टेक महिंद्राचे ऑफिस बंद करण्यासाठी गेलेली ‘ती’ महिला पोलीस नाही. वाचा त्या व्हायरल व्हिडियोचे सत्य

Coronavirus False राजकीय

कोरोना व्हायरसच्या साथीदरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण स्वीकारण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलिसदेखील मुंबई-पुण्यामध्ये सक्तीने हा नियम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीमध्येही सुरु असलेल्या पुण्यातील टेक महिंद्रा कंपनीचे ऑफिस बंद करण्याचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला कंपनीच्या प्रशासनाला ऑफिस का सुरू ठेवले असा जाब विचारत आहे. ही महिला पोलिस इन्स्पेक्टर असल्याचे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला.

काय आहे व्हिडियोमध्ये?

सुमारे चार मिनिटांच्या व्हिडियोमध्ये गुलाबी शर्ट घातलेली महिला कोरोनाच्या काळात ऑफिस का चालू ठेवले असा सवाल विचारताना दिसते. संसर्ग टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होम का करीत नाही असे कडक शब्दात सुनावते. ऑफिसमधील एक महिला त्यांना शांत करताना दिसते. स्टार मराठी पेजने हा व्हिडियो शेयर करताना लिहिले की, शिकलेले लोक जेंव्हा आडमुठ्या सारखे वागतात तेंव्हा शासनापुढे हाच पर्याय शिल्लक राहतो..कंपनी बंद करायला जेव्हा पोलीस येतात..

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

व्हिडियो जर नीट ऐकला तर लक्षात येते की, गुलाबी शर्ट घातलेली महिला म्हणते  – माझ्यासारख्या सामान्य सामाजिक कार्यकर्तीने येऊन सांगायची गरज नव्हती.

जर ही महिला पोलिस आहे तर ती स्वतःला सामाजिक कार्यकर्ती का म्हणेल?

हा धागा पकडून विविध की-वर्ड्सने हा व्हिडियो शोधला. तेव्हा ‘लोकमत’ने हाच व्हिडियो फेसबुकवर शेयर केल्याचे आढळले. त्यात मात्र ही महिला सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड असल्याचे म्हटले आहे. “टेक महिंद्रा बंद करायला जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड जातात…” अशी ‘लोकमत’च्या पोस्टमध्ये कॅप्शन आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

‘लोकमत’ने या संदर्भात बातमीदेखील दिली आहे. त्यात म्हटले की, विमाननगर येथील टेक महिंद्रा या आयटी कंपनीमध्ये जाऊन संजीवनी फाऊंडेशन या संस्थेच्या प्रमुख विशाखा गायकवाड यांनी मॅनेजरला तंबी दिली. तसेच कर्मचाऱ्यांनाही ठरवून कामावर न येण्याचे आवाहन केले. संपूर्ण बातमी आपण येथे वाचू शकता – लोकमत 

फॅक्ट क्रेसेंडोने मग विशाखा गायकवाड यांच्याशी थेट संपर्क साधला. “टेक महिंद्रा कंपनीमधील तो व्हायरल व्हिडियो माझाच असून, मी पोलीस इन्स्पेक्टर नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. कोरोनाचा धोका वाढत असताना कंपन्या अजूनही कर्मचाऱ्यांना कामाला बोलवत आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी मी गुरुवारी (19 मार्च) तेथे गेले होते,” असे त्यांनी सांगितले.

‘टेक महिंद्रा कंपनीवर पोलिसांची करवाई’ अशा खोट्या दाव्यासह हा व्हिडियो व्हायरल झाल्यांनंतर विशाखा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलून याविषयी खुलासा केला. तसेच त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरूनदेखील या घटनेचे फोटो शेयर करून आपली भूमिका स्पष्ट केली. 

त्यांनी लिहिले की, जगाभरात कोविड-19 या महारोगाने थैमान घातले आहे. तरीदेखील अनेक खाजगी कंपन्या आणि काही हॉटेलचालक नियमबाह्य वर्तन करताना आढळतात. विमाननगर मधील गिगास्पेस या आयटी पार्कमध्ये टेक महिंद्रा कंपनीने सर्व सूचना व आदेश धाब्यावर बसवत कमी जागा आणि खचून गर्दित बसणारे कर्मचारी असे भीतीदायक वातावरण या कंपनीमध्ये आहे. कंपनीच्या व्यवस्थापकाला आज इथे काम करणाऱ्या कर्मचार्यांच्या तक्रारीनंतर मी स्वतः चांगला उपदेश देऊन तातडीने कंपनी बंद करून वर्क फ्रॉम होम या सूचनेचे पालन करण्याची तंबी दिली.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, टेक महिंद्राच्या ऑफिसमध्ये जाऊन ते बंद करा म्हणून सांगणारी ती महिला पोलिस नाही. त्या पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड आहेत. त्यामुळे टेक महिंद्रा कंपनीचे ऑफिस बंद करण्यासाठी पोलिसांना यावे लागले, असा या व्हिडियोसोबत दावा करणे चूक ठरते.

Avatar

Title:टेक महिंद्राचे ऑफिस बंद करण्यासाठी गेलेली ‘ती’ महिला पोलीस नाही. वाचा त्या व्हायरल व्हिडियोचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False