पुण्यातील 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करणारे आरोपी मुस्लिम नव्हते; वाचा सत्य

False सामाजिक

गेल्या आठवड्यात पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. पुणे शहरातील ताडीवाला रोड परिसरात एका 11 वर्षीय पीडितेवर तिचे वडील, 14 वर्षीय भाऊ, आजोबा आणि चुलत मामाने अत्याचार केला. 

या घटनेबाबत सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, नात्याला काळीमा फासणारा हा घृणास्पद प्रकार मुस्लिम कुटुंबामध्ये घडला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी  आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) याबाबत फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य आहे. या प्रकरणातील पीडिता किंवा आरोपी कोणीही मुस्लिम नाहीत.

काय आहे दावा?

11 वर्षीय मुलीवरील बलात्काराच्या बातमीखाली एका व्यक्तीने ट्विट केले की, मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींची नावे अब्दुल, जावेद, फरहान, निझाम अशी आहेत. 

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हे प्रकरण नेमके काय आहे याची माहिती घेतली. ‘न्यूज-18 लोकमत’च्या 20 मार्च रोजीच्या बातमीनुसार, पुणे शहरातील ताडीवाला रोड परिसरात एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिच्या वडिलांनी, अल्पवयीन भावाने, आजोबा आणि चुलत मामाने वेळोवेळी धमकी देत लैंगिक अत्याचार केला. शाळेमधील समुपदेशनातून हा प्रकार उघडकीस आला. 

पुढारीच्या बातमीनुसार, पीडित मुलगी पुण्यातील कोरोगाव पार्क परिसरातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते. शाळेत ‘गूड टच आणि बॅड टच’ बाबत मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या महिला समुपदेशकाला या मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती सांगितली. यानंतर समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिचे नाव उघड करण्यात आलेले नाही. तसेच आरोपीसुद्धा मुलीचे नातलगच असल्याचे त्यांचीसुद्धा ओळख उघड करण्यात आलेली नाही.

याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने बंडगार्डन ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अश्विन सातपुते यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल पोस्टमधील दावा खोटा असल्याचे सांगितले.

“सदरील प्रकरणातील कुटुंबीय मुस्लिम नाही. व्हायरल पोस्टमध्ये दिलेली नावेसुद्धा या प्रकरणातील आरोपींची नाहीत. त्यामुळे हा मेसेज असत्य आहे. पीडिता अल्पवयीन असल्यामुळे तिची ओळख उघड केली जाऊ शकत नाही; परंतु ती मुस्लिम कुटुंबातील नाही एवढे मी सांगू शकते,” असे सातपुते यांनी सांगितले. 

बंडगार्डन पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत पिडित मुलीचे वडील (45), भाऊ (14), आजोबा आणि चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी मुस्लिम नव्हते. चुकीच्या नावांच्या मेसेजमधून असत्य माहिती पसरविली जात आहे. 

Avatar

Title:पुण्यातील 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करणारे आरोपी मुस्लिम नव्हते; वाचा सत्य

Fact Check By: Agstaya Deokar 

Result: False

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)