
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारकीर्द रिक्षाचालक म्हणून सुरू झाली होती. ठाण्यातून रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास चर्चेचा विषय आहे. अशातच एका रिक्षाचालकाचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, हा 25 वर्षांपूर्वीचा एकनाथ शिंदे यांचा रिक्षा चालवतानाचा दुर्मिळ फोटो आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, या फोटोत एकनाथ शिंदे नसून, या व्यक्तीचे नाव बाबा कांबळे आहे.
काय आहे दावा?
फोटोत एका रिक्षासमोर (MH 14 8172) एक व्यक्ती उभा आहे. सोबत दावा केला जात आहे की, ही व्यक्ती म्हणजे तरुणपणातील एकनाथ शिंदे आहेत. 1987 साली हा फोटो काढण्यात आला होता.

मूळ फोटो – फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हायरल फोटो विषयी इंटरनेटवर माहिती शोधली. तेव्हा सकाळ वृत्तपत्राची एक बातमी आढळली. त्यानुसार, हा फोटो बाबा कांबळे नामक रिक्षाचालकाचा आहे.
बातमीत म्हटले आहे की, छायाचित्रात शिंदे नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहरातील बाबा कांबळे आहेत. ते महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही त्यांची स्वत:ची पहिली रिक्षा होती. 1997 साली त्यांनी पहिली रिक्षा घेतली होती. 2007 मध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटनेची स्थापना केली.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे संस्थेच्या फेसबुक पेजवरदेखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यानुसार हा फोटो 1997 साली काढण्यात आला होता.
सोशल मीडियावर बाबा कांबळे यांचे छायाचित्र एकनाथ शिंदे यांच्या नावाने व्हायरल होऊ लागले. लोकसत्ताशी बोलताना कांबळे यांनी या फोटोबाबत खुलासा केला.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो एकनाथ शिंदे यांचा नाही. ते बाबा कांबळे आहेत.
(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Title:रिक्षाचालकाचा तो व्हायरल फोटो एकनाथ शिंदे यांचा नाही; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
