याचा तो व्हिडिओ बांग्लादेशचा नाही; तो तर आहे भारताचा
Fact Check By: Milina PatilResult: False
