दिल्ली दंगलीचा आरोपी मोहम्मद सिराजला अटक करण्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

False सामाजिक

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, भरूच पोलिसांनी दिल्ली दंगलीतील आरोपी मोहम्मद सिराजला अटक करतानाचा हा व्हिडिओ आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओसोबत केला जाणारा दावा खोटा आहे. मोहम्मद सिराजला अटक करण्याचा हा व्हिडिओ नाही.

काय आहे दावा?

सुमारे अडीच मिनिटांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, एका हॉटेलमध्ये बसलेल्या चार जणांना साध्या गणवेशातील पोलिस झडप टाकून अटक करताता. त्यांच्याकडून शस्त्रदेखील जप्त करण्यात आले. 

या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, थरार कॅमेरा वर रेकॉर्ड झाला – भरूचच्या क्राइम ब्रांच अधिकाऱ्यांनी मोहम्मद सिराज अंवर नावाच्या गुन्हेगाराला दोन पिस्तूल, 19 चालू काढतुस, दोन रिकामी मॅक्झिन आणि 61 हजार नकद रकमेसह सरफरोश स्टाईल मध्ये भरूच हायवेवरून अटक केली.

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा शोध घेतला. कीवर्ड्सद्वारे सर्च केल्यावर टीव्ही-9 भारतवर्ष चॅनेलवरील एक बातमी आढळली. त्यानुसार, अहमदाबाद पोलिसांनी 27 जून 2021 रोजी एका हॉटेलमधून चार आरोपींना अटक केले होते. त्यांच्याकडून एक पिस्तुलही जप्त करण्यात आले होते. हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला.

अधिक शोध घेतल्यावर इंडियन एक्सप्रेसची बातमीसुद्धा आढळली. त्यानुसार, वाहन चोरी आणि लूट प्रकरणी किशोर पांचाळ (29) याला अटक करण्यासाठी अहमदाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रांचने हा सापळा रचला होता. गुजरातमधील पाटण शहराजवळील अमरपुरा गावातील एकता हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली होती. 

अहमदाबाद क्राईम ब्रांचने फॅक्ट क्रेसेंडो गुजरातीला माहिती दिली की, वाहन चोरीचे आरोप असलेल्या किशार पांचळ अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होता. त्याची  निश्चित माहिती मिळाल्यावर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई अहमदाबाद पोलिसांनी केली. भरुच पोलिसांचा या कारवाईशी काही संबंध नाही. सोशल मीडियावरील दावे असत्य आहेत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, गुजरातमधील वाहन चोरीतील गुन्हेगारांना अटक करण्याचा हा व्हिडिओ आहे. म्हणजेच, भरूच पोलिसांनी मोहम्मद सिराज नावाच्या दिल्ली दंगलीतील आरोपीला अटक करण्याचा दावा खोटा आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:दिल्ली दंगलीचा आरोपी मोहम्मद सिराजला अटक करण्याचा हा व्हिडिओ नाही.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False