
चांद्रयान-2 मोहिमेंतर्गत चंद्रावर उतरताना विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर भावविवश झालेल्या इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मारलेली मिठी बरीच गाजली. यावरून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील एका दीर्घ लेखात खासगी कंपन्यांना सॅटेलाईट तयार करण्याचे कंत्राट देण्याच्या इस्रोच्या निर्णयावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
इस्रोने सॅटेलाईट तयार करण्याचे काम तीन खासगी कंपन्यांना दिले असून, त्यापैकी एक कंपनी विदेशी आहे. या विदेशी कंपनीचे नाव पनामा पेपर प्रकरणात आलेले असून, अशा भ्रष्ट कंपनीला इस्रोने कंत्राट दिले, यासह विविध दावे या पोस्टमध्ये करण्यात आले आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.
काय आहे पोस्टमध्ये
पोस्टमधील दीर्घ लेखाचा सारांश खाली दिला आहे. मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । अर्काइव्ह
गेल्या वर्षी इस्रोने प्रथमच सॅटेलाईट बनवायचे काम तीन खाजगी कंपन्यांना दिले. त्यांची नावे अशी,
1. अल्फा डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड (इटली)
2. भारत इलेक्ट्रॉनिक (भारत)
3. टाटा ऍडव्हान्स सिस्टम (भारत)
पैकी अल्फा डिझाईन ही भारतीय कंपनी नाही. ती मूळ इटलीची कंपनी आहे. योगायोग म्हणजे गौतम अदानी यांच्या “अदानी डिफेन्स आर्म कंपनीचा अल्फा कंपनीसोबत तिला खरेदी करण्याविषयी व्यवहार सुरू होता. मग सॅटेलाईट बनवायचे कॉन्ट्रॅक्ट 2018 मध्ये इस्रोकडून मिळाल्यावर लगेच अदानी यांनी 2019 मध्ये अल्फा डिझाइन्स ही कंपनी 400 कोटी रुपयांमध्ये खरेदी देखील केली.
एक गंभीर बाब म्हणजे याच अल्फा डिझाइन्सचे नाव “पनामा पेपर प्रकरणात” देखील आले होते. अशी कंपनी उद्योगपती अदानी यांनी विकत घेतली.
एवढेच नाही तर, अहमदाबाद स्थित स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा नामक यांनी खासगी कंपन्यांना सॅटेलाईन तयार करण्याचे कंत्राट देण्यास विरोध केला होता. याची शिक्षा म्हणून इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी त्यांचे डीमोशन करीत इस्रो मुख्यालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती केली.
मग यातून प्रश्न उभे राहतात की, सिवन यांनी इस्रोचे सॅटेलाईटचे खाजगीकरण करणाचे विरोध करणाऱ्या तपन सिन्हा यांना कसे बाहेर काढले? ISRO हे सॅटेलाइट बनवण्यासाठी सक्षम असताना सिवन यांनी 3 खाजगी कंपनीला सॅटेलाईट बनवण्याचे कंत्राट दिले कसे दिले? अल्फा ही सगळीकडे ब्लॅकलिस्टेड असलेली कंपनी अदानी समूहाने फक्त 400 कोटीत विकत घेऊन इस्रोचे सॅटेलाईट बनवण्याचे कंत्राट कसे मिळवले?
तथ्य पडताळणी
सदरील दीर्घ लेखातील काही प्रमुख दाव्यांची एक-एक करीत माहिती घेऊ.
इस्रोने सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट दिले का?
गेल्या वर्षी इस्रोने 18 जुलै 2018 रोजी तीन कंपन्यांना 27 उपग्रह (सॅटेलाईट) तयार करण्याचे कंत्राट दिले होते. इस्रोने प्रथमच अशा तऱ्हेचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत अल्फा डिझाईन टेक्नोलॉजी प्रा. लि., भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि टाटा अॅडव्हान्स सिस्टिम लिमिटेड या तीन कंपन्यांशी तीन वर्षांकरिता करार करण्यात आला. इस्रोतर्फे यू आर राव उपग्रह केंद्राने (URSC) या तीन कंपन्यांशी बंगळुरूमध्ये हा करार केला होता. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कंत्राटाविषयी कोणतीही माहिती सार्वजनिक न करण्याचे कंपन्यांवर बंधन घालण्यात आले होते.

मूळ बातमी येथे वाचा – द हिंदू । अर्काइव्ह । टाईम्स ऑफ इंडिया
अल्फा डिझाईन ही कंपनी इटालियन आहे का?
इस्रोचे कंत्राट मिळवलेली अल्फा डिझाईन प्रा. लि. ही कंपनी भारतीय आहे. तिचे मुख्यालय बंगळुरूमध्ये आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर भारतात नोंदणी असलेल्या कंपन्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार, अल्फा डिझाईन टेक्नोलॉजी ही खासगी कंपनी 2003 साली बंगळुरूमध्ये स्थापन करण्यात आली होती. तिच्या संचालक मंडळातदेखील भारतीय नागरिक आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीतही ही कंपनी बंगळुरू येथील असल्याचे म्हटले आहे. अधिक माहिती तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर वाचू शकता.

मूळ माहिती येथे तपासा – Ministry of Corporate Affairs
कंत्राट मिळवलेली भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ही सरकारी कंपनी आहे, तर टाटा अॅडव्हान्स सिस्टिम लिमिटेड ही हैदराबादस्थित खासगी कंपनी आहे. याचा अर्थ इस्रोने सॅटेलाईट तयार करण्याचे कंत्राट दोन खासगी आणि एक सरकारी कंपनीला दिले आहे. या तिन्ही कंपन्या भारतीय आहेत. विशेष म्हणजे अल्फा डिझाईन कंपनीने यापूर्वी 2017 व 2018 मध्ये इस्रोसाठी दोन सॅटेलाईट बनविलेले आहेत.
पनामा पेपर प्रकरण काय आहे?
पनामा पेपर प्रकरणात मध्य अमेरिकेतील पनामा या देशातील मोझॅक फॉन्सेका नावाच्या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची सुमारे एक कोटी गोपनीय कागदपत्रे उघड करण्यात आली होती. जगभरातील कंपन्या, राजकीय नेते, बडे उद्योगपती, सेलिब्रेटी कशाप्रकारे आपली मालमत्ता लपवण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी अशा करनंदनवन असणाऱ्या बेटांवर स्थापन केलेल्या कंपन्यांच्यामार्फत मोठय़ा प्रमाणात पैसा कसा फिरवला गेला याबाबत थक्क करणाऱ्या बाबी पनामा पेपर प्रकरणात स्पष्ट झाल्या. जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने भारतातील ‘द इंडियन एक्स्प्रेस’सह जगातील अनेक नामांकित माध्यमसमूहांनी हा घोटाळा उघड केला होता. (संदर्भ – लोकसत्ता)
अल्फा डिझाईनचे नाव पनामा पेपर प्रकरणात आले होते का?
जवळपास 500 भारतीयांची नावे पनामा पेपर्समध्ये नमूद केलेल्या कंपन्यांशी निगडित असल्याचे दिसून आले होते. परंतु, अल्फा डिझाईन कंपनीचे नाव पनामा पेपर प्रकरणात आले नव्हते.
परंतु, अल्फा डिझाईन कंपनी ज्या इटालियन कंपनीशी जॉईंट व्हेंचर म्हणून काम करते तिचे नाव पनामा प्रकरणात आले होते.
अल्फा डिझाईन कंपनीने इटलीच्या ईलेट्रॉनिका एसपीए (Elettronica SpA) कंपनीशी 2007 साली एक करार केला होता. याअंतर्गत दोन्ही कंपन्या भागीदारीमध्ये भारतीय संरक्षण दलासाठी इलेक्ट्रॉनिक युद्धसामुग्री विकसित करणार असे ठरले. इटलीचे तत्कालिन पंतप्रधान रोमॅनो प्रॉडी फेब्रुवारी 2007 मध्ये भारत दौऱ्यावर आलेले असताना हा करार करण्यात आला होता. कंपनीच्या वेबसाईटवरदेखील याची माहिती दिली आहे.

अधिक येथे वाचा – अल्फा डिझाईन । इंडो-इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री । इंडियामार्ट
तर या ईलेट्रॉनिका कंपनीवर भारतीय संरक्षण दलाचे कंत्राट मिळवण्यासाठी 5 ते 17 टक्के कमिशन देण्याचा आरोप आहे. पनामा बेटावर स्थापन केल्यावर कंपनीच्या मार्फत हे कमिशन देण्यात आल्याचे पनामा पेपर्स प्रकरणात आढळून आले. ईलेट्रॉनिका कंपनी भारतासोबत 1996 पासून काम करते. कंपनीने आपल्यावर सर्व आरोपांचे खंडन केले होते. विशेष म्हणजे याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एरो इंडिया 2019 महोत्सवात ईलेट्रॉनिका आणि भारत सरकारची कंपनी भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्यामध्ये आधुनिक निरीक्षण उपकरणे विकसित करण्याचा करार झाला,

संपूर्ण बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेस । अर्काइव्ह
इथपर्यंत हे स्पष्ट होते की, अल्फा डिझाईनचे नाव पनामा प्रकरणात नव्हते. इटलीच्या ईलेट्रॉनिका नावाच्या कंपनीचे पनामा पेपरमध्ये नाव होते.
अदानी ग्रपुचा आणि अल्फा डिझाईन कंपनीचा संबंध काय?
अदानी एरो डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नोलॉजी या कंपनीने अल्फा डिझाईन आणि इस्रायलची एलबिट या दोन कंपन्यांशी विनामानव विमानप्रणाली विकसित करण्याचा मार्च 2016 मध्ये करार केला होता.

मूळ बातमी येथे वाचा – बिझनेस स्टँडर्ड । अर्काइव्ह
यानंतर लगेच एका आठवड्याने एप्रिल महिन्यात पनामा पेपर प्रकरण उघडकीस आले. तेव्हा त्यात अल्फा डिझाईनची वेगळ्या प्रकल्पामधील भागीदार असलेल्या ईलेट्रॉनिका कंपनीचे नाव आले. ईलेट्रॉनिका आणि अदानी ग्रुपचा यांचा काही संबंध नव्हता. थोडक्यात काय तर, अदानी यांच्या कंपनीने ज्या अल्फा डिझाईन कंपनीशी करार केला होता, त्या कंपनीचा एका वेगळ्या प्रकल्पासाठी ज्या इटालियन कंपनीशी जॉईंट व्हेंचर होते, त्या ईलेट्रॉनिका कंपनीचे पनामा पेपरमध्ये नाव आले होते.

मूळ बातमी येथे वाचा – इकोनॉमिक टाईम्स । अर्काइव्ह
अदानी यांनी अल्फा डिझाईनला विकत घेतले का?
या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आहे. जुलै महिन्यात अल्फा डिझाईन कंपनीला इस्रोचे सॅटेलाईट तयार करण्याचे कंत्राट मिळाले. त्यानंतर अदानी ग्रपुच्या डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नोलॉजी कंपनीने यावर्षी एप्रिल महिन्यात अल्फा डिझाईनला खरेदी केले. त्यामुले अदानी यांनी पनामा पेपरमध्ये नाव आलेल्या इटालियन कंपनीला नाही तर, भारतीय कंपनीला विकत घेतले.

मूळ बातमी येथे वाचा – फायनान्शियल एक्सप्रेस । अर्काइव्ह । बिझनेस लाईन । अर्काइव्ह
तपन मिश्रा यांचे बदली प्रकरण
गेल्या वर्षी जुलै महिन्यात सॅटेलाईट निर्मितीचे काम खासगी कंपन्यांना दिल्याचे जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इस्रोमधील वरिष्ठ वैज्ञानिक तपन मिश्रा यांची बदली करण्यात आली. तपन मिश्रा अहमदाबादमधील स्पेस अॅप्लिकेश सेंटरचे संचालक होते. या पदावरून त्यांचे बदली करून बंगळुरू मुख्यालयात इस्रोच प्रमुखांचे सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया । इंडियन एक्सप्रेस । अर्काइव्ह
टाईम्स इंडियाच्या बातमीनुसार, इस्रोतील सुत्रांनी माहिती दिली की, तपन मिश्रा आणि के. सिवन यांचे सॅटेलाईट निर्मितीचे काम खासगी कंपन्यांना देण्यावरून मतभेद होते. तसेच गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात GSAR-11 च्या प्रक्षेपणास होत असलेल्या विलंबावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
विद्यमान इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या निवृत्तीनंतर (2021) मिश्रा हे चेयरमनपदाचे प्रमुख दावेदार होते. परंतु, त्यांना सल्लागार म्हणून नेमल्यामुळे ते चेयरमनपदाच्या स्पर्धेतून बाद झाल्याचे मानण्यात येत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, एक्झिक्युटिव्ह पदावर असणाऱ्या संचालकांमधूनच इस्रोच्या चेयरमनची निवड करण्यात येते. तपन मिश्रा आता सल्लागार (Consultative) पदावर आहेत. विशेष म्हणजे असे पदच यापूर्वी इस्रोमध्ये नव्हते.
बदलीविषयी तपन मिश्रा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
निष्कर्ष
वरील सर्व पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की,
- इस्रोने इटालियन कंपनीला सॅटेलाईट निर्मितीचे कंत्राट दिलेले नाही
- अल्फा डिझाईन ही कंपनी भारतीय आहे. (इटालियन नाही)
- अल्फा डिझाईन कंपनीचे नाव पनामा पेपर प्रकरणात आले नव्हते
- अल्फा डिझाईन ही कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये नाही
- अदानी ग्रपुने अल्फा डिझाईन ही कंपनी खरेदी केली
म्हणजेच इस्रोने भ्रष्टाचारात अडकलेल्या इटालियन कंपनीला सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट दिलेले नाही.

Title:इस्रोने भ्रष्टाचारात अडकलेल्या इटालियन कंपनीला सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट दिले का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
