Hijab Row: कर्नाटकामध्ये विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’चे नारे लावत तिरंगा काढून भगवा झेंडा फडकावला का?

False राजकीय | Political

कर्नाटकमध्ये कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरून उफाळलेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. कर्नाटकमधील अनेक शहरांमध्ये तर या वादाला हिंसक वळण लागून दगडफेकसुद्धा झाली. अशातच कॉलेजमधील खांबावर चढून भगवा झेंडा फडकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला.

या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे, की कर्नाटकमधील शिमोगा शहरातील कॉलेजमध्ये हिजाबला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’चे नारे लावत राष्ट्रीय ध्वजाला काढून त्याजागी भगवा झेंडा फडकावला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आणि बातम्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की कर्नाटकमधील या विद्यार्थ्यांनी तिरंगा काढला नव्हता. वाचा नेमका हा काय प्रकार आहे.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी प्रांगणातील खांबावर चढून भगवा झेंडा फडकवाताना दिसतो. खाली भगवे शेले घातलेले विद्यार्थी ‘जय श्रीराम’चे नारे लावत आहेत. 

सोबत कॅप्शनमध्ये म्हटले, की “तिरंगा काढून भगवा लावला. आता हा देशद्रोह नाही का? विद्यार्थ्यांना पण अक्कल हवी.”

याच व्हिडिओवरून अनेक न्यूज पोर्टल्सनेदेखील बातम्या या अशायाच्या बातम्या प्रकाशित केल्या. ‘महाराष्ट्र देशा’ने म्हटले, की “विद्यार्थ्यानी खांबावर चढून जेथे भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला होता तेथे भगवा झेंडा फडकवला आहे. हा प्रकार शिमोगा येथे झाल्याचा दावा केला जातो आहे.”

टीव्ही-9 मराठी’ने बातमी दिली, की “कर्नाटकातील एका शैक्षणिक संस्थेवरील तिरंगा काढून तेथे भगवा झेंडा फडकवण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तो शिमोगा येथील असल्याचा दावा केला जात आहे.”

अशीच बातमी महाराष्ट्र टाईम्स आणि जनप्रतिसाद या वेबसाईट्सवरदेखील आहे.

मूळ बातमी – महाराष्ट्र देशा | अर्काइव्ह | टीव्ही-9 मराठीअर्काइव्ह | महाराष्ट्र टाईम्स | अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील भगवा फडकावण्याचा व्हिडिओ शिमोगा येथील असल्याचे सांगितले जात असल्यामुळे सर्वप्रथम या दिशेने शोध सुरू केला. त्यानुसार कळाले, की हा व्हिडिओ शिमोगा शहरातील गवर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेजमधील आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने या महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय बी. आर. यांच्या संपर्क साधला. त्यांनी सांगितले, की “ही घटना जेव्हा घडली तेव्हा मी तेथेच उपस्थित होतो. हे विद्यार्थी जेव्हा खांबावर चढले तेव्हा खांबावर कोणताही झेंडा नव्हता. हा पोल रिकामा होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तिरंगा काढला असे म्हणणे असत्य आहे. हे खरं आहे की, या विद्यार्थ्यांनी भगवा झेंडा फडकावला होता आणि ही कृती करण्यास आमचे समर्थन नाही. आणि ते जर तिरंग्याला हात लावणार असते तर आम्ही नक्कीच त्यांना रोखले असते. झेंड्याचा अपमान होऊ दिला नसता.”

प्राचार्यांनी मग आम्हाला भगवा झेंडा लावण्यापूर्वीचा एक फोटो पाठवला. यामध्ये स्पष्ट दिसते की, विद्यार्थी निदर्शने करत असताना खांबावर तिरंगा नव्हता. 

शिमोगा पोलिस अधीक्षक बी. एम. लक्ष्मी यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले, की तिरंगा काढून भगवा झेंडा लावण्यात आला हा दावा असत्य आहे. त्या खांबावर तिरंगा नव्हताच. त्यामुळे तो काढण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय, या विद्यार्थ्यांनी तो भगवा झेंडा लगेच खाली काढला होता. 

पोलिस अधीक्षकांनी ANI वृत्तसंस्थेलाही अशीच माहिती दिली. 

‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीचे पत्रकार दीपक बोपन्ना यांनीसुद्धा माहिती दिली की, 26 जानेवारी रोजी तिरंगा फडकाविल्यानंतर तो काढण्यात आला होता. 8 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली तेव्हा कॉलेजमधील पोलवर कोणताही झेंडा नव्हता. या विद्यार्थ्यांनी याच रिकाम्या पोलवर भगवा झेंडा लावला होता.

त्या दिवशी दगडफेक केल्या प्रकरणी तीन एफआयआर नोंदवले आहेत. त्यापैकी एक एफआयआर शासकीय पदवी महाविद्यालयावर झालेल्या दगडफेकीच्या संदर्भात नोंदवण्यात आली आहे.

कर्नाटकच्या उडुपीमधल्या एका महाविद्यालयाने मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश नाकारल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. सुमारे महिनाभर या विद्यार्थिनींनी कॉलेजबाहेर आंदोलने केले. मंगळवारी हे वाद चिघळून ठिकठिकाणी हिंसक निदर्शने झाली. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, कर्नाटकामधील शिमोगा सरकारी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तिरंगा काढून त्याजागी भगवा झेंडा लावला नव्हता. रिकाम्या पोलवर त्यांनी भगवा झेंडा फडकवला आणि लगेच नंतर त्यांनी तो काढला. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:कर्नाटकामध्ये विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’चे नारे लावत तिरंगा काढून भगवा झेंडा फडकावला का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False