रेल्वेच्या शिट्टीमुळे नमाजमध्ये व्यत्यय आल्याने बंगालमध्ये स्टेशनची तोडफोड? या व्हिडिओचे सत्य मात्र वेगळेच…

False सामाजिक

मशिदीवरील भोंगे, सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण, आणि मशिदीसमोर हनुमान चालिसा असे एक ना अनेक मुद्दे तापत असताना रेल्वे स्टेशनच्या तोडफोडीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जातोय की, पश्चिम बंगालमध्ये रेल्वेच्या शिट्टीमुळे नमाजमध्ये व्यत्यय येत असल्याने तेथील मुस्लिमांनी स्टेशनची अशी तोडफोड केली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

तथ्य पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. सदरील व्हिडिओ किमान तीन वर्षे जुना असून सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलनाच्या दरम्यान पश्चिम बंगालमध्ये अशी हिंसा उसळली होती. 

काय आहे दावा?

संतप्त जमाव काठ्या, दंडुक्यांनी रेल्वेस्टेशनच्या खिडक्या, दरवाजे, कठड्यांची तोडफोड करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते. काही लोक रेल्वेपटरीसुद्धा उखडत आहेत. यामध्ये लहानलहान मुलांचासुद्धा समावेश आहे. हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “रेल्वेच्या व्हीसल (हॉर्न)ने नमाज मध्ये डिस्टर्ब होते म्हणून वेस्ट बंगाल मधील मुरशीदबाद जिल्ह्यातील महिषासुर रेल्वे स्थानक मुस्लिमांनी तोडले.”

मूळ पोस्ट – ट्विटरफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे ते पाहू. व्हिडिओत एका ठिकाणी स्टेशनचे नाव ‘Naopara Mahishasur’ (नवपाडा महिषासुर) असे ठळक दिसते. पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद जिल्ह्यातील नवपाडा गावातील हे रेल्वेस्थानक आहे. 

विविध कीवर्डद्वारे सर्च केल्यावर हाच व्हिडिओ 2019 मध्ये अनेकांनी फेसबुकवर शेअर केल्याचे आढळले. उदाहरणार्थ हे पाहा –

15 डिसेंबर 2019 रोजी या युजरने नवपाडा महिषासुर स्थानकावर तोडफोड केल्याचे व्हिडिओ शेअर केले होते. म्हणजेच ही घटना किमान तीन वर्षे जुनी आहे.

ही तोडफोड का करण्यात आली होती?

2019 साली केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणला होता. या कायद्याविरोधात देशभरात आंदोलने झाली होती. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसात्मक वळणही लागले. याच दरम्यान पश्चिम बंगालमधील नवपाडा महिषासुर रेल्वे स्थानकावर संतप्त जमावाने हल्ला केला होता. 

वाईल्ड फिल्म इंडिया नामक अधिकृत युट्यूब चॅनलवर या हल्ल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. 18 नोव्हेंबर 2019 रोजी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओच्या 26 व्या सेकंदापासून आपण व्हायरल व्हिडिओमधील दृश्य पाहू शकता. 

सोबतच्या माहितीनुसार, सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) प्रदर्शन करताना संतप्त जमावाने नवपाडा स्टेशनची तोडफोड केली होती. मुरशीदाबाद जिल्ह्यातील विविध स्टेशन्सवर अशी तोडफोड झाल्याचे वृत्त समोर आले होते. आंदोलनकारी प्रथम निमतिता स्थान, पोरडंगा स्थानक आणि नंतर नवपाड़ा महिषासुर स्थानकात जमा झाले होते. 

या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने मग सागरदिघी ठाण्यातील एसडीपी विद्युत तारफदार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, “नवपाडा महिषासुर स्थानकावर सध्या असा कोणताही हल्ला झालेला नाही. व्हायरल व्हिडिओतील घटना जुनी आहे. नमाजला व्यत्यय आल्यामुळे मुस्लिमांनी स्टेशनची तोडफोड केली हा दावा पूर्णतः असत्य आहे.”

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, रेल्वेस्थानकाची तोडफोड करण्याचा हा व्हिडिओ तीन वर्षे जुना आणि सीएए विरोधातील आंदोलनाच्या दरम्यानचा आहे. रेल्वेच्या शिट्टीच्या आवाजाने नमाज पठणात व्यत्यय आल्यामुळे ही तोडफोड करण्यात आली हा दावा खोटा आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:रेल्वेच्या शिट्टीमुळे नमाजमध्ये व्यत्यय आल्याने बंगालमध्ये स्टेशनची तोडफोड? या व्हिडिओचे सत्य मात्र वेगळेच…

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


Leave a Reply