सोशल मीडियावरील एका व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, कथित “Alphelion Phenomenon” मुळे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर वाढणार असून त्यामुळे थंढी आणि रोगराई पसरणार. 22 ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहील, असे मेसेजमध्ये म्हटलेले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेज खोटा आहे. पृथ्वी आणि सूर्याचे अंतर दरवर्षी कमी आणि जास्त होत असते.

काय आहे दावा?

व्हायरल मेसेजमध्ये म्हटले की, “उद्यापासून 22 ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहील. याला अल्बेलियन घटना म्हणतात. ही उद्या सकाळी 5-27 वाजता सुरू होईल. Alphelion Phenomenon चे परिणाम आपण फक्त पाहणारच नाही तर अनुभवू देखील शकतो. ते ऑगस्ट २०२२ मध्ये संपेल. या काळात आपण पूर्वी कधीच नसलेल्या थंडीचा अनुभव घेऊ शकतो.. त्यामुळे आपले शरीर दुखते आणि घसा भरतो, ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होतो. म्हणून, जीवनसत्त्वे आणि इतर निरोगी अन्न उत्पादनांसह आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे चांगले आहे. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर 90,000,000 किमी आहे. पण या Alphelion Phenomenon दरम्यान, दोघांमधील अंतर वाढून 152,000,000 किमी होईल. म्हणजेच 66% वाढ.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील मेसेजमधील दाव्याची एक-एक पडताळणी करू.

चूक क्र. 1 - Alphelion Phenomenon?

सर्वप्रथम तर मेसेजमध्ये हेच नाव चुकलेले आहे. योग्य शब्द Aphelion (एफेलिऑन) आहे.

पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये (elliptical orbit) परिक्रमा करते. लंबवर्तुळाकार कक्षेमुळे पृथ्वी आणि सूर्याचे अंतर नेहमी एकसमान राहत नाही.

कक्षेतील ज्या बिंदूवर पृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर असते त्याला इंग्लिशमध्ये Aphelion आणि मराठीत अपसूर्य बिंदू म्हणतात. याचप्रमाणे कक्षेतील ज्या बिंदूवर पृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक जवळ असते त्याला इंग्लिशमध्ये Perihelion आणि मराठीत उपसूर्य बिंदू म्हणतात.

दरवर्षी पृथ्वी या दोन्ही बिंदूंपाशी जात असते. म्हणजेच सूर्यापासून सर्वात दूर आणि सर्वात जवळ येत असते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी आणि सूर्यातील अंतर सर्वाधिक (15.21 कोटी किमी) असते, तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वात कमी (14.73 कोटी किमी) असते.

चूक क्र. 2 – पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर 9 कोटी?

व्हायरल मेसेजमध्ये पृथ्वी सूर्यापासून 90,000,000 किमी अंतरावर असल्याचे म्हटले आहे. मूळात हे चूक आहे. नासाच्या आकडेवारीनुसार, पृथ्वी आणि सूर्यामधील सरासरी अंतर सुमारे 15 कोटी किमी असते. म्हणजेच Aphelion मध्ये पृथ्वी आणि सूर्याचे अंतर फक्त 21 लाख किमी वाढते. खगोलशास्त्रीय आकडेवारीत हे फार मोठे अंतर नाही. Aphelion आणि Perihelion अंतरामधील फरक 2 टक्क्यांहुनही कमी असतो.

चूक क्र. ३ – Aphelion मुळे थंडीची लाट येते?

वैज्ञानिकांच्या मते पृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर जाते तेव्हा वातावरणात विशेष असा काहीच फरक पडत नाही. दरवर्षीच पृथ्वी या बिंदूंपाशी जात असते. त्यामुळे यंदा थंडीची लाट येऊन रोगराई वाढणार, असे म्हणायला कोणातही शास्त्रीय आधार नाही.

नासाने याविषयी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या ग्रहाच्या वातावरणावर सूर्यापासूनच्या अंतराचा नाही, तर पृथ्वी स्वतःभोवती ज्या अक्षावर फिरते (भ्रमणाक्ष) त्याचा परिणाम होते. पृथ्वीचा भ्रमणाक्ष आणि विषवुवृत्तीय प्रतल यांच्यामध्ये 23.5 डिग्री अंशाचा कोन आहे. म्हणजे आपली पृथ्वी थोडी झुकलेली आहे. पृथ्वीच्या या गुणवैशिष्ट्याचा (वैगुण्य?) वातावरणावर परिणाम होतो.

रंजक गोष्ट म्हणजे, पृथ्वी जेव्हा सूर्याच्या सर्वात जवळ असते तेव्हा पृथ्वाचा भ्रमणाक्ष सूर्यापासून लांब झुकलेला असतो. म्हणून जानेवारी हिवाळा असतो.

सदरील मेसेज चेन्नई वेधशाळेच्या नावाने व्हायरल होऊ लागल्यावर केंद्रीय पत्र व सूचना विभागाने ट्विटरद्वारे खुलासा केला.

https://twitter.com/PIBFactCheck/status/1544969163281940481

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, कथित Aphelion फेनोमेननचा आपल्या वातावरणावर काहीही परिणाम होणार नाही. अशा फेक मेसेजमुळे समाजामध्ये विनाकारण भीती पसरते. त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी अशा व्हायरल मेसेजची सत्य पडताळणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. Aphelion चा जरी नसला तरी, पावसाळाच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:FAKE MESSAGE: येत्या महिन्यात पृथ्वीचे सूर्यापासून अंतर वाढून थंड हवेची लाट येणार का?

Fact Check By: Agastya Deokar

Result: False