शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असल्याचा कोर्टाने निर्णय दिलेला नाही; जुनी बातमी व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय

खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार? या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद झाल्यानंतर आयोग आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर एका बातमीचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत की, उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या समर्थनात निर्णय देत जाहीर केले की शिवसेना केवळ उद्धव ठाकरे गटाचा पक्ष आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, जुने आणि असंबंधित स्क्रीनशॉट शेअर करून चुकीची माहिती पसरविली जात आहे. 

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये टीव्ही-9 वृत्तवाहिनीच्या बातमीचे दोन स्क्रीनशॉट दिलेले आहेत. यात दोन विधाने आहेत. 

  1. शिवसेना एकच आहे ती उद्धव ठाकरेंची. कोर्टानं निवडणूक आयोगाला आदेश दिलेत
  2. कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेल्या आदेशामुळे शिंदे गटात खळबळ

मुळ पोस्ट — फेसबुक

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉटमधील बातमी सहा महिन्यांपूर्वीची आहे. 

लोकसत्ताच्या बातमीनुसार निवडणूक आयोगाने शिवसेना या पक्षावर दावा सांगण्यासंदर्भात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला बहुमतासंदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने पक्षाच्या चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय तुर्तास तरी घेऊ नये असे म्हटले होते.

या संदर्भात टीव्ही-9 मराठीने 4 ऑगस्ट 2022 रोजी राज्यसभा सदस्या आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या प्रियंका चतुर्वेदीची मुलाखत घेतली होती. यामध्ये चतुर्वेदी यांनी “शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे गटाचा आहे,” असे म्हटले होते. 

व्हायरल होत असलेले स्क्रीनशॉट याच व्हिडिओमधिल आहेत. 

खालील फोटो पाहिल्यावर कळते की, दोन्ही व्हायरल फोटो सहा महिन्यापूर्वीचे आहेत.

प्रियंका चतुर्वेदी यांनी 30 जानेवारी 2023 रोजी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीला आणखी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली. की, “शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल. निवडणूक आयोगाकडे सर्वाधिक प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केले आहेत. जनता, पक्षाचे कायर्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही ते निवडणूक आयोगासमोर सिद्धही केलं आहे. त्यामुळे संविधानानुसार निर्णय झाला तर हा निर्णय आमच्याच बाजुने लागेल.” 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील बातमी सहा महिन्यापूर्वीची आहे. उच्च न्यायालयाने ‘शिवसेना ही एकच आहे आणि ती उद्धव ठाकरेंची आहे,’ असा निर्णय दिलेला नाही. प्रियंका चतुर्वेदी यांनी असे विधान केले होते. चुकीच्या दाव्यासह फोटो शेअर केला जात आहे.

Avatar

Title:शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असल्याचा कोर्टाने निर्णय दिलेला नाही; जुनी बातमी व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading