VIDEO: “जय बजरंग बली” म्हटले म्हणून पोलीस मारत असल्याचा व्हायरल व्हिडियो 5 वर्षांपूर्वीचा आहे

False राजकीय

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विविध कारणांसाठी पश्चिम बंगाल चर्चेत आहे. ‘जय श्रीराम’चा नारा दिल्यावर चिडणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये रामाचे नाव घेण्यास मज्जाव केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. यातच आता एका व्यक्तीला पोलिस काठीने जबर मारत असल्याचा व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, बंगालमध्ये हनुमानाचे नाव घेणेसुद्धा अडचणीचे झाले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये 32 सेंकदाची व्हिडियो क्लिप शेयर केलेली आहे. यामध्ये पोलीस अधिकारी हात बांधलेल्या व्यक्तीला शिव्या देत काठीने मारत आहे. मार खाणारा व्यक्ती जय बजरंग बलीचा जाप करताना ऐकू येतो. आसपास अनेक पोलीस कर्मचारी उभे आहेत. अधिकारी हिंदीतून त्यांना विचारतो की, याचा साथीदार कुठे आहे? त्यावर ते सांगतात की, तो पळून गेला. चिडलेला अधिकारी मारत म्हणतो की, तुला सोडवायला कोण एसपी येणार आहे का?

या व्हिडियोला कॅप्शन दिली आहे की, पश्चिम बंगाल की ममता सरकार में जय श्री राम बजरंग बली बोलने पर पुलिस वाले चमचागिरी की हद पार कर चुके हैं. ऐसे पुलिस वालों को तुरंत बर्खास्त कर देना चाहिए.

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियो क्लिपची सतत्या तपासण्यासाठी गुगलवर शोध घेतला. की-फ्रेम्स घेऊन रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर काही सापडले नाही. व्हिडियोमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पोलीस शुद्ध हिंदीमध्ये (मध्य भारत) बोलत आहे. बोलण्याच्या पद्धतीवरून व्हिडियोतील पोलीस बंगाली वाटत नाहीत. त्यामुळे विविध की-वर्ड्सद्वारे व्हिडियो सर्च केला.

अखेर UP Police Beating A Man Jai Bajrang Bali असे सर्च केल्यावर युट्यूबवरील एक व्हिडियो समोर आला. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. फेसबुक पोस्ट आणि हा व्हिडियो एकच आहे. व्हिडियोच्या शीर्षकामध्ये उत्तरप्रदेश पोलिसांचा उल्लेख करण्यात आला आहे. व्हिडियोसोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडियो 27 जून 2016 रोजी अपलोड करण्यात आला होता.

याविषयी अधिक शोध घेतल्यावर दैनिक भास्कर वेबसाईटवरील एक बातमी समोर आली. हा लेख 12 मे 2018 साली प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने म्हटले की, मार खाणारा व्यक्ती हा कारागृहातून पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. यावेळी त्याला मारहाण करतानाचा कोणी तरी व्हिडियो शूट केला. बातमीत हा व्हिडियो नेमका कुठला आहे हे कळू न शकल्याचे सांगण्यात आले. फॅक्टली वेबसाईट्सने दिलेल्या रिपोर्टनुसार 2014 साली अपलोड केलेला हाच व्हिडियो युट्यूबवर उपलब्ध आहे.

मूळ बातमी येथे वाचा – दैनिक भास्करअर्काइव्ह

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, 2017 साली पश्चिम बंगाल येथे हनुमान जयंती साजरी करणाऱ्या हिंदु जनजागरण मंचच्या सदस्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. बंगालच्या बिरभम जिल्ह्यातील सुरी येथे विनापरवानगी मिरवणूक काढल्यानिमित्त पोलिसांनी हा लाठीचार्ज केला होता. परिस्थिती चिघळल्यानंतर शीघ्र कृती दलाच्या जवानांनी जमावाला पसरविण्यासाठी बळाचा वापर केला. बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांच्या नेतृत्त्वाखाली ही मिरवणूक काढण्यात येणार होती. परंतु, पोलिसांनी कलम 144 लागू करून परवानगी नाकारली होती.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडेअर्काइव्ह

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणामुळे त्यावेळी बराच वाद झाला होता. विशेष म्हणजे भाजपच्या आयटीसेलचा तत्कालिन सचिव तरुण सेनगुप्ता याने वरील व्हिडियो शेयर करून हा पोलिस आणि प्रशासनावर अमानुषतेचा आरोप केला होता. परंतु, बंगाल पोलिसांनी सेनगुप्ताला खोटी माहिती पसरवून सामाजिक शांतता भंग केल्याबद्दल अटक केली होती. हा व्हिडियो 2017 मध्ये घडलेल्या लाठीचार्जचा नाही. तो 2014 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

निष्कर्ष

हुनमान नामाचा जप करणाऱ्याला बंगाली पोलीस मारत असल्याचा व्हिडियो सुमारे पाच वर्षांपूर्वीचा आहे. तसेच तो बंगालमधील नाही. त्यामुळे सदरील व्हिडियोवरून करण्यात येणारा दावा खोटा आहे.

Avatar

Title:VIDEO: “जय बजरंग बली” म्हटले म्हणून पोलीस मारत असल्याचा व्हायरल व्हिडियो 5 वर्षांपूर्वीचा आहे

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False