देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला फसवे म्हटले का? जुना व्हिडिओ व्हायरल

False राजकीय | Political

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या प्रतियक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते “अर्थसंकल्प” अतिशय फसवा असल्याचे म्हणतात. यावरून दावा केला जात आहे की, फडणवीसांनी मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली.  

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ जुना असून, देवेंद्र फडवणीस या व्हिडिओमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात सादर झालेल्या राज्य अर्थसंकल्पाविषयी बोलत होते. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस पत्रकारांना मुलाखत देताना म्हणतात की, “हा अतिशय फसवा अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महारष्ट्र आणि शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही.” 

दावा केला जात आहे की, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या अर्थसंकल्पाला फसवे म्हटले आहे.

मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम फडणवीसांचा हा व्हिडिओ कधीचा आहे हे तपासण्यासाठी कीवर्ड सर्च केले. त्यातून कळाले हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे. 

न्यूज-18 लोकमतने 11 मार्च 2022 रोजी हा व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले. यानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य अर्थसंकल्प 2022 सादर केला होता. 

या राज्यसंकल्पावर टीका करताना तत्कालिन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “फसवा अर्थसंकल्प” असे म्हटले होते. यातून मराठवाड, विदर्भ, कोकण आणि शेतकऱ्यांसाठी काही तरतूद नसल्याचा त्यांनी आरोप केला होता. 

खालील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बातमी पाहू शकतात.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प मांडल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून टीका, तर सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.”

देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिलेल्या प्रतिक्रियाचा व्हिडिओ खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एक वर्षापूर्वीचा असून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पाला फसवे म्हटले होते. जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

Avatar

Title:देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला फसवे म्हटले का? जुना व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False