पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारताने ‘या’ गाण्यावर बंदी घातली होती का? वाचा सत्य

False सामाजिक

प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनी गायिलेले एक गाणे सोशल मीडियावर शेअर करून दावा केला जात आहे की, काश्मीरविषयक या गाण्यामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारताने त्यावर बंदी घातली होती.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य आहे. या गाण्यावर कधीच बंदी घालण्यात आली नव्हती.

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये मोहम्मद रफी यांनी गायिलेल्या एका ब्लॅक अँड व्हाईट गाण्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. “जन्नत की तस्वीर है, तस्वीर ना देंगे – कश्मीर है भारत का, कश्मीर ना देंगे” अशा गाण्याच्या ओळी आहेत.

सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “ह्याच रफी ह्यांनी गायलेल्या गाण्याने पाकिस्तानला मिर्च्या झोंबल्या होत्या.आणि त्यांनी भारत सरकारला ह्या गाण्यावर बंदी आणा यला लावली. आणि आणि त्यावेळच्या नाक्रत्या सरकारने आणली पण. तेच हे दुर्मिळ गाणे. पूर्ण ऐका. फार कमी ऐकायला मिळते.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे हे पाहुया. कीवर्ड्सद्वारे सर्च केल्यावर कळाले की, 1966 साली प्रदर्शित झालेल्या ‘जोहर इन काश्मीर’ नावाच्या चित्रपटातील हे गाणे आहे. आय. एस जोहर दिग्दर्शित या चित्रपटाचे कथानक फाळणीच्या पार्श्वभूमीवर चाळीसच्या दशकातील काश्मीरमध्ये घडते.

‘शेमारू’ म्यूझिक कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर हे गाणे अपलोड केलेले आहे. ते तुम्ही खाली पाहू शकता. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे गाणे कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केले असून, इंदिवर यांनी ते लिहिलेले आहे.

युट्यूबवर ‘जोहर इन कश्मीर’ हा चित्रपट उपलब्ध आहे. चित्रपटाच्या 45.40 मिनिटांपासून हे गाणे पाहू शकता. चित्रपटाचा मुस्लिम नायक गाण्यातून भारत व काश्मीरचे गुणगाण कसे केले जाऊ शकते हे सांगण्यासाठी हे गाणे गातो. 

काही झाले तरी आम्ही (भारतीय) कधीच काश्मीर देण्यात नाही, असे या गाण्यात म्हटलेले आहे. तसेच गाण्यात भारतीय सैन्याच्या युद्धपराक्रमाचे वर्णनदेखील आहे. तसेच धर्माच्या आधारावर देशात दुफळी माजणार नाही, असेदेखील म्हटलेले आहे

जवान की हिम्मत, ये अर्जुन सिंह की वीरता

बढ़ता चला गया, वो रूकावट को चीरता

किया चौधरी ने, पैटन टैंको का सफाया

छोटे से सुदृण ने, बड़ा काम दिखाया

मजहब के नाम पर ये, मुल्क बँट नहीं सकता

ये जिस्म है भारत का,कभी काट नहीं सकता

या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती का याविषयी शोध घेतल्यावर कोणतीही अधिकृत बातमी अथवा माहिती समोर आली नाही. म्हणून फॅक्ट क्रेसेंडोने मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहिद रफी यांच्यासी संपर्क साधला. या गाण्याविषयी केला जाणारा दावा त्यांनी खोटा असल्याचे सांगितले.

“माझ्या वडिलांच्या कोणत्याच गाण्यावर कधीही बंदी घालण्यात आलेली नाही. शिवाय सदरील गाणे चित्रपटातदेखील आहे. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली होती, हा दावा निराधार आहे,” असे ते म्हणाले.

चित्रपट सेन्सॉर बोर्डाने या गाण्यावर आक्षेप घेतला होता हेदेखील तपासले. 17 डिसेंबर 1966 रोजी प्रकाशित झालेल्या गॅझेट रिपोर्टमध्ये सेन्सॉर बोर्डाने सुचविलेल्या बदलांची सूची दिलेली आहे. गॅझेटच्या पृष्ठ क्र. चारवर जोहर इन काश्मीर चित्रपटातील कट्सविषयी माहिती आहे.

त्यानुसार, सेन्सॉर बोर्डाने या गाण्यातून केवळ ‘हाजी पीर’ हे दोन शब्द वगळण्यास सांगितले होते. अंतिम गाण्यामध्ये हे शब्द नाहीत. गाणे डिलीट करण्याचा किंवा त्यावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख सेन्सॉर बोर्डाने केलेला नाही.

गॅझेटमधील पृष्ठ कृमांक चारचा स्क्रीनशॉट. स्रोत – गॅझेट (1966)

निष्कर्ष

यावरुन स्पष्ट होते की, मोहम्मद रफी यांनी गायिलेल्या ‘कश्मीर ना देंग’ या गाण्यावर भारत सरकारने बंदी घातली नव्हती. ते गाणे चित्रपटातून वगळण्यात आले नव्हते. या गाण्यासोबत केला जाणारा दावा खोट आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारताने ‘या’ गाण्यावर बंदी घातली होती का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False