
देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू असतानाही हैदराबादमध्ये चारमिनार परिसरातील मक्का मशीद परिसरात शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले होते. या नागरिकांना देशहिताचे काहीही देणे-घेणे नाही, असे म्हणत समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुनील सातपुते यांनीही असा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतरचा आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
हैदराबादमध्ये संचारबंदी लागू असताना नागरिक रस्त्यावर आले का? याचा शोध घेतला असता असे कोणतेही वृत्त आढळून आले नाही. त्यानंतर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील काही दृश्ये घेऊन ती रिव्हर्स इमेज केली. त्यावेळी सियासत या संकेतस्थळाने 24 जानेवारी 2020 रोजी दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार शुक्रवारच्या नमाजनंतर कोणताही हिंसाचार होऊ नये यासाठी हैदराबाद शहरातील मक्का मशीद आणि चारमिनार परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या वृत्तातील दोन छायाचित्रे ही व्हिडिओतील दृश्यातील असल्याचे दिसून आले. भारतात 24 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. याचाच अर्थ ही द्श्ये देशात लॉकडाऊन घोषित होण्याअगोदरची असल्याचे स्पष्ट झाले.

सियासतमधील सविस्तर वृत्त / Archive
त्यानंतर आम्हाला युट्यूबवर 20 डिसेंबर 2019 रोजीचा टीव्ही 5 न्यूज या तेलगू वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओ दिसून आला. हा तोच व्हिडिओ आहे जो सध्या समाजमाध्यमात नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करत असल्याचा म्हणून व्हायरल होत आहे. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, सीएएविरोधात चारमिनार मक्का मशीदजवळ नागरिकांनी आंदोलन केले.
माहा न्यूज या स्थानिक वृत्तवाहिनीने लॉकडाऊननंतर तेथील शुक्रवारच्या नमाजच्या वेळची स्थिती दाखवणारे वृत्त दिनांक 27 मार्च 2020 रोजी दिले होते. या वृत्तात चारमिनार, मक्का मशीद परिसर ओस पडलेला असल्याचे आपण पाहू शकतो. लॉकडाऊनमुळे स्थानिक नागरिकांनी शुक्रवारची नमाज आपल्या घरातच अदा केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
यातून हे स्पष्ट झाले की, समाजमाध्यमात हैदराबादमध्ये स्थानिक नागरिक शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते ही माहिती असत्य आहे.
निष्कर्ष
कोरोना विषाणूची लागण होऊ नये आणि त्याचा प्रसार थांबावा यासाठी हैदराबादचे नागरिक शुक्रवारची नमाज घरातच अदा करत आहेत. समाजमाध्यमात पसरत असलेला व्हिडिओ जुना असून त्यासोबतची माहिती असत्य आहे.

Title:हैदराबादला शुक्रवारच्या नमाजसाठी संचारबंदीचे उल्लंघन करण्यात आले का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
