मुलीच्या पायावर पगडी ठेवणाऱ्या पित्याच्या व्हिडिओसोबत ‘लव्ह जिहाद’चा दावा खोटा

False सामाजिक

मुलीच्या पायावर पगडी ठेवणाऱ्या पित्याचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, मुलीने परधर्मीय मुलाशी लग्न करू नये म्हणून हा बाप विनवणी करीत होता. परंतु, तरी तिने ऐकले नाही आणि या पित्याने आत्महत्या केली. या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’शी जोडले जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता हा दावा असत्य आढळला. सदरील मुलीने तिच्या समाजातील मुलाशी लग्न केलेले आणि तिच्या वडिलांनी आत्महत्या केलेली नाही.

काय आहे दावा?

पोस्टमध्ये शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती मुलीच्या पायावर पगडी ठेवतो. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये एका मृत व्यक्तीचा फोटो दिसतो. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, त्या बापाने मुलगी ऐकत नाही म्हणून पगडी तिच्या पायावर ठेवली. तरीही त्या अवदसाने बापाचं थोडंही ऐकलं नाही. शेवटी तिच्या त्या अभागी बापाने आत्महत्या केली. स्वतःच्या इज्जतीचा आणि कुटुंबाच्या झालेल्या बदनामीला तो बाप कसा सहन करेल.  #लव_जिहाद.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

ही घटना नेमकी कुठली आणि त्यामागचे खरे कारण काय याचा शोध घेऊया. त्यासाठी व्हिडिओतील की-फ्रेम्स आणि कीवर्ड्सने शोध घेतला. त्यातून Royal Raika नावाच्या फेसबुक पेजवरील एक व्हिडिओ सापडला.

नारायण. पी. देवासी नावाच्या व्यक्तीने 3 ऑक्टोबर रोजी लाईव्ह केलेल्या या व्हिडिओमध्ये सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमागची कहाणी सांगितली आहे. या व्हिडिओतील घटना ‘लव्ह जिहाद’ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

“पगडी ठेवणारा पिता आणि त्याची मुलगी हे राजस्थानमधील देवासी समाजातील आहेत. मुलीने त्यांच्याच समाजातील एका मुलाशी लग्न केले होते. या प्रकरणी देवासी समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे न्यायनिवाडा करण्यात आलेला आहे. या घटनेशी लव्ह जिहादचा काही संबंध नाही,” असे हा व्यक्ती सांगतो.

मूळ व्हिडिओ – फेसबुक 

रॉयल रायका हे देवाशी समुदायाशी निगडित फेसबुक पेज आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हे पेज चालवणाऱ्या सुरेश देवासी यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी माहिती दिली की, “सदरील मुलगी तिच्या भावाकडे पुणे येथे राहत होते. तेथेच तिचे समाजातीलच एका मुलाशी प्रेम जुळले व त्यांनी लग्न केले. ती मुलगी जेव्हा आपल्या आईवडिलांकडे पाली (राजस्थान) येथे आली तेव्हा तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तिच्या पायावर पगडी ठेवून तिला मुलाला सोडून परत त्यांच्याकडे येण्याची विनवणी करीत पायावर पगडी ठेवली. या क्षणाचा कोणीतरी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला. त्याला आता लव्ह जिहादचा अँगल देऊन अपप्रचार केला जात आहे. सध्या ती मुलगी पुण्याला तिच्या नवऱ्यासोबत राहत आहे.”

मूल पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

ही सर्व माहिती मिळवल्यानंतर हा व्हिडिओ ज्या चटई पोलीस ठाण्यात चित्रित करण्यात आला त्या ठाण्याचे एसएचओ गिरीधर सिंह यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी माहिती दिली की, “मुलीच्या कुटुंबियांनी 29 ऑगस्ट 2020 रोजी आमच्याकडे या प्रकरणी मिसिंगची तक्रार (FIR – MPR 25) नोंदविली होती. त्यानंतर 1 सप्टेंबर 2020 रोजी ती मुलगी घरी परतली. समाजातील लोकांनी तडजोडी करीत हा वाद मिटवला.”

फॅक्ट क्रेसेंडोने पाली येथील पोलिस आयुक्त राहुल कटके यांच्याशीसुद्धा संपर्क साधला. त्यांनीसुद्धा लव्ह जिहादचे हे प्रकरण नसल्याचे स्पष्ट केले. “मुलगा आणि मुलीग दोघे एकाच समाजातील असून, ज्येष्ठांनी आपसातच या प्रकरणी शांतताप्रिय निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या व्हिडिओला धार्मिक तेढ निर्माण होईल अशा दाव्यासह शेयर करू नये.”

सदरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दैनिक भास्करच्या पाली आवृत्तीमध्ये या घटनेबाबत सविस्तर वृतांत प्रकाशित झाला होता. यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, ना मुलीने परधर्मीय मुलाशी लग्न केले, ना तिच्या वडिलांनी आत्महत्या केली.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, मुलीच्या पायावर पगडी ठेवणाऱ्या पित्याच्या त्या व्हिडिओचा लव्ह जिहादशी काही संबंध नाही. तसेच मुलीने पित्याच्या विनवणीला मान दिला नाही म्हणून वडिलांनी आत्महत्यासुद्धा केलेली नाही. त्या व्हिडिओतील घटना राजस्थानमधील असून, मुलगा-मुलगी दोघे एकाच समाजातील आहे.

Avatar

Title:मुलीच्या पायावर पगडी ठेवणाऱ्या पित्याच्या व्हिडिओसोबत ‘लव्ह जिहाद’चा दावा खोटा

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False