
दलित महिलेने जेवण बनवले म्हणून क्वारंटाईन सेंटरमधील काही लोकांनी या जेवणास विरोध केला, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु, फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे आढळले.
काय आहे पोस्टमध्ये?
तथ्य पडताळणी
व्हिडिओचे निरीक्षण केल्यावर एका ठिकाणी सहार (मधवापूर) असे लिहिल्याचे दिसते.

त्यानुसार शोध घेतला असता दैनिक जागरणच्या संकेतस्थळावर 18 मे 2020 रोजी प्रसिद्ध झालेले एक वृत्त आढळले. यानुसार बिहारमधील मधुबनी मधवापूर भागातील साहरघाट क्वारंटाइन सेंटरमध्ये ही घटना घडली होती. या क्वारंटाइन सेंटरमध्ये 25 प्रवासी मजूरांना ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था सरकारकडून करण्यात आली आहे. जेवण बनविणाऱ्या महिलेने जेवण बनवून ते टेबलांवर ठेवले होते. मजूरांची मागणी होती की त्यांना एकत्रित बसून जेवण करु द्यावे, परंतु महिलेने सोशल डिस्टन्सिंग पाळून जेवण करण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या मजुरांनी हे जेवण लाथाडले.

फर्स्ट बिहार झारखंड या युट्यूब चॅनलवरील वृत्तात मजुरांनी हे अन्न ही महिला दलित असल्याने नाकारल्याचे मात्र कुठेही म्हटलेले नाही.
फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य जाणून घेण्यासाठी सहारघाट पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेथील पोलीस अधिकारी सुरेंद्र पासवान यांनी सांगितले की, ही महिला दलित असल्याने तिच्या हाताने बनवलेले अन्न मजूरांनी नाकारले नव्हते. या मजुरांची एकत्रित भोजन करण्याची इच्छा होती. या महिलेने त्यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग होत असल्याने तसे करण्यास नकार दिला. तिने त्यांना नियमांचे पालन करुन बेंचवरुन हे जेवण घेण्यास सांगितले. त्यानंतर चिडलेल्या मजुरांनी हे अन्न लाथाडले. या मजुरांविरोधात गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
निष्कर्ष
दलित महिलेने शिजवलेले अन्न मजूरांनी नाकारल्याचा या व्हिडिओसोबतचा दावा असत्य आहे. या मजुरांना नियमांचे पालन करण्यास या महिलेने सांगितल्यामुळे चिडलेल्या मजुरांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हटले आहे.

Title:दलित महिलेने अन्न शिजवल्यामुळे मजुरांनी खाण्यास नकार दिला का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
