कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलींना दत्तक देण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य

False सामाजिक

कोविडमुळे आईवडिलांना गमावलेल्या दोन चिमुरड्या मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन करणार एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर फोन करून या मुलींना दत्तक घ्यावे, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

आमच्या पडताळणीत हा मेसेज फेक आढळला. खुद्द महिला व बाल विकास मंत्रालयाने या मेसेजबाबत खुलासा केला आहे.

काय आहे दावा?

सोशल मीडियावर पुढील मेसेज व्हायरल होत आहे:

“दत्तक घेण्यासाठी: जर एखाद्यास मुलगी दत्तक घ्यायची असेल तर कृपया मोकळ्या मनाने ************ (प्रियांका) वर संपर्क साधा. एक मुलगी 3 दिवसांची आणि दुसरी 6 महिन्यांची आहे, कोविडमुळे नुकतेच त्यांचे पालक गमावले आहेत. कृपया या मुलांना नवीन जीवन मिळविण्यात मदत करा, शब्द पसरवा.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही या मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर फोन लावला. परंतु, हा क्रमांक बंद आहे. 

त्यानंतर इंटरनेटवर शोध घेतल्यावर आढळले की, केंद्रीय पत्र व सूचना कार्यालयातर्फे (पीआयबी) कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलींना दत्तक देण्याचा व्हायरल मेसेज फेक असल्याचे सांगण्यात आले आहे.

“अनाथ मुलींना दत्तक घेण्यासाठी आवाहन करणाऱ्या त्या मेसेजवर विश्वास ठेवू नये. अधिकृत प्रक्रियेद्वारेच मूल दत्तक घेणे कायद्याने बंधनकारक आहे,” असे पीआयबीने म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागातर्फेसुद्धा या मेसेजविषयी खुलासा करण्यात आलेला आहे. 

ट्विटरवर माहिती देताना विभागाने म्हटले की, “कोविडमुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांना दत्तक घ्या अशा पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहेत. हा मेसेज बेकायदेशीर, भ्रामक आणि दिशाभूल करणारा आहे. अशा प्रकारे मूल दत्तक घेता येत नाही. योग्य कायदेशीर प्रक्रीया काय आहे हे जाणून घ्या.”

महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनीदेखील एका मागून एक ट्विट करीत जनतेला आवाहन केले की, कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांची माहिती तात्काळ पोलिस किंवा बालकल्याण समिती देण्यात यावी. 

“बालकल्याण समितीला डावलून कोणाकडूनही मूल दत्तक घेणे बेकायदेशीर आहे. तुम्हाला जर मूल थेट दत्तक घ्या म्हणून कोणी संपर्क साधला तर त्वरित पोलिसांना याबाबत माहिती द्या. त्यासाठी आपण चाईल्डलाईन क्रमांक 1098 वर संपर्क साधू शकता. ही माहिते देणे आपली जबाबदारी आहे. कोणीही असहाय्य व लहान मुलांचे फोटो किंवा त्यांची ओळख पटेल असे मेसेज शेअर करू नये,” असे ईराणी ट्विटमध्ये म्हणाल्या.

महाराष्ट्र राज्याच्या एकल महिला धोरणाच्या समिती समन्वयक रेणुका कड यांनीसुद्धा फेसबुकवर पोस्ट शेअर करून अशा व्हायरल मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

“मूल दत्तक देण्यासाठी नोंदणीकृत संस्था आपल्या देशात आहे.  केंद्र सरकारद्वारे Central Adoption Regulation Agency (CARA) ची महत्वपूर्ण नियमावली आहे.  या नियमावली आणि मार्गदर्शक सूचनानुसारच नोंदणीकृत संस्थेमार्फत मूल दत्तक दिले जाऊ शकते,” असे त्या म्हणाल्या.

त्या पुढे लिहितात की, “असे मेसेज जेव्हा फॉरवर्ड होतात किंवा कोणी अशा प्रकारे मूल दत्तक देत असेल तर प्रथम हे मुलांच्या बाल हक्काचे हनन आहे.  दुसरे हा कायदेशीर गुन्हा आहे.  असे मेसेज फॉरवर्ड करून आपण कळत न कळतपणे छुप्यापद्धतीने होणाऱ्या मानव तस्करीच्या जाळ्यात मुलांना ढकलत आहोत का? याचा विचार असे  मेसेज फॉरवर्ड करताना करावा.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, कोविडमुळे पालकांना गमावलेल्या मुलींना दत्तक देण्याचा तो मेसेज फेक आहे. अशा मेसेजवर विश्वास ठेवून ते शेअर करून नये. अशा मेसेजची माहिती तात्काळ पोलिसांना किंवा 1098 या चाईल्डलाईन क्रमांकावर कळवावी.

Avatar

Title:कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलींना दत्तक देण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False