
विश्वचषक स्पर्धेत भारताचा विजय व्हावा म्हणून पूजा, अभिषेक, हवन, यज्ञ केल्याची बातमी तुम्ही वाचली असेल. त्यात काही आश्चर्याची बाब नाही. परंतु, आता भारत विश्वकप स्पर्धेतून बाहेर पडल्यावरही देशात जर विदेशी संघाच्या विजयासाठी असा यज्ञ केला जात असेल आणि तोसुद्धा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ तो करीत असेल तर नक्कीच आश्चर्याची गोष्ट आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका वृत्तपत्राच्या बातमीच्या कात्रणात दावा केला जात आहे की, संघाने नागपूर मुख्यालयात इंग्लंडच्या विश्वकप विजयासाठी यज्ञ केला. 24 तास चाललेल्या या यज्ञाच्या वेळी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि हजारो स्वयंसेवक उपस्थित असल्याचेही म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये “नागपुर डेली” नामक वृत्तपत्राच्या 14 जुलै 2019 रोजीच्या बातमीचे कात्रण शेयर करण्यात आले आहे. “इंग्लंड की जीत के लिए संघ मुख्यालय में हवन” अशा मथळ्याखाली दिलेल्या बातमीत म्हटले की, विश्वचषक स्पर्धेत रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडचा संघ विश्वविजेता व्हावा यासाठी नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात गेल्या 24 तासांपासून (13 जुलै) यज्ञ करण्यात येत आहे. यावेळी संघप्रमुख मोहन भागवत, भैयाजी जोशी आणि दत्तात्रय होसबोले यांच्यासह हजारो स्वयंसेवक उपस्थित होते. बातमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. वी. पाटील नामक एका नेत्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तसेच एकीकडे संपुर्ण देश न्यूझीलंड जिंकावा म्हणून कामना करीत आहे आणि संघ इंग्लंडसाठी प्रार्थना करीत असल्याचे बातमीत म्हटले आहे.

तथ्य पडताळणी
सदरील बातमीच्या कात्रणाची सत्यता आणि मूळ स्रोत तपासण्यासाठी इंटरनेवर ही बातमी शोधली. गुगलवर अशी कोणतीही माहिती आढळून येत नाही. त्यानंतर “नागपुर डेली” या वृत्तपत्राचा शोध घेतला असता असे वर्तमानपत्रसुद्धा सापडले नाही. मग ही बातमी नेमक्या कोणत्या वर्तमान पत्रात आली हा प्रश्न उपस्थित होतो.
या बातमीचे बारकाईने निरीक्षण केल्यावर ही वर्तमानपत्राची प्रमाण भाषा वाटत नाही. बातमीत दिलेल्या फोटोची कॅप्शनसुद्धा नाही. मास्टहेडमध्ये पान क्रमांकसुद्धा नाही. तसेच बातमीत जे एनसीपी नेते आर. वी. पाटील असे नाव घेतले आहे, तसे कोणतेही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते नाहीत. या नावाच्या जवळ जाणारे प्रतिष्ठित नाव म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील (आर. वी. पाटील). परंतु, ते पूर्वी काँग्रेसचे आणि आता भाजपचे नेते आहेत. या सर्व बाबी विचारात घेता या बातमीच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित होते.
फॅक्ट क्रेसेंडोने संघाचे विदर्भ प्रांत प्रचारप्रमुख अनिल सांबरे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी ही बातमी पूर्णतः खोटी असल्याचे सांगितले. “नागपुरच्या संघ मुख्यालयात इंग्लंडच्या विजयासाठी कोणताही यज्ञ झालेला नाही. हे वृत्त चुकीचे आणि खोटे आहे. हे कोणी पसरविले याचा आम्ही शोध घेत आहोत,” असे ते म्हणाले.
या कथित कार्यक्रमाला संघाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित असल्याचा बातमीत दावा करण्यात आला आहे. यासंबंधी श्री. सांबरे म्हणाले की, “विजयावाडा येथे गेल्या चार दिवसांपासून संघाची प्रांत प्रचारक बैठक सुरू आहे. सर संघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. ते मागच्या काही दिवसांपासून नागपुरात नाहीत. त्यामुळे या कथित यज्ञ सोहळ्याला मोहन भागवत उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही. पदाधिकारी रविवारी आणि सोमवारी तेथून परत निघाले.”

मूळ बातमी – आज तक
फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची पडताळणी केली. विविध मीडिया वेबासाईट्सने दिलेल्या बातम्यांनुसार, विजयवाडा येथे 11 ते 13 जुलै दरम्यान संघाची प्रांत प्रचारक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर संघचालक मोहन भागवत यांच्यासह स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. झी न्यूजच्या बातमीनुसार, मोहन भागवत 11 जुलै रोजी विजयवाडा येथे पोहोचलेसुद्धा होते. तेथे त्यांनी कनकदुर्गा देवीचे दर्शनसुद्धा घेतले. संघाच्या अधिकृत वेबसाईटवर या बैठकीच्या शेवटच्या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेची माहिती देण्यात आली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – झी न्यूज । अर्काइव्ह
निष्कर्ष
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजयासाठी यज्ञ केल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. मोहन भागवत आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी 11 ते 13 जुलै रोजी नागपूर येथे उपस्थितच नव्हते. त्यामुळे सदरील बातमीमध्ये दावा केल्याप्रमाणे संघाचे पदाधिकारी या कथित यज्ञसोहळ्याला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही. म्हणून ही पोस्ट असत्य आहे.

Title:FALSE ALERT: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंग्लंडच्या विश्वकप विजयासाठी यज्ञ केला का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
