WHO च्या नावाने फिरणारे ते कोरोना व्हेरियंट्सचे वेळापत्रक फेक; अफवांवर विश्वास ठेवू नका

Coronavirus False

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवलेला आहे. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत होत कि कोरोनाचा नवा ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंट समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्या आठवड्यात कोरोनाचे हे नवे रुप आढळले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगावर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट्स कोणकोणत्या महिन्यात पसरणार याचे वेळापत्रकच शेअर केले जात आहे. सोबत दावा केला जात आहे की, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) हे षडयंत्र असून नवीन व्हेरियंट समोर येणे हा निव्वळ बनाव आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले वेळापत्रकच बनावट असून, जागतिक आरोग्य संघटनेने तयार केले नव्हते. 

काय आहे दावा?

व्हायरल फोटोमध्ये तक्ता दिला आहे ज्यामध्ये एका बाजूने व्हेरियंट्सची नावे (डेल्टा, एप्सिलोन, झीटा, एटा, आयोटा ई.) आणि त्यांच्यासमोर ते ज्या महिन्यात पसरणार ते दिले आहे. बाजुला जागतिक आरोग्य संघटना (WHO), वर्ल्ड इकोनॉमिक फोरम आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे लोगो लावलेले आहेत. 

त्यासोबत लिहिले आहे की, “हे आहेत कोरोना काळातील नविन व्हेरियंट आधीच फिक्स केलेले आहेत. कोणत्या कालावधीत कोणता येईल हे यांना माहित आहे. ही तर मॅच फिक्स आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

जागतिक आरोग्य संघटना, जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि वर्ल्ड इकोनॉमिक फोरम आदींच्या वेबसाईट किंवा सोशल मीडियावर कुठेही व्हायरल वेळापत्रकाची माहिती उपलब्ध नाही. 

व्हायरल फोटोतील वेळापत्रकाचे बारकाईने निरीक्षण केल्यावर लगेच लक्षात येईल त्यातील माहितीच चुकीची आहे. या वेळापत्रकात ओमिक्रॉन व्हेरियंट मे 2022 मध्ये येणार असल्याचे नमूद केलेले आहे. परंतु, ओमिक्रॉन व्हेरियंट तर गेल्या आठवड्यात आढळला आहे. थोडक्यात काय तर सहा महिने आधीच तो आला आहे. यावरून या फोटोच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित होते.

आता आपण हे समजून घेऊ की, कोरोनाचे नवीन व्हेरियंट म्हणजे काय आणि त्यांची नावे कशी निवडली जातात.

व्हेरियंट म्हणजे काय?

विषाणूचा एक जेनेटिक कोड असतो आणि वेळेनुसार त्यात काही बदल होऊन त्याचे स्वरूप बदलत असते. अशा या बदललेल्या रुपाला व्हेरियंट म्हणतात. कोरोना विषाणूच्या मूळ रुपातदेखील बदल होऊन नवनवीन व्हेरियंट्स तयार झालेले आहेत. 

आपण जर विषाणूला एखादे झाड मानले तर त्याला फुटणाऱ्या फांद्या ज्या एकमेकांपासून वेगळ्या आहेत त्या म्हणजे व्हेरियंट्स. 


FAKE NEWS: सिंगापूर सरकारने रुग्णांचे शवविच्छेदन करून कोरोना विषाणू अस्तित्वात नसल्याचे म्हटले का?


व्हेरियंटला नाव कसे दिले जाते?

वैज्ञानिक या व्हेरियंट्ची एकमेकांशी तुलना करून अभ्यास करण्यासाठी त्यांना विविध नावे देत असतात. आता या विषाणूंची शास्त्रीय नावे सामान्य लोकांना अवघड वाटू शकतात. जसे, कोविडचे शास्त्रीय नाव SARS-CoV-2 असे आहे. 

सामान्य लोकांपर्यंत कोरोनाची माहित पोहचावी या कारणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने 31 मे 2021 रोजी एक नामकरण प्रणाली स्वीकारली होती. त्यानुसार, कोरोनाच्या व्हेरियंट्सना ग्रीक वर्णमालेतील अक्षरांद्वारे ओळखले जाते. आल्फा (Αα), बीटा (Ββ), गॅमा (Γγ), डेल्टा (Δδ) ओमिक्रॉन (Οο), झीटा (Ζζ) ही ग्रीक वर्णमालेतील अक्षरे आहेत.

थोडक्यात काय तर “कोरोनाच्या व्हेरियंट्सची नावे आधीच ठरलेली आहेत” म्हणजेच ते आधीच तयार होते असे नाही. तो काही षडयंत्राचा भाग नाही.

आतापर्यंत किती व्हेरियंट्स सापडलेले आहेत?

जागतिक आरोग्य संगघटनेच्या (WHO) वेबसाईटनुसार, आतापर्यंत आल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि ओमिक्रॉन असे व्हेरियंट आढळले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या व्हेरियंट्सना अनुक्रमे आल्फा आणि बीटा असे नाव देण्यात आले होते.

भारतात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात डेल्टा व्हेरियंट आढळला होता जो कि त्यापूर्वी आढळलेल्या व्हेरियंट्सपेक्षा 60 टक्के अधिक घातक होता. 24-26 नोव्हेंर रोजी समोर आलेल्या व्हेरियंटला ओमिक्रॉन असे नाव देण्यात आलेले आहेत.

खाली दिलेल्या तक्तावरुन स्पष्ट होते की, व्हायरल यादीतील वेळापत्रक चुकीचे आहे. पोस्टनुसार तर गेल्या सहा महिन्यात एप्लिलॉन, झीटा, एटा, थीटा, आयोटा, कप्पा इतके व्हेरियंट्स निघाले पाहिजे. परंतु, या नावाचे कोणतेही व्हेरियंट सध्या उपलब्ध नाही.

हे खरं आहे की, वैज्ञानिक भविष्यात कोरोनाचे व्हेरियंट्स कधी आणि किती धोकादायक असतील याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, ते महिन्यावारी वेळापत्रक तयार करण्याइतके सोपे काम नाही. तो केवळ अंदाज असू शकतो.


ऑक्सिजन कमी झाल्यावर मनानेच होमिओपॅथी औषध Aspidosperma Q 20 घेऊ नका; वाचा सत्य


निष्कर्ष

व्हायरल होत असलेले वेळापत्रक हे पूर्णतः बनावट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने असे कोणतेही व्हेरियंट वेळापत्रक जारी केलेले नाही. कोविडविषयी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. लवकरात लवकर लस घ्यावी आणि मास्कचा वापर जरूर करावा, असे फॅक्ट क्रेसेंडोतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:WHO च्या नावाने फिरणारे ते कोरोना व्हेरियंट्सचे वेळापत्रक फेक; अफवांवर विश्वास ठेवू नका

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False