Fact Check : असदुद्दीन ओवैसींनी UN ला पत्र लिहिले का, भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीत

False राजकीय | Political

असदुद्दीन ओवैसींनी UN ला पत्र लिहिले की, भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीत त्यावर UN ने उत्तर दिले की, जिथे सुरक्षित आहात तिथे निघून जा अशी एक पोस्ट सत्यप्रकाश श्रीवास्तव यांनी शेअर केली आहे. ही मुळ पोस्ट मोदी हैं तो मुमकिन है – ‘मोदी सेना’ या पेजवर आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संयुक्त राष्ट्रसंघास खरेच असे पत्र लिहिले आहे का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आमच्यासमोर खाली परिणाम दिसून आला.

या परिणामातून ओवैसी यांनी असे कोणते पत्र लिहिलेले आढळले नाही. ‘हिंदूस्थान टाईम्स’ने 16 जून 2018 रोजी एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार ओवैसी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचा तो अहवाल नाकारला आहे ज्यात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. ओवैसी यांनी याबाबत केंद्र सरकारची पाठराण केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नये अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

ARCHIVE HT

‘टाइम्स ऑफ़ इंडिया’ नेही 16 जून 2018 रोजी याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तातही संयुक्त राष्ट्रसंघाने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नये अशी भूमिका ओवैसी यांनी मांडल्याचे म्हटले आहे.

ARCHIVE TOI

याशिवाय आम्हाला आणखी एक वृत्त दिसून आले जे संयुक्त राष्ट्रसंघास पत्र लिहिण्यासंदर्भातील आहे. हे पत्र ओवैसी यांचे नसून समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचे आहे. 7 ऑक्टोबर 2015 रोजी ‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दादरी हत्याकांड संदर्भात केंद्र सरकारची तक्रार करणारे पत्र आझम यांनी संयुक्त राष्ट्रांना लिहिले होते. त्यावर असदुद्दीन ओवैसी यांनी आझम खान यांना विरोध दर्शविला होता. देशांतर्गत बाबी या देशातच सोडविल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यामुळे एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संयुक्त राष्ट्रसंघास पत्र लिहिले नाही हे स्पष्ट आहे.

ARCHIVE TODAY

 AIMIM ने आपल्या फेसबुक पेजवरुनही याचा खुलासा केलेला आहे. ‘AltNews’ नेही याचे फॅक्ट चेक केले आहे. यातून हे स्पष्ट होत आहे की, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघास पत्र लिहिले होते. ओवैसी हे देशातंर्गत बाबी बाहेर जाऊ नयेत, अशा मताचे आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नये, अशी थेट भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघानेही असदुद्दीन ओवैसी यांना कोणतेही उत्तर दिलेले नाही अथवा पाठवलेले नाही.

निष्कर्ष

एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संयुक्त राष्ट्रसंघास पत्र लिहिलेले नाही. संयुक्त राष्ट्रसंघानेही असदुद्दीन ओवैसी यांना कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : असदुद्दीन ओवैसींनी UN ला पत्र लिहिले का, भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीत

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False