
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांना गावात प्रवेशबंदी केल्याच्या पाट्या शेयर करून दावा केला जात आहे, की उत्तर प्रदेशमधील गावकऱ्यांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुरांचा मारा करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना गावात येऊ न देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले, की हा फोटो सध्या सुरू असलेल्या यूपी विधानसभा निवडणुकीदरम्यानचा नाही. जुने फोटो चुकीच्या संदर्भासहित शेअर केले जात आहेत.
काय आहे पोस्टमध्ये?
व्हायरल पोस्टमध्ये एक पाटी दिसते ज्यामध्ये लिहिलेले आहे, की भाजप नेत्यांना या गावात येण्यास पूर्णतः बंदी आहे. आपल्या सुरक्षेची जबाबदारी केवळ आपली राहील – किसान एकता, रसुलपूर माफी.

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
फोटोतील मजकुरानुसार, ही पाटी रसुलपूर माफी गावातील दिसते आणि ‘किसान एकता’तर्फे ती लावण्यात आलेली आहे.
हा धागा पकडून शोध घेतल्यावर कळाले की, ही पाटी सुमारे अडीच वर्षे जुनी आहे.
‘दैनिक जागरण’ने 7 ऑगस्ट 2018 रोजी या पाटीविषयी बातमी प्रकाशित केली होती.

दिल्ली-यूपी सीमेवर सरकारने शेतकरी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील रसुलपूर माफी गावातील लोकांनी या पाट्या लावल्या होत्या.
सरकारचा अनोख्या पद्धतीने विरोध करण्यासाठी गावातील महिला व पुरुषांनी वर्गण गोळा करून बिजनौर मार्गावरील एका शाळेपाशी ही पाटी लावली होती.
या पाटीचे त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती. सोशल मीडियावरदेखली तेव्हा फोटो व्हायरल झाले होते.
‘संयुक्त किसान मोर्चा’तर्फे कर्जमाफी आणि वीज दरांसंबंधीच्या प्रश्नांसाठी त्यावेळी ‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन पुकारण्यात आले होते. गांधी जयंतीच्या दिवशी शेतकरी राजघाट ते संसद भवन अशी पदयात्रा काढणार होते.
हरिद्वारपासून दिल्लीत येताना शेतकऱ्यांना मात्र दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी मिळाली नाही. तरीही शेतकऱ्यांनी 2 ऑक्टोबर 2018 रोजी दिल्लीत प्रवेश केल्याने त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला होता.
यानंतर 6 ऑक्टोबर 2018 रोजी रसुलपूर माफी गावा भाजप नेत्यांना प्रवेशबंदी केल्याची पाटी लावण्यात आली होती.
फॅक्ट क्रेसेंडोने संयुक्त किसान मोर्चाचे सर्वेसर्वा तथा शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी संपर्क साधून या पाटीविषयी अधिक माहिती घेतली. ‘रसुलपूर माफी गावातील ही पाटी 2018 मध्ये लावण्यात आली होती. सध्या गावात ती पाटी नाही,” असे टिकैत यांनी सांगितले.
‘न्यूजक्लिक’शी बोलताना 2018 मध्ये टिकैत म्हणाले होते, की “मोदी सरकारच्या विरोधात गावकऱ्यांनी अशा पाट्या लावल्या होत्या. मी त्यांना त्या पाट्या काढून टाकण्याचे आवाहन केले. त्याऐवजी गावकऱ्यांनी भाजप नेत्यांना गावात बोलवून शेतकरी प्रश्न व समस्यांसाठी धारेवर धरले पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे, असा सल्लासुद्धा दिला.”
2018 साली गांधी जयंतीच्या दिवशी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि पाणी मारा केल्याच्या निषेधार्ध रसुलपूर माफीसह अमरोहातील संसारपूर, गालिब बडा, अम्हेडा अशा विविध गावांमध्ये त्याकाळी भाजप नेत्यांना गावात प्रवेशबंदी करणाऱ्या पाट्या लावण्यात आल्या होत्या.

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते, की 2018 मध्ये लावण्यात आलेल्या भाजप नेत्यांविरोधातील जुन्या पाट्यांचे फोटो यंदाच्या उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान चुकीच्या संदर्भासह शेअर केले जात आहेत. शिवाय भाजप नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्याऱ्या या पाट्या कृषी कायदा आंदोलनाच्याही आधीच्या आहेत.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:भाजप नेत्यांना गावात प्रवेशबंदी? यूपीतील गावांमध्ये लावण्यात आलेल्या जुन्या पाट्या पुन्हा व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: Missing Context
