श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याचे समर्थन करणारा ‘तो’ तरुण मुस्लिम नाही; त्याचे नाव विकास कुमार

False सामाजिक

वसईतील श्रद्धा वालकर (26) या तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावालाने निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण गाजत असतानाच या खूनप्रकरणी आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील तरुण स्वतःचे नाव राशीद खान असे सांगतो.

हा व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यांसह शेअर केला जात आहे की, मुस्लिम युवक श्रद्धाच्या मारेकऱ्याची बाजू घेत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओमधील तरुण मुस्लिम नसून, त्याने खोटे नाव सांगितले होते.

काय आहे दावा?

45 सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये एक तरुण श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी बोलताना म्हणतो की, “रागाच्या भरात माणूस 35 काय 36 तुकडेसुद्धा करू शकतो. मूड खराब असल्यावर असे होत असते. माझ्यासोबतसुद्धा असे झाले तर मी पण तुकडे करेल.”

व्हिडिओमध्येच हा तरुण त्याचे नाव राशीद खान असे सांगतो. तसेच तो बुलंदशहर येथील रहिवासी असल्याचे म्हणतो. 

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केल्यावर या व्हिडिओतील तरुणाला बुलंदशहर पोलिसांनी 25 नोव्हेंबर रोजी अटक केल्याची बातमी आढळली. 

टाईम्स ऑफ इंडिया आणि जनसत्ताच्या बातमीनुसार, या तरुणाचे नाव विकास आहे. त्याने व्हिडिओमध्ये राशीद खान असे खोटे नाव सांगितले होते. पोलिसांनी माहिती दिली की, विकास नामक तरुण सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत. 

मूळ बातमी – जनसत्ता

बुलंदशहर येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार त्रिपाठी यांनी माहिती दिली की, खोटे नाव सांगून धार्मिक भावना भडकविल्याबद्दल विकास कुमारवर कलम 295 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बुलंदशहरातील स्थानिक हिंदु संघटनेचा सदस्य रविंद कुमार यांनी या व्हायरल व्हिडिओतील तरुणाविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार, सिकन्द्राबाद पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कळाले की, त्याचे नाव ‘राशीद खान’ नसून विकास कुमार आहे. 

बुलंदशहर पोलिसांनी ट्विट करूनदेखील या प्रकरणी सविस्तर माहिती दिलेली आहे. 

स्थानिक पत्रकारांनी अटक केलेल्या तरुणाचे आधार कार्डसुद्धा शेअर केले आहे. त्यावरसुद्धा त्याचे नाव विकास कुमार असे दिलेले आहे. 

सिकन्द्राबाद पोलिस ठाण्याबाहेर माध्यमांशी बोलताना विकासने सांगितले की, त्याला कल्पना नव्हती की त्याचा व्हिडिओ इतका व्हायरल होईल. 

“माझ्या चेहऱ्यावरून लोकांना मी मुस्लिम असल्याचे वाटते. दिल्लीमध्ये युट्यूबवरने जेव्हा मला नाव विचारले तेव्हा त्यांना आधी विश्वास वाटला नाही. म्हणून मी राशीद खान असे नाव सांगितले. मला कळून चुकले की, मी किती चुकीचे बोललो,” असे विकास म्हणाला. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, श्रद्धा वालकर खूनप्रकरणी आक्षेपार्ह विधान करणारा तो तरुण मुस्लिम नाही. त्याने ‘राशीद खान’ असे खोटे नाव सांगितले. यूपी पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याचे खरे नाव विकास कुमार आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याचे समर्थन करणारा ‘तो’ तरुण मुस्लिम नाही; त्याचे नाव विकास कुमार

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False