नवीन नाणे चलनात आले नसून ते ‘स्मारक नाणी’ आहेत; बनावट नोटांचा व्हिडिओ व्हायरल

Missing Context राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी दिनी टपाल तिकिट आणि 75 रुपयांच्या नाण्याचे 28 मे रोजी अनावरण केल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, भारत सरकारने दोन हजाराच्या नोटा वितरणातून मागे घेतल्यानंतर नवीन नाणी आणि नोटा चलनात आणल्या आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधिल नाणी चलनातील नसून ते स्मारक नाणी आहेत आणि नोटा बनावट आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती 75, 60, 100, 125, 500, 200, 1000 रुपयांची नाणी आणि 1, 5, 20, 350 रुपयांच्या नोटा दाखवताना दिसतो.

या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, भारत सरकारने नवीन नाणी आणि नोटा चलनात आणल्या आहेत.

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्व प्रथम व्हायरल व्हिडिओमधील नोटांसंबंधित महिती मिळवल्यावर कळाले की, 350 आणि 2 रुपयांची नोट बनावट आहे. तसेच एक रुपयांच्या नोटा 1978 मध्ये बंद करण्यात आल्या होत्या.

पुढे सर्च केल्यावर कळाले की, व्हिडिओमधील सर्व नाणे “स्मारक नाणी” आहेत.

एखाद्या विशिष्ट घटनेच्या स्मरणार्थ किंवा एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त विशिष्ट डिझाइनसह “स्मारक नाणी” जारी केले जातात.  

या श्रेणीतील नाणी केवळ संग्राहक वस्तू असतात, तर काही देश नियमित चलनासाठी स्मारक नाणी देखील जारी करतात. परंतु, या ठिकाणी असे कोणतेही नाणे चलनात जारी करण्यात आले नाही.

एक हजाराची नाणी

सदरील महितीच्या आधारे कीव्हडर्स सर्च केल्यावर टाइम्स ऑफ इंडियाने 22 जुलै 2022 रोजी बातमी दिली होती की, “तंजावरमधील बृहदीश्‍वर मंदिराच्या 1000 वर्षांच्या स्मरणार्थ एक हजार रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते. तसेच 2010 मध्ये देखील तंजावर मंदिराचे 5 रुपयांचे स्मारक नाणे जारी करण्यात आले होते.”

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमधिल आणि 2022 मध्ये जाहीर करण्यात आलेले स्मारक नाणे एकच आहे.

दोनशे रुपयांची नाणी

2015 मध्ये तात्या टोपे त्यांच्या दोनशेव्या जयांतीनिमित्त तत्कालीन सांस्कृतिक व पर्यटन आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या हस्ते 2016 मध्ये दहा आणि दोनशे रुपयांचे स्मरणार्थी नाणे जारी करण्यात आले होते.

पाचशे रुपयांची नाणी

2015 मध्ये भारत-आफ्रिकाच्या तिसऱ्या शिखर परिषद निमित्त 500 रुपयाचे नाणे काढण्यात आले होते. 

खालील व्हिडिओमध्ये आपण पाचशे रुपयाचे नाणे पाहू शकतात.

125 रुपयांची नाणी

2021 मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 125 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते. ते नाणे आपण येथे पाहू शकातात.

खालील व्हिडिओमध्ये आपण 28 सेकंदावर आपण नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे छाया चित्र असलेले 125 रुपयांचे नाणे पाहू शकतो.

शंभर रुपयांची नाणी

आज तकच्या बातमीनुसार  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमाचे 21 एप्रिल 2023 रोजी शंभर भाग पूर्ण झाल्यानिमित्त शंभर रुपयाचे नाणे जाहीर करण्यात आले होते. याआधीदेखील माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ, राजमाता विजया राजे सिंधिया यांची जन्मशताब्दी, महाराणा प्रताप यांच्या 473 व्या जयंती निमित्त शंभर रुपयाचे नाणे जारी करण्यात आले होते. नाण्यांसंबंधित अधिक माहिती आपण येथे पाहू शकतात.

साठ रुपयांची नाणी   

भारत सरकारसाठी “स्मारक नाणी” बनवण्याचे काम ‘द गव्हर्मेंट मिंट’ संस्था कोलकातामध्ये करत असते. 2012 मध्ये या संस्थेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त 60 रुपयांची नाणी जारी करण्यात आली होती. अधिक माहिती येथे पाहू शकतात.

तसेच 2014 मध्ये, कॉयर बोर्डाच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी 60 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते. अधिक माहिती येथे पाहू शकतात.

75 रुपयांची नाणी

सर्वप्रथम 2010 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 75 वर्ष (प्लॅटिनम ज्युबिली) पूर्ण झाल्यानिमित्त 75 रुपयांचे नाणे जाही करण्यात आले होते. 

तसेच 2018 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे प्रथमच तिरंगा फडकावल्याच्या 75 व्या वर्धापन दिना निमित्त 75 रुपयांचे नाणे जाही करण्यात आले होते. 

पुढे 6 ऑक्टोबर 2020 रोजी अन्न आणि कृषी संस्थेच्या 75 व्या वर्धापन दिना निमित्त देखील 75 रुपयांचे नाणे जाही करण्यात आले होते.

खालील फोटोमध्ये आपण तिन्ही 75 रुपयांची नाणी पाहू शकतात. 

विशेष म्हणजे या वर्षी 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 75 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले आहे. या नाण्यावर आपण नव्या संसद भवनाची इमारतीची डिझाईन आहे. अधिक माहिती येथे वाचा.

नवीन संसद भवना पंतप्रधानांनी जाहीर केल्या नाण्याचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधिल नाणी चलनातील नसून ते ‘स्मारक नाणी’ आहेत आणि नोटा बनावट आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नवीन नाणे चलनात आले नसून ते ‘स्मारक नाणी’ आहेत; बनावट नोटांचा व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: Missing-Context