FAKE: यूपीमध्ये मत मागण्यासाठी गेलेल्या स्मृती ईराणींना लोकांनी हुसकावून लावले का?

False राजकीय

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election 2022) पहिल्या टप्प्याचे मतदान आज सुरू झाले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जुन्या आणि संदर्भहीन फोटो आणि व्हिडिओंचीसुद्धा राळ उठलेली आहे.

भाजपाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या गाडीसमोर लोक आंदोलन करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे, की मतदान मागण्यासाठी गेलेल्या स्मृती ईराणींना लोकांनी असे हुसकावून लावले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की हा व्हिडिओ दोन वर्षे जुना असून स्मृती ईराणी त्यावेळी मत मागण्यासाठी गेल्या नव्हत्या.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते, की जमावाने स्मृती ईराणींच्या कार समोर घोषणाबाजी करत त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. शेवटी स्मृती ईराणी गाडीतूनच एका मुलीशी बोलतात आणि तिला मास्क घालण्यास सांगतात. 

हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की “भाजपच्या स्मृती इराणींना यूपीमध्ये तीव्र विरोध. हिम्मत असेल तर मते मागून दाखवा,असे लोक म्हणाले, पण मीडिया दाखवत नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे ते पाहुया. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ‘हाथरस’ असेदेखील म्हणतो. हा धागा पकडून कीवर्ड सर्च केल्यावर कळाले, की हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. 

नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार, 3 ऑक्टोबर 2020 रोजी स्मृती ईराणी यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये आंदोलन केले होते. हाथरस बलात्कार प्रकरणात स्मृती ईराणी यांनी कोणतीच भूमिका न घेतल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. 

‘न्यूज 18’च्या बातमीनुसार, काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आणि स्मृती ईराणींना उद्देशून ‘चले जाव’चे नारे लावले होते. महिला अत्याचार प्रकरणांमध्ये वाढ होत असल्यामुळे स्मृती ईराणींनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली होती.

सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्नदेखील केला. शेवटी ईराणी यांनी आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधला. 

मूळ बातमी – न्यूज 18

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते, की स्मृती ईराणींचा हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्याचा सध्या सुरू असलेल्या यूपी विधानसभा निवणुकीसी काही संबंध नाही. हाथरस बलात्कार प्रकरणानंतर ईराणी यांनी राजीनामा द्यावा यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये हे आंदोलन केले होते. त्यामुळे मत मागण्यासाठी गेल्यावर स्मृती ईराणी यांना लोकांनी हुसकावून लावल्याचा दावा असत्य ठरतो.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:FAKE: यूपीमध्ये मत मागण्यासाठी गेलेल्या स्मृती ईराणींना लोकांनी हुसकावून लावले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False