लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांच्या मुलीची परीक्षा न देताच UPSC मध्ये निवड झाली का? वाचा सत्य

False राजकीय

लोकसभा अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ओम बिर्ला यांच्या मुलीने नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवले. पहिल्याच प्रयत्नात अंजली बिर्लाची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर खासदार सुप्रीया सुळे यांच्यासह विविध नेत्यांनी तिचे अभिनंदन केले. 

सोशल मीडियावर मात्र अंजली बिर्लाची परीक्षा न देता ‘लॅटरल पद्धती’ने निवड झाल्याचा दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी  आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) यासंदर्भात फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य आहेत. अंजली बिर्ला हिने रीतसर परीक्षा दिल्यानंतरच तिची निवड झाली आहे.

काय आहे दावा?

ओम बिर्ला आणि त्यांची मुलगी अंजली यांचा फोटो शेअर करून म्हटले आहे की, ‘ही आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी. या शासनाने आणलेल्या ‘लॅटरल एंट्री’ मधून थेट IAS झालीय. इकडं आपली मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करत, आयुष्याची पाच-पाच वर्षे ‘घासत’ बसतात. आणि अशा नोकऱ्यांमध्ये ‘आरक्षण’ मिळावं, म्हणून आपण इकडे सरकार बरोबर आणि कोर्टात लढत बसतो. बहुजनांच्या हुशार, कष्टाळू आणि पात्र मुलांचं आयुष्य बरबाद करणारी ही व्यवस्था आणलीय मोदी सरकारने.’

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम जाणून घेऊ की, ‘लॅटरल एन्ट्री’ म्हणजे काय असते. खासगी क्षेत्रात मोठ्या पदांवर काम करणाऱ्या प्रतिभावान अधिकाऱ्यांना विविध सरकारी विभागांमध्ये सचिव, संचालक किंवा संयुक्त सचिव पदावर थेट नियुक्त करण्याला ‘लॅटरल एन्ट्री’ म्हणतात. केंद्र सरकारने 2017 साली नागरी सेवा परीक्षांमध्ये थेट भरतीसोबतच ‘लॅटरल प्रवेश’ देण्यासंदर्भाव प्रस्ताव दिला होता.

आयएएस अधिकाऱ्यांची कमतरता भासत असल्यामुळे खासगी कंपन्यांमधील अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संधी देऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा यामागे सरकारचा विचार होता. थोडक्यात काय तर परीक्षा न देता तुमच्या खासगी अनुभवाच्या जोरावर आयएएस अधिकारी होण्याचा हा मार्ग आहे. 

मग अंजली बिर्लाची अशीच परीक्षा न देता ‘लॅटरल एन्ट्री’ झाली का?

पहिली गोष्ट म्हणजे अंजली बिर्ला ही केवळ 23 वर्षांची आहे. त्यामुळे तिची खासगी कंपनीच्या अनुभवावरून आयएएस म्हणून निवड होणे (‘लॅटरल एन्ट्री’) शक्य नाही.

4 जानेवारी रोजी यूपीएससीने नागरी सेवा परीक्षेची (2019) राखीव यादी जाहीर केली. यामध्ये एकुण 89 उमेदवारांची नावे आहेत. त्यात  67 क्रमांकावर अंजली बिर्लाचे नाव आहे.  सोबत तिचा अनुक्रमांकसुद्धा दर्शविलेला आहे. 

मूळ यादी – UPSC

ही यादी जाहीर करताना आयोगाने स्पष्ट म्हटले आहे की, सदरील 89 जणांची ही राखीव यादी (Consolidated  Reserve  List) आहे. नागरी सेवा परीक्षेचा (2019) अंतिम निकाल गेल्या वर्षी 4 ऑगस्ट रोजी लागला होता. त्यावेळी 927 रिक्त पदांसाठी आयोगाने पहिल्यांदा 829 उमेदवारांचा निकाल जाहीर केला आणि त्याचबरोबर राखीव यादीसुद्धा तयार केली होती.

येथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे, यूपीएससीची परीक्षा दिली असेल तरच या यादीमध्ये उमेदवाराचे नाव येऊ शकते. अर्थात, अंजली बिर्ला यांचे नाव यादीत आहे म्हणजेच त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आहे.

आयएएस अधिकारी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला तीन टप्पे पार करावे लागतात. 

1. पूर्वपरीक्षा

2. मुख्य परीक्षा

3. मुलाखत

सर्वप्रथम उमेदवार पूर्वपरीक्षा देतात. या परीक्षेत जे पास होतात तेच पुढे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. मग मुख्य परीक्षेत ज्यांची निवड होते त्यांना आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलविण्यात येते. अखेर, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या गुणांच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाते. ही निवड होणे म्हणजेच अंतिम निकाल जाहीर होणे. 

अंजली बिर्ला यांनी हे तीन्ही टप्पे पार केले आहेत.

आयोगाच्या वेबसाईटवर नागरी सेवा परीक्षेच्या (2019) पूर्वपरीक्षेचा निकाल आणि मुख्य परीक्षेचा निकाल उपलब्ध आहे. या दोन्ही निकालांमध्ये अंजली बिर्ला हिचा अनुक्रमांक (0851876) आहे. म्हणजेच तिने या दोन्ही परीक्षा दिल्यानंतर ती मुलाखतीसाठी पात्र ठरली.

मग आम्ही निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलखतींचे वेळापत्रक शोधले. त्यामध्येसुद्धा अंजली बिर्लाचा अनुक्रमांक (0851876) आहे. 20 मार्च 2020 रोजी दुपारी 1 वाजता तिला मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. विशेष म्हणजे अंजलीने त्याच दिवशी (20 मार्च) तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केंद्रीय आयोग कार्यलायामधील फोटो शेअर केला होता.

मूळ वेबसाईट – यूपीएसएसी

ही राखीव यादी काय असते?

नागरी सेवा परीक्षेचा (2019) अंतिम निकाल 4 ऑगस्ट 2020 रोजी लागला आणि त्यात अंजलीचे नाव नव्हते तरी राखीव यादी जाहीर करून मुद्दामहून तिची निवड करण्यात आली, असासुद्धा आरोप करण्यात येत आहे. 

परंतु, हा आरोपसुद्धा निराधार आहे. कारण यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करताना एक राखीव यादीसुद्धा तयार केली जाते. नागरी सेवा परीक्षा नियम, 2019 च्या नियम -16 (4) आणि (5) मध्ये अशी राखीव तयार करण्याची तरतूद आहे. 

खुल्या प्रवर्गात (General/open)  निवड झालेल्या आरक्षित वर्गातील उमेदवारांनी जर आरक्षित स्थितीनुसार सेवा आणि केडर निवडले तर एक खुली जागा रिक्त होऊ शकते. असे झाल्यास ती भरून काढण्यासाठी राखीव यादीतील उमेदवारांना संधी दिली जाते. थोडक्यात काय तर ही एक प्रकारची वेटिंग लिस्ट असते. 

अंतिम निकाल निवड झालेल्या उमेदवारांची प्राधान्य निवडीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राखीव यादी गोपनीय ठेवण्यात येते. त्यामुळे अंजली बिर्लाची निवड काही कायद्याबाह्यपद्धतीने झालेली नाही. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी परीक्षा न देताच आयएएस अधिकारी झालेली नाही. तसेच लॅटरल एन्ट्रीद्वारेसुद्धा तिची वर्णी लागलेली नाही. तिने रीतसर परीक्षा देऊन हे यश मिळवलेले आहे. सोशल मीडियावर तिच्या निवडीविषयी केले जाणारे दावे असत्य आहेत.

[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये!]

Avatar

Title:लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांच्या मुलीची परीक्षा न देताच UPSC मध्ये निवड झाली का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False