तालिबान मुलींचा लिलाव करत असल्याचा हा व्हिडिओ नाही; ते केवळ एक पथनाट्य होते, वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

साखळीने बांधलेल्या महिलांचा भररस्त्यावर लिलाव सुरू असल्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल होत आहे. अफगाणिस्तानामध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथे अशा प्रकारे महिलांवर अत्याचार होत असल्याचा म्हणून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 2014 साली लंडनमध्ये झालेल्या एका पथनाट्याचा आहे.

काय आहे दावा?

व्हिडिओमध्ये दिसते की, साखळीने बांधलेल्या महिलांना उभे करून एक व्यक्ती रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना बोली लावण्यास सांगतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, “ज्या लोकांनी 2 दिनार हिंद च्या मुली विकल्या होत्या आज त्यांच्याच मुली ते 100 रुपया ला विकत आहेत हे लोक किती नीच मानसिकता आहे या लोकांची आणि भारतातील हिंदु विरोधी लोक सनातन हिंदु संस्कृती मानणाऱ्याना हिंदु आतंकवादी म्हणता. एकमेव हिंदु संस्कृती आहे की शत्रूच्या स्त्री ला पण आई व बहिणीच्या रुपात बघतात.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण केल्यावर एके ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या बसवर “WINDSORIAN” असे लिहिलेले आहे. लंडन शहरतील एका कंपनीची बस आहे. तिचा फोटो तुम्ही येथे पाहू शकता.

तसेच व्हिडिओच्या शेवटी सर्व लोक “ISIS Terrorist” असे देखील घोषणा देतात. यावरून व्हिडिओसोबत केल्या जाणाऱ्या दाव्याबाबत शंका उपस्थित होते. 

कीवर्ड्सद्वारे सर्च केल्यावर अनेक भारतीय वाहिन्यांनी 2014 साली हा व्हिडिओ बातम्यांमध्ये दाखविल्याचे आढळले. इंडिया टीव्हीच्या एका बातमीपत्रामध्ये या व्हिडिओला लंडनमध्ये सादर करण्यात आलेले पथनाट्य असे म्हटलेले आहे.

शिवाय अरी मुराद नावाच्या एका कुर्दीश माहितीपट दिग्दर्शकाने फेसबुक हाच व्हिडिओ चांगल्या क्वालिटीमध्ये शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये मेगाफोन घेऊन बोलणारा व्यक्ती म्हणतो की, “इराक आणि सिरियामध्ये जेथे आयसिसने (ISIS) ताबा मिळविला आहे तेथे महिलांची अशी खुलेआम विक्री केली जोते. आम्ही आयसिसच्याविरोधात आहोत.”

या व्हिडिओमध्ये पथनाट्य सादर करणारे कलाकर कपडे बदलतानादेखील दिसतात.

मूळ पोस्ट – फेसबुक 

न्यूजवीक युरोपच्या बातमीनुसार, कुर्दीश कार्यकर्त्यांनी लंडनच्या रस्त्यावर पथनाट्याद्वारे आयसिस करीत असलेल्या महिलांच्या लिलावाकडे लक्ष वेधण्यासाठी हे पथनाट्य आयोजित करण्यात आले होते.

लंडनमधील कम्पॅशन फॉर कुर्दीस्तान नामक संघटनेने 14 ऑक्टोबर 2014 रोजी इग्लंडच्या संसदेसमोरील रस्त्यावर हे पथनाट्य सादर केले होते, अशी बीबीसीने बातमी दिली होती.

क्रिस्टीयन मॉनिटरच्या बातमीनुसार, व्हिडिओ मेगाफोन घेऊन बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव करम कृपा असे आहे. त्याने सांगितले की, जे सिरिया आणि इराकमध्ये होऊ शकते ते लंडनमध्येदेखील होऊ शकते. जगाचे लक्ष याकडे जावे म्हणून आम्ही हे पथनाट्य सादर केले.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ अफगाणिस्तानमधील नाही तसेच तो महिलांच्या खुऱ्याखुल्या लिलावाचादेखील नाही. लंडनमध्ये आयोजित एका पथनाट्याचा तो व्हिडिओ आहे. चुकीच्या दाव्यासह तो व्हायरल केला जात आहे.

Avatar

Title:तालिबान मुलींचा लिलाव करत असल्याचा हा व्हिडिओ नाही; ते केवळ एक पथनाट्य होते, वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False