निजामुद्दीन मर्कझमध्ये झालेल्या धार्मिक सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झालेली आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या लोकांचा त्यामुळे देशभरात शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस व्हॅनमधून आरोपींना घेऊन जाताना एक आरोप पोलिसांवर थुंकल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडियोचा संबंध काही लोक तबलिग जमातशी तर काही लोक याचा कोरोना व्हायरसशी संबंध जोडत आहेत.

तबलिग जमातमध्ये सहभागी लोकांना पोलिस घेऊन जात असताना ते असे थुंकल्याचा दावा केला जात आहे तर, एकाने याला कोरोना जिहाद म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडियोची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.

तपासणीअंती हा व्हिडियो जुना असून, त्याचा तबलिग जमात किंवा कोरोनाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

पोलिस व्हॅनमधून काही आरोपींना नेण्यात येत असल्याचा हा व्हिडियो आहे. एक आरोपी समोर बसलेल्या पोलिसांवर थुंकतो आणि मग पोलिस आरोपीला चोप देताना दिसतात.

Fbdlk.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

फेसबुकवर की-वर्ड्सने शोधले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून या घटनेचा अधिक लांबीचा व्हिडियो शेयर करण्यात आल्याचे आढळले. सोबत दिलेल्या माहितीनुसार ही घटना 29 फेब्रुवारी 2020 रोजीची असून ठाणे पोलिस आरोपींना कोर्टातून कारागृहात नेत असताना झालेल्या वादातून हा प्रकार घडला होता. हा व्हिडियो खाली पाहू शकता.

(सूचना – सदरील व्हिडियोमध्ये शिवीगाळ आहे. लहान मुले आसपास नाहीत याची खात्री करा)

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

लोकमतच्या बातमीनुसार, आरोपी ठाण्यातील रहिवाशी आहे. न्यायबंदी असलेल्या या कैद्याला सुनावणीसाठी मुंबईतील दिंडोशी येथील न्यायालयात नेण्यात आले होते. तिथून परतत असताना पोलीस व्हॅनमध्ये त्याचा पोलिसांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपीने समोर बसलेल्या पोलिसाच्या अंगावर चाल केली व रागाच्या भरात त्या पोलिसावर थुंकला. तसेच त्याने पोलिसाच्या बोटाचा चावाही घेतला. दरम्यान, व्हॅनमध्ये असलेल्या इतर पोलिसांनी मध्ये पडत अखेर या कैद्याला रोखले. दरम्यान, नातेवाईकांनी आणलेले घरचे जेवण घेऊ न दिल्याने या कैद्याने पोलिसांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

Lokmat-1.png

मूळ बातमी येथे वाचा – लोकमतअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडियो जुना आहे. त्याचा तबलिग जमात किंवा कोरोनाशी काही संबंध नाही. त्यामुळे समाजात दुफळी निर्माण होईल, भीतीचे वातावरण पसरेल अशा पोस्ट शेयर न करण्याचे फॅक्ट क्रेसेंडोतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Avatar

Title:पोलिसांवर आरोपी थुंकत असल्याचा व्हिडियो तबलिग जमात किंवा कोरोनाशी संबंधित नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False