
भारतात लग्नासमारंभावर भरमसाठ खर्च केला जातो. परंतु, साखरपुड्यातही आता खर्चाच्या बाबतीत मागेपुढे पाहिले जात नसल्याचे दिसते. साखरपुड्यातील जेवण सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या चौरंगावर वाढण्यात आल्याचा एक व्हिडियो सध्या खूप फिरत आहे. हा व्ह़िडियो तमिळानाडूमधील प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलामुलींच्या साखरपुड्याचा आहे, असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडो या दाव्याचे सत्य जाणून घेतले.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये एका मिनिटाचा व्हिडियो आहे. त्यात म्हटलंय की, “चेन्नई येथील प्रसिद्ध ललित ज्वेलर्स यांचा मुलगा व दुसरे प्रसिद्ध G.R.T. ज्वेलर्स यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या जेवणासाठी सोन्याचे ताट, चमचा व वाटीमध्ये जेवण वाढण्यात आले. त्याचप्रमाणे वऱ्हाडींना बसावयास चांदीच्या खुर्च्या व ताटासाठी चांदीच्या चौंरगाची सोय करण्यात आली होती. प्रत्येक वऱ्हाडीला सोन्याची साखळी देण्यात आली. अशा शाही लग्नाची एक झलक पहाच”
मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक
फेसबुकवरसुद्धा हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे.

तथ्य पडताळणी
सदरील व्हिडियोची सत्यता जाणून घेण्यासाठी युट्यूबवर Lalitha Jewellery And Grt Jewellers Engagement असे सर्च केले. तेव्हा अनेक व्हिडियो समोर आले. तमिळनाडूमधील या दोन प्रसिद्ध दागिन्यांच्या व्यावसायिकांच्या मुलामुलीचा साखरपुडा म्हणून वेगवेगळे व्हिडियो अपलोड करण्यात आले आहेत. ते तुम्ही येथे, येथे आणि येथे पाहू शकता. सप्टेंबर महिन्यांपासून हे व्हिडियो इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
यासंबंधी अधिक शोध घेतला असता आणखी एक व्हिडियो सापडला. यामध्येसुद्धा व्हायरल होत असलेल्या व्हिडियोप्रमाणे सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या चौरंगावर जेवण वाढलेले दिसते. तसेच पाहुण्यांना ओवळून त्यांच्या गळ्यात मोत्याची माळ घातली जात आहे. हा व्हिडियो 24 जानेवारी 2019 रोजी अपलोड करण्यात आला होता आणि तो तमिळनाडूमधीलच श्री वसावी ज्वेलर्सच्या मुलीच्या लग्नातील म्हणून हा व्हिडियो शेयर केला जातोय. तो तुम्ही खाली पाहू शकता.
म्हणजे आता ललिता आणि जीआरटी ज्वेलर्सच्या मुलामुलीचा साखरपुडा आणि श्री वसावी ज्वेलर्सच्या मुलीचे लग्न असे दोन दावे समोर येतात.
फॅक्ट क्रेसेंडोने श्री. वसावी ज्वेलर्सशी संपर्क केला. त्यांनी या व्हिडियोचा वसावी ज्वेलर्स कुटुंबाशी काहीच संबंध नसल्याचे सांगितले. “सोशल मीडियावर चुकीच्या माहितीसह हे व्हिडियो पसरविले जात आहेत. श्री. वसावी ज्वेलर्स कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नातील हा व्हिडियो नाही”, असे स्पष्ट सांगण्यात आले.
मग फॅक्ट क्रेसेंडोने चेन्नईस्थित जीआरटी ज्वेलर्सशी संपर्क साधला. त्यांनीसुद्धा या व्हिडियोशी जीआरटी ज्वेलर्सचा काहीच संबंध नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “जीआरटी ज्वेलर्स कुटुंबातील मुलीचा ललित ज्वेलर्स कुटुंबातील मुलाशी साखरपुडाच झालेला नाही. त्यामुळे हे व्हिडियो त्या सोहळ्याचे असण्याचा काहीच प्रश्न नाही. आमच्या कुटुंबाचे नाव या व्हिडियोशी जोडणे पूर्णतः चूकीचे आहे.”
निष्कर्षः
यावरून सिद्ध होते की, सदरील व्हिडियो जीआरटी ज्वेलर्सच्या मुलीच्या साखरपुड्याचा नाही. तसेच तो श्री वसावी ज्वेलर्सच्या मुलीच्या लग्नाचासुद्धा नाही. सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या चौरंगावर जेवण वाढण्याचा हा व्हिडियो नेमका कोणाचा आहे, अद्याप स्पष्ट नाही. परंतु, जसा दावा केला जातोय त्याप्रमाणे तो जीआरटी ज्वेलर्सच्या मुलीच्या साखरपुड्याचा नाही, एवढे मात्र नक्की.

Title:जीआरटी ज्वेलर्सच्या मुलीच्या साखरपुड्यात जेवणासाठी सोन्याचे ताट आणि पाहुण्यांना मोत्याची माळ?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
