शेतकरी आंदोलनात काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली का? वाचा सत्य

False राजकीय | Political

शेतकरी आंदोलनामध्ये स्वतंत्र काश्मीरची मागणी करणाऱ्या नेत्यांचे समर्थन करण्यात येत आहे, असा दावा केला जात आहे. एका शीख युवकाने फुटीरतावादी नेत्यांच्या सुटकेची मागणी करणारे पोस्टर हातात धरल्याचा फोटो शेअर करून म्हटले की, हा फोटो शेतकरी आंदोलनामधील आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो शेतकरी आंदोलनातील नाही.

काय आहे दावा?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोत शीख तरुणाने स्वतंत्र काश्मीरचे समर्थन करणाऱ्या नेत्यांची सुटका करण्याची मागणी करणारे पोस्टर हातात धरलेले आहे. अनेकांनी हा फोटो शेअर करून आक्षेप घेतला की, शेतकरी आंदोलनात अशी देशविरोधी मागणी का केली जात आहे?

फेसबूकआर्काइव  

तथ्य पडताळणी 

शेतकरी आंदोलनासंदर्भातील अनेक खोट्या बातम्यांचे सत्य फॅक्ट क्रेसेंडोने समोर आणलेले आहे. त्यामुळे हा फोटो खरंच शेतकरी आंदोलनामधील आहे का हे तपासणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर ‘सिख सियासत’ वेबसाईटवरील 14 मार्च 2020 रोजी प्रकाशित झालेल्या एका लेखात तो आढळला. कलम 370 रद्द केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या फुटीरतावादी नेत्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनातील फोटो म्हणून तो वापरण्यात आले आहे. ‘दल खालसा’ संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले होते. 

सिख सियासत न्यूजआर्काइव्ह 

याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडो हिंदीने ‘सिख सियासत’चे संपादक परमजीत सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की हा फोटो 9 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या आंदोलनाचा आहे. फुटीरतावादी नेत्यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांना काश्मीरमध्ये जाण्यापासून कठुआमध्येच रोखण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे आंदोलन केले होते. या फोटोचा सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी काही संबंध नाही. 

परमजीत सिंह यांनी फॅक्ट क्रेसेंडोला दल खालसा संघटनेतर्फे आलेला ई-मेलसुद्धा पाठवला. त्यातून स्पष्ट होते की हा फोटो 2019 मधील आहे. ईमेलमध्ये आंदोलनाचे इतर फोटोदेखील आहेत.


हेदेखील वाचा:

शेतकऱ्यांनी जिओ कंपनीचा टॉवर जाळला म्हणून तीन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

1998 साली काँग्रेसच्या काळात गोळीबारामुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे का?


यानंतर कीवर्ड सर्चद्वारे शोधल्यावर जम्मू लिंक न्यूज नावाच्या युट्यूब चॅनेलवर 9 डिसेंबर 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आढळला. 

 या व्हिडिओमध्ये सध्या सध्या व्हायरल होत असलेला शीख तरुणदेखील दिसतो. तसेच या चॅनेलच्या वेबसाईटवरदेखील 10 डिसेंबर 2019 रोजी या आंदोलनाची बातमी प्रकाशित झालेली आहे. 

निष्कर्ष 

यावरून सिद्ध होते की, काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांच्या सुटकेची मागणी करणारा तो फोटो शेतकरी आंदोलनातील नाही. ‘दल खालसा’ संघटनेतर्फे 2019 मध्ये करण्यात आलेल्या प्रदर्शनामधील तो फोटो असून चुकीच्या माहितीसह शेतकरी आंदोलनाशी त्याला जोडण्यात येत आहे.

[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये!]

Avatar

Title:शेतकरी आंदोलनात काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली का? वाचा सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: False