
जनगणना 2026 च्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना ऑनलाइन स्वगणना करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून, जनगणनेदरम्यान माहिती भरताना ‘संस्कृत’ ही मातृभाषा असल्याचे नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संस्कृत भाषा ‘लुप्त’ घोषित होईल आणि तिला मिळणारी सरकारी मदत बंद केली जाईल, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेजमध्ये केलेला दावा दिशाभूल करणारा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये लिहिलेले आहे की, “एक अतिशय महत्त्वाची विनंती – भारताची जनगणना मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. जनगणना अधिकारी लवकरच तुमची भेट घेतील आणि माहिती गोळा करतील. जेव्हा तुम्हाला तुमच्या मातृभाषेबद्दल विचारले जाईल आणि नंतर तुम्हाला माहित असलेल्या भाषांबद्दल विचारले जाईल, तेव्हा कृपया तुम्हाला माहित असलेल्या भाषांमध्ये “संस्कृत” समाविष्ट करा. जरी सर्वांना संस्कृत बोलता येत नसले तरी, आम्ही दैनंदिन प्रार्थना, मंत्र, श्लोक, पूजा आणि विधी मध्ये निश्चितपणे ती वापरतो. मागील जनगणनेनुसार, संपूर्ण देशात संस्कृत भाषिक लोकांची संख्या फक्त 2 लाख होती. तर अरबी आणि फारसी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या यापेक्षा खूप जास्त होती आणि त्यांना सरकारी अनुदान आणि पाठिंबा देखील मिळाला. जर संस्कृत ही ‘लुप्त भाषा’ घोषित केली गेली, तर आपले प्राचीन धर्मग्रंथ, वेद, पुराणे इत्यादी प्रकाशित होणे बंद होईल. जर संस्कृत ‘लुप्त’ घोषित झाली, तर तिच्या विकास आणि विस्तारासाठी कोणताही सरकारी निधी किंवा पाठिंबा मिळणार नाही. आपण ती कायमची गमावू शकतो. केवळ आपले जाणीवपूर्वक प्रयत्नच संस्कृत जिवंत ठेवू शकतात.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यानंतर जनगणना 2027 मध्ये ‘संस्कृत’ भाषा नमूद केली नाही तर ती ‘लुप्त’ घोषित होईल आणि सरकारी मदत बंद केली जाईल, या दाव्याला पुष्टी देणारी कोणतीही अधिकृत माहिती किंवा लेख आढळून आला नाही.
तसेच, व्हायरल मेसेज संदर्भात कीव्हर्ड सर्च केल्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केल्याचे आढळले.
माहिती जनसंपर्क महासंचालनालयने 5 मे 2026 रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हायरल मेसेज शेअर करत सांगितले की,“जनगणना 2027 च्या अनुषंगाने जेव्हा तुम्हाला तुमच्या मातृभाषेबद्दल विचारले जाईल आणि नंतर तुम्हाला माहित असलेल्या भाषांबद्दल विचारले जाईल, तेव्हा कृपया तुम्हाला माहित असलेल्या भाषांमध्ये संस्कृत ही भाषा समाविष्ट करा. हिंदी भाषेचा समावेश करू नका. मागील जनगणनेनुसार संपूर्ण देशात संस्कृत भाषिक लोकांची संख्या फक्त 2 लाख होती. जर संस्कृत भाषा ‘लुप्त’ घोषित झाली, तर तिच्या विकास आणि विस्तारासाठी कोणताही सरकारी निधी किंवा पाठिंबा मिळणार नाही, अशी माहिती असलेला सोशल मीडियावरील संदेश खोटा आहे. अशा माहितीवर विश्वास ठेवू नका.”
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज दिशाभूल करणारा आहे. आगामी जनगणनेत ‘संस्कृत’ भाषा नमूद केली नाही तर ती ‘लुप्त’ घोषित होईल आणि सरकारी मदत बंद केली जाईल, असा दावा सिद्ध करणारी कोणतीही अधिकृत माहिती आढळून आलेली नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)


