मुख्यमंत्री आणि सलमान खान यांनी गरजू रुग्णांसाठी ‘सहायता निधी’ कक्ष सुरू केला का? वाचा सत्य

False राजकीय | Political

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता सलमान खान यांनी मंत्रालयात “ग्राम वैद्यकीय सहायता निधी” नावाचा कक्ष सुरू केल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार गरजू रुग्णांना 25 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, महाराष्ट्र शासनामार्फत असा कोणताही कक्ष किंवा योजना सुरू करण्यात आलेली नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, “मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस आणि सुपरस्टार सलमान खान यांनी गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात “ग्राम वैद्यकीय सहायता निधी” या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान 25 लाखापर्यंत मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता. संपर्क प्रमुखः श्री. शेटे साहेब 7 वा मजला, मंत्रालय, मुंबई. फोन नं- 022- 22026948, नियम – 1) एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला 2) केसरी/पिवळे रेशन कार्ड 3) आधार कार्ड 4) मुंबई बाहेरचे रूग्ण असतील तर हॉस्पिटलचे कोटेशन. कृपया ही माहीती सर्वांना पाठवा जेणेकरून गरीबांना याचा लाभ मिळेल. ज्या मुलांना-मुलींना हृदयविकाराचा आजार आहे, आणि गरीब परिस्थितीमुळे योग्य तो उपचार मिळत नाही, अश्या 90,00,000/- मुला-मुलींच्या उपचाराची जबाबदारी सलमान खान घेणार आहे. आपल्या ओळखीच्या व्यक्तिला उपचाराची गरज असेल तर Being Human संस्थेला email द्वारे कळवा. [email protected]

यासोबतच, दादर (पूर्व) येथील ‘होप स्पेशालिटी फार्मा’ आणि नाशिकमधील ‘आरोग्यदूत सेवाभावी संस्था’ यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम अशा प्रकारचा कक्ष सुरू झाला असता, तर ही मोठी बातमी ठरली असती. मात्र, विश्वासार्ह किंवा अधिकृत माध्यमांमध्ये याबाबत कोणतीही माहिती आढळत नाही.

या उलट, सोशल मीडियावर हा दावा व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र मुख्यमंत्री निधी (सीएमआरएफ) च्या अधिकृत फेसबुक पेजने याची दखल घेत 9 एप्रिल रोजी पोस्ट शेअर केली. 

या पोस्टमध्ये संबंधित दावा खोटा असून अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तसेच, वैद्यकीय मदतीसाठी केवळ ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’ हीच अधिकृत योजना असल्याचेही नमूद करण्यात आले.

पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सोशल मीडियावर “ग्राम वैद्यकीय सहाय्यता निधी” नावाने फिरणारा मेसेज पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.  मंत्रालयामार्फत अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. तसेच वैद्यकीय मदतीसाठी फक्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अधिकृत आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.”

सीएमआरएफचे कार्य

महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी हे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांना आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत पुरवणारे राज्य सरकारचे व्यासपीठ आहे. 

महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधील योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा टोल फ्री क्रमांक 1800 123 2211 वर संपर्क साधू शकता.

इतर दावे 

व्हायरल पोस्टमध्ये नमूद केलेल्या ‘होप स्पेशालिटी फार्मा’ आणि ‘आरोग्यदूत सेवाभावी संस्था’ यांच्या संपर्क क्रमांकांवर फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक क्रमांक बंद आढळले किंवा कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. संबंधितांशी संपर्क झाल्यास संबंधित माहिती अपडेट करण्यात येईल.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, मुख्यमंत्री आणि सलमान खान यांनी गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात “ग्राम वैद्यकीय सहायता निधी” कक्ष उघडले नाही. खोट्या दाव्यासह मेसेज व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: मुख्यमंत्री आणि सलमान खान यांनी गरजू रुग्णांसाठी ‘सहायता निधी’ कक्ष सुरू केला का? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *