टोल भरल्यानंतर गाडी बंद पडल्यास टोल कंपनीला वाहनधारकांना मोफत पेट्रोल द्यावे लागते का? वाचा सत्य

False Social

‘ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती’च्या अध्यक्षा प्रा.रंजना प्रविण देशमुख यांच्या नावाने टोलविषयक एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, टोल नाक्यावर शुल्क भरल्यानंतर प्रवासात जर वाहन खराब किंवा मेडिकल इमर्जन्सी उद्भवल्यास वाहनधारकांना मोफत मदत करण्याची टोल कंपनीची जबाबदारी असते. 

एवढेच नाही तर इंधन संपल्यास टोलपावतीवरील हेल्पलाईन क्रमांकाला फोन करून 5 ते 10 लिटर पेट्रोलही मागवता येते, असासुद्धा मेसेजमध्ये दावा केलेला आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. प्रवासादरम्यान वाहन खराब झाल्यास किंवा इंधन संपल्यास मोफत सेवा देण्याची जबाबदारी टोल कंपनीची नसते. 

काय आहे दावा ? 

व्हायरल होत मेसेजमध्ये ‘ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती’ अध्यक्षा रंजना देशमुख यांच्या नावासह लिहिलेले आहे की, “टोल भरलेल्या पावती जपून ठेवाली पाहिजे. कारण एक्सप्रेस हायवे जर तुमचे वाहन बंद पडले, त्यामधील इंधन संपले किंवा वाहनामध्ये काही बिघाड झाला तर पावती वरील क्रमांकावर फोन केल्यास दहा मिनिटात आपल्या पर्यंत मदत पोहचवली जाईल तसेच आलेल्या वाहनात 5 ते 10 लिटर पेट्रोल मोफत भरण्यात येईल आणि वाहनाची दुरुस्ती देखील केली जाते. प्रवासादरम्यान वाहनाचा अपघात झाला किंवा प्रवासकर्त्यांपैकी कोणाची तब्येत खारब झाली असता फोन केल्यावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टोल कंपन्यांची आहे.

मुळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीशी संपर्क साधून त्यांच्याकडे या मेसेजविषयी विचारणा केली. त्यांनी माहिती दिली की, प्रा. रंजना प्रविण देशमुख या नावाच्या कोणीही समितीच्या अध्यक्षा नाहीत. तसेच समितीतर्फे टोलविषयक व्हायरल होत असलेला व्हायरल मेसेज जारी केलेला नाही. समितीच्या नावाने चुकीची माहिती शेअर होत आहेत. 

टोलचे नियम काय सांगतात?

टोल नाके भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत (NHAI) येतात. गेल्यावर्षी 15 फेब्रुवारीपासून सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केला आहे. 

एबीपीलाईव्हच्या बातमीनुसार 2021 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने FASTag अनिवार्य केला असून जर टोल प्लाझावर ते स्कॅन झाले नाही तर वाहन धारकाला पैसे देण्याची गरज नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधला असता माहिती मिळाली की, व्हायरल मेसेजमधील माहिती निराधार आहे. त्यांनी सांगितले की, आपत्कालिन परिस्थितीसाठी टोलनाक्यावर रुग्णवाहिका आणि वाहनांना टो करणारे वाहन उपलब्ध असणे आवश्य असते. 

परंतु, याचा अर्थ असा नाही की, बंद पडलेले वाहन दुरुस्त करणे किंवा मोफत इंधन देणे ही टोल कंपनीची जबाबदारी असते. गेल्या अनेक वर्षांपासून हा मेसेज सोशल मीडियावर शेअर होत आहे. प्राधिकरणाने वेळोवेळी याचे खंडन केलेले आहे. 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, टोल कंपनीने वाहनांना मोफत इंधन देण्याचा तो व्हायरल मेसेज खोटा आहे. असा कोणताही नियम नाही. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:टोल भरल्यानंतर गाडी बंद पडल्यास टोल कंपनीला वाहनधारकांना मोफत पेट्रोल द्यावे लागते का? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False