
अलीकडेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शिया मशिदीत झालेल्या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसोबत दावा केला जात आहे की हीच त्या अलीकडील आत्मघाती स्फोटाची दृश्ये आहेत.

फॅक्ट चेक
तपासाची सुरुवात करताना आम्ही व्हायरल फोटो रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यामध्ये हा फोटो 27 डिसेंबर 2022 रोजी taipeitimes.com या वेबसाईटवर प्रकाशित झालेला सापडला. यावरून स्पष्ट होते की फोटो अलीकडचा नसून जुना आहे.
त्या रिपोर्टनुसार, इस्लामाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी तपास करताना दिसत आहेत. फोटोचे क्रेडिट EPA Images ला दिलेले आहे.

पुढील तपासात आम्हाला ‘epaimages’ या फोटो एजन्सीच्या वेबसाईटवरही हीच फोटो मिळाली. दिलेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबर 2022 रोजी इस्लामाबादमध्ये एका संशयित कारला अडवण्यात आल्यानंतर त्यातील हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले होते. या घटनेत एका पोलिसाचा मृत्यू झाला होता, तर चार पोलिसांसह किमान सहा जण जखमी झाले होते.
हा स्फोट एका पॉश मार्केट, विद्यापीठ आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरात झाला होता.

अलीकडील घटना काय आहे?
इस्लामाबादच्या बाहेरील तरलाई भागातील इमामबारगाह क़स्र-ए-खदीजातुल कुबरा येथे 6 फेब्रुवारी रोजी, शुक्रवारच्या नमाजदरम्यान झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान 69 जणांचा मृत्यू झाला, तर 169 हून अधिक जण जखमी झाले. पाकिस्तानी वृत्तपत्र DAWN च्या माहितीनुसार, स्फोट नमाज संपल्यानंतर लगेच झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
निष्कर्ष
तपासातून स्पष्ट होते की व्हायरल फोटो अलीकडील इस्लामाबादमधील शिया मशिदीतील स्फोटाचा नाही. हा फोटो डिसेंबर 2022 मधील वेगळ्या आत्मघाती हल्ल्यानंतरचा आहे. त्यामुळे व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.


