नुकतेच निधन झालेले NCP नेते संजय शिंदे पालघर हत्याकांडातील आरोपी नव्हते. वाचा सत्य

False राजकीय | Political

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक येथील कार्यकर्ते संजय शिंदे यांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. त्यांच्या कारला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, संजय शिंदे पालघर हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी होते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. संजय शिंदे यांचा पालघर प्रकरणाशी दुरान्वयेदेखील संबंध नव्हता.

काय आहे दावा?

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, “पालघरमध्ये साधू मारले गेले त्याचा प्रमुख आरोपी राष्ट्रवादीचा *** संजय शिंदे याच्या गाडीला आग, जिवंत जळला ***. कर्माची फळे.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथमक संजय शिंदे यांच्या निधनाची बातमी तपासली. तेव्हा कळाले की, 15 ऑक्टोबर रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ कारला आग लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. गाडीला सेंट्रल लॉक लागल्यामुळे ते गाडीतून उतरू शकले नाहीत. संजय शिंदे नाशिकच्या साकोर येथील रहिवासी होते. 

मग त्यांचा पालघर हत्याकांडाशी काही संबंध होता?

एप्रिल महिन्यामध्ये पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाला गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची देशभरात चर्चा झाली. तिला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नही झाला. गावात चोर आल्याची अफवा पसरल्यामुळे ही घटना घडल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 22 एप्रिल रोजी ट्विट करून या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 101 जणांची यादीदेखील शेयर केली होती. यादीमध्ये संजय शिंदे यांचे नाव नाही. 

अर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने मग पालघर पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी एस. आय. पाटील यांनी संजय शिंदे यांचा पालघर हत्याकांडाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “सदरील प्रकरणी सुमारे शंभर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गावात अफवा पसरल्याने जमावाकडून ही हत्या झाली होती. त्यामुळे कोण्या एका व्यक्तीला मुख्य आरोपी करण्यात आलेले नाही. तसेच या घटनेमागे सांप्रदायिक किंवा राजकीय हेतू नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडीत संजय शिंदे यांचे नाव या प्रकरणात कधीच घेतलेले नाही. त्याच्या अपघाती मृत्यूचा पालघर प्रकरणाशी संबंध जोडून असत्य माहिती प्रसारित केली जात आहे.”

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे हे पालघर हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी नव्हते. त्यांचा पालघर प्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्यांच्या मृत्यूनंतर चुकीच्या पद्धतीने त्यांने नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे.

Avatar

Title:नुकतेच निधन झालेले NCP नेते संजय शिंदे पालघर हत्याकांडातील आरोपी नव्हते. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False