
लहान मुलाला पाठीवर घेऊन धोकादायक डोंगरावर चढणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, भारतातील एका खेड्यात गावकऱ्यांना अशा प्रकारे जीव धोक्यात घालून रोज प्रवास करावा लागतो.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता विचारली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारतातील नाही.
काय आहे दावा ?
‘न्यूज-18 लोकमत’ने या व्हिडिओसह बातमी केली की, भारतातील एका गावात नागरिकांना जीव मुठीत धरून रोज धोकादायक प्रवास करावा लागतो. व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या बाळाला पाठीवर घेऊन डोंगर चढत आहे.
व्हिडिओच्या शीर्षकात म्हटले आहे की, “भारतातील असं गाव जिथे, रोजच्या जीवनात नागरिकांना करावा लागतो धोकादायक प्रवास, एकदा हा व्हिडीओच पाहाच.”
मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ चार वर्षांपूर्वीपासून इंटरनेटवर उपलब्ध असून तो भारतातील नाही.
चीनच्या सरकारी वृत्तसेवेच्या फेसबुक पेजवर व्हायरल हाच व्हिडिओ 5 जुलै 2019 रोजी अपलोड करण्यात आला होता. चीनच्या सिचुआन प्रांतातील ‘अतुलीएर’ या गावातील हा व्हिडिओ आहे.
बीबीसीच्या बातमीनुसार, अतुलीएर हे गाव 800 मीटर-उंच टेकडीवर आहे. या भागातील महिला आणि लहान मुलांना रोज चढ-उतार करण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो म्हणून चीन सरकारने या ठिकाणी उंच लोखंडी पायऱ्या बांधल्या.
तसेच स्थानिक दारिद्र्य निर्मूलन मोहीम सुरू करून सुमारे 84 कुटुंबांना नवीन घरात स्थलांतरित करण्यात आले. तरीदेखील अनेक कुटुंबाना अजून घर मिळालेले नाही आणि त्यांचा हा धोकादायक प्रवास आजदेखील सुरूच आहे.

चीन सरकार या ठिकाणी दळणवळणासाठी वाहने आणि गावातील काही भागात विकास करणार आहे. तसेच या ठिकाणी रिसोट उभारण्याचा त्यांची योजना आहे.
‘अतुलीएर’ गावाचा संपूर्ण व्हिडिओ आपण खाली पाहू शकतात.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ भारतातील नसून चीनमधील उंच कड्याचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अतुलीएर’ गावाचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:उंच कड्यावरून रोज प्रवास करावा लागणारे गाव भारतातील नाही; चीनमधील व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: False
