मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का? वाचा सत्य

False राजकीय

भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर कठोर शब्दांत टीका केल्याचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. संघाला अतिमहत्त्व देणे आणि मोदी व शहा यांच्याकडे देश सोपविणे सर्वात मोठी चूक असल्याचे या कथित ट्विटमध्ये म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ट्विट आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

आमच्या पडताळणीत आढळले की, लालकृष्ण आडवाणी यांच्या नावे बनावट अकाउंट तयार करून हे ट्विट करण्यात आले आहे. 

काय आहे दावा?

लालकृष्ट आडवाणी यांच्या नावाच्या ट्विटर अकाउंटवरील दोन ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर होत आहे. पहिल्या ट्विटमध्ये म्हटले की, “मेरी जिंदगी की सबसे बड़ी गलती मेरा आरएसएस जैसे निर्दयी संघ को अहमियत देना,  मैनें आरएसएस की हमेशा सेवा की,मैं राजनिति में उन लोगों को आगे लेकर आया जो संघ से जुड़े चेहरे थे, मैनें देश की भलाई के बारे में सोचा हमेशा ! लेकिन मुझे नहीं पता था की मेरी एक भूल देश को नरक में धकेल देगी!”

दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, “मैनें  मोदी-शाह का यह सोचकर विरोध  नहीं किया,की ये मेरे हाथों में पले बढ़े मेरें बच्चे देश को विश्वगुरू  बनायेगें,लेकिन आज देश की हालात इन दोनों की जोड़ी नें ऐसी कर दी है की जनता को श्वाँस तक नसीब नहीं हो रही है, मुझे ऐसा पता होता तो मैं इन  व्यापारियों को कभी देश नहीं सौंपता!”

ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करून युजर्स म्हणत आहेत की, लालकृष्ण अडवाणींची भावनिक ट्विट वाचून खरच मन हेलावून गेलं तुम्ही वाचा आणि बघा ही देश किती चुकीच्या लोकांच्या हातात गेला आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही लालकृष्ट आडवाणी यांच्या अधिकृत ट्विटरचा शोध घेतला. तेव्हा कळाले की, आडवाणी यांचे कोणतेही ट्विटर अकाउंट नाही. 

व्हायरल होत असलेले स्फोटक विधान जर त्यांनी केले असते तर त्याची मोठी बातमी झाली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी प्रकाशित झालेली नाही.

आता ट्विटच्या स्क्रीनशॉटची तपासणी करुया. सदरील ट्विट अकाउंट @LK_Adwani या नावाने आहे. या अकाउंटला भेट दिल्यावर कळाले की, हे अकाउंट डिलीट करण्यात आलेले आहे. ते सध्या अस्तित्वात नाही. 

ट्विटर

मग आम्ही या अकाउंटचा अर्काइव्ह वेबसाईटवर शोध घेतला. तेव्हा कळाले की, लालकृष्ण आडवाणी यांच्या नावाने हे बनावट अकाउंट तयार करण्यात आले होते.

या अकाउंटची सुरूवात डिसेंबर 2020 मध्ये झाली होती तर, डिलीट होण्यापूर्वी या अकाउंटला 1247 फॉलोवर्स होते.  या अकाउंटवरून शेतकरी आंदोलन, कोविड-19 परिस्थितीची हाताळणी, राफेल प्रकरण अशा विविध मुद्दांवरून केंद्र सरकारवर टीकात्मक ट्विट करण्यात आले होते.

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे आडवाणी यांच्या नावाची अधिकृत स्पेलिंग Advani आहे. ट्विटर अकाउंटमध्ये मात्र v च्या जागी w टाकून ती Adwani अशी चुकीची लिहिलेली आहे.

अर्काइव्ह ट्विटर अकाउंट

अर्काइव्ह साईटवर आम्हाला सदरील वादग्रस्त ट्विटसुद्धा आढळले. 24 एप्रिल 2021 रोजी ते करण्यात आले होते. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, हे अकाउंट लालकृष्ट आडवाणी यांचे नाही. त्यांच्या नावे बनावट अकाउंट तयार करून वादग्रस्त ट्विट करण्यात आले होते. त्यामुळे आडवाणी यांनी संघ, मोदी आणि शहा यांच्यावर टीका केली, असा दावा खोटा आहे.

Avatar

Title:मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False