
रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, 1998 साली काँग्रेस सरकारच्या काळात गोळीबाराने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे.
काय आहे दावा?
पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या बँक अँड व्हाईट फोटोमध्ये रस्त्यावर मृतदेहांचा खच साचलेला आहे. सोबत लिहिलेले आहे की, “काँग्रेस सरकारच्या काळात 12 जानेवारी 1998 रोजी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. तेव्हा आंदोलकांवर 300 गोळ्या चालविण्यात आल्या. त्यात 27 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि आंदोलन दडपून टाकण्यात आले.”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह | फेसबुक
तथ्य पडताळणी
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी सोशल मीडियावर अनेक चुकीचे दावे करण्यात येतात. फॅक्ट क्रेसेंडोने अशा अनेक दाव्यांचे सत्य समोर आणलेले आहे. ते तुम्ही येथे वाचू शकता. त्यामुळे या फोटोचे सत्य जाणून घेणे आवश्यक ठरते.
सर्वप्रथम फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो 1998 मधील नसून 2007 सालचा आहे.
विरू पोपुरी नामक लेखकाच्या ब्लॉगवर 2007 साली अपलोड केलेला एक फोटो आढळला. व्हायरल होत असलेल्या बँक अँड व्हाईट फोटोचे हे रंगीत व्हर्जन आहे.
सोबतच्या माहितीनुसार, हा फोटो आंध्र पदेशमधील मोदीगुंडा गावात 28 जुलै 2007 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचा आहे. त्यावेळीच्या आंध्र पदेशमधील विरोधी पक्षांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये सहभागी झालेल्या डाव्या पक्षांच्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला होता.
मूळ वेबसाईट – विरू पोपुरी ब्लॉग । अर्काइव्ह
हा धागा मिळाल्यानंतर अधिक शोध घेतला. मुंबई मिरर आणि रेडिफ वेबसाईटवरील बातम्यांनुसार, ‘गोरगरिबांना जमिन वाटप करा’ या मागणीसाठी आंध्र पदेशमध्ये डाव्या पक्षांनी बंद पुकारला होता. खम्मम जिल्ह्यातील मोदीगुंडा गावात बंदला समर्थन म्हणून सीपीआय आणि सीपीआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 28 जुलै 2007 रोजी रॅली काढून रस्त्यावर धरणे आंदोलन केले होते.
पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुरू झाल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आधी लाढीचार्ज आणि नंतर आंदोलकांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये सुमारे आठ जणांचा मृत्यू झाला.
गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी यावेळी एक-47 बंदुकीचा वापर केला होता. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेने सामान्य नागरिकांवार एक-47 बंदुकीचा वापर केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला होता. विरोधीपक्ष तेलगु देसम आणि डाव्या पक्षांनी तत्कालिन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी (काँग्रेस) यांच्यावर सडकून टीका केली होती. (संदर्भ – रेडिफ | अर्काइव्ह)
या घटनेची ई-टीव्हीने केलेली त्यावेळची बातमी पाहू शकता.
12 जानेवारी 1998 रोजी काय झाले होते?
नैसर्गिक संकटामुळे मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे मोठे झाले होते. त्याबदल्यात नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ‘किसान संघर्ष समिती’ अंतर्गत समाजवादी पक्षाचे तत्कालिन आमदार डॉ. सुनिलाम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलकांनी मुलताई येथील तेहसीलला 12 जानेवारी 1998 रोजी घेराव घातल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सुमारे 19 आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार होते.
याप्रकरणी कोर्टाने डॉ. सुनिलाम व इतर दोघांना हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली होती. (संदर्भ – इंडियन एक्सप्रेस)
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो 1998 साली झालेल्या शेतकरी आंदोलनाचा नाही. तो 2007 साली आंध्र प्रदेशमध्ये डाव्या आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराचा आहे. परंतु, हे खरं आहे की, 12 जानेवारी 1998 रोजी मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाला होता. पण हा फोटो त्या घटनेचा नाही.

Title:1998 साली काँग्रेसच्या काळात गोळीबारामुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
