राहुल गांधी लंगरमध्ये मास्क लावून जेवणासाठी बसले होते का? वाचा त्या व्हिडिओचे सत्य

False राजकीय

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी नुकतेच पंजाबमध्ये गेले होते. तेथे त्यांनी गुरुद्वाराला भेट देऊन लंगरमध्ये प्रसाददेखील घेतला. राहुल गांधी लंगरमध्ये मास्क घालून बसलेले असतानाचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे, की लंगरमध्ये केवळ दिखाव्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी प्रसादसुद्धा घेतला नाही. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडिओविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की हा व्हिडिओ अर्धवट असून त्याद्वारे चुकीचा दावा केला जात आहे. 

काय आहे व्हिडिओमध्ये?

सुमारे दीड मिनिटांच्या या क्लिपमध्ये राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत लंगरच्या पंगतीमध्ये बसलेले आहेत. यावेळ त्यांनी मास्क घातलेला आहे. त्यांच्या बाजूला पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि नवज्योत सिंग सिद्धू बसलेले आहेत. 

हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिलेली आहे, की “मास्क लावून फक्त राहुल गांधीच लंगर खाऊ शकतो !! त्याने काहीही खाल्ले नाही. फक्त फोटोशूटसाठी बसला होता. लंगरमध्ये दिले जाणारे अन्न पवित्र आणि देवाची देणगी असते.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

राहुल गांधी 27 जानेवारी रोजी पंजाबच्या एक दिवसीय दौऱ्यावर गेले होते. त्यांनी अमृतसर येथे सुवर्णमंदिराला भेट दिली. राहुल गांधींसोबत मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा आणि नवज्योत सिंग सिद्धूदेखील होते.

एनडीटीव्ही वाहिनीने यांच्या बातमीमध्ये स्पष्ट म्हटले आहे, की राहुल गांधी यांनी श्री हरमिंदर साहिब येथे लंगरमध्ये काँग्रेस नेत्यांसोबत जेवण घेतले.

राहुल गांधी यांनीसुद्धा त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून लंगर भेटीच्या वेळी लाईव्ह व्हिडिओ ब्रॉडकास्ट केले होते. तो व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता. या व्हिडिओच्या 1.20 मिनिटांपासून पुढे तुम्ही पाहू शकता, की राहुल गांधी मास्क काढताता आणि लंगरमधील प्रसाद खातात. 

राहुल गांधी यांनी लंगरमध्ये जेवण करतानाचा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या मीडिया अकाउंटवरसुद्धा पोस्ट करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये स्पष्ट दिसते, की त्यांनी मास्क काढून जेवण केले. इंडिया न्यूज वेबसाईटवर राहुल गांधी यांचा जेवतानाचा फोटो उपलब्ध आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंगरमध्ये जेवण केले होते. अर्धवट व्हिडिओ शेअर करून चुकीचा दावा केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधी लंगरमध्ये मास्क लावून जेवणासाठी बसले होते का? वाचा त्या व्हिडिओचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False