कोरोना विषाणू 12 तासानंतर नष्ट होत नाही. तो व्हायरल मेसेज खोटा आहे

Coronavirus False वैद्यकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेदरम्यान कोणीही घराबाहेर न पडण्याची विनंती या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली होती. परंतु, या घोषणेनंतर अनेकांनी मेसेजद्वारे दावा केला की, कोरोनाचा विषाणू एका जागेवर केवळ 12 तास जगतो आणि त्यामुळे 14 तासांच्या कर्फ्यूनंतर हा विषाणू नष्ट होईल. फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी या दाव्याची सत्यता विचारली. तथ्य पडताळणीमध्ये हा दावा खोटा आढळला.

काय आहे पोस्टमध्ये?

कोरोना विषाणू एका जागेवर साधारण बारा तास जिवंत राहतो. रविवारचा कर्फ्यू 14 तासांचा आहे. म्हणजे कर्फ्यू नंतर या विषाणूची चेन तुटेल आणि आपण सुरक्षित राहू, असा पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. काही उत्साही लोकांनी कर्फ्यूनंतर करून नष्ट झाला असे देखील जाहीर केले.

मूळ पोस्ट येथे पहा – फेसबुक | फेसबुक 

तथ्य पडताळणी

कोरोना विषाणू साधारणपणे किती काळ जिवंत राहतो याची सर्वप्रथम माहिती घेतली. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या संशोधनानुसार, कोरोना व्हायरस पृष्ठभागावर 24 तासांपेक्षा जास्त काळ सक्रीय राहू शकतो. हवेतील तुषारांमध्ये 3 तास, लाकडी पृष्ठावर 24 तास आणि प्लॅस्टिक व स्टेनलेस स्टीलवरती 2-3 दिवसांपर्यंत हा कोरोनाचा विषाणू तग धरू शकतो. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवरदेखील ही माहिती आहे. त्यामुळे वारंवार हात धुणे आणि घरातील वस्तूदेखील जंतुनाशकाने साफ करणे एवढी काळजी घ्यावी, असे WHO ने म्हंटले आहे.

मूळ संशोधन येथे वाचा – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ

याचा अर्थ की विविध पृष्ठभागावर हा विषाणू तीन तास ते तीन दिवस जिवंत राहू शकतो. कोरणा विषाणू संबंधी सदरील मेसेज वायरल झाल्यानंतर भारत सरकार तर्फे देखील हा मेसेज खोटा असल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या पत्र व सूचना कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंट द्वारे यासंबंधी स्पष्टीकरण देण्यात आले. कोरोना विषाणू केवळ 12 तास जिवंत राहतो, या विधानाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणापासून दूर राहावे. 

जनता कर्फ्यू काय आहे?

जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. 22 मार्चला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. कोरणा विषाणूचा प्रसार स्पर्शाद्वारे अधिक होतो. तो रोखण्यासाठी रविवारी एक खबरदारीचा उपाय म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. लोकांची गर्दी जितकी कमी तितका हा विषाणू पसरण्याचा धोका कमी असतो; परंतु जनता कर्फ्यूमुळे विषाणू नष्ट होईल असा दावा करणे चुकीचे ठरेल.

निष्कर्ष

करुणा विषाणू एका जागेवर केवळ 12 तास जिवंत राहतो या विधानाला कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही. संशोधनानुसार हा विषाणू वेगवेगळ्या पृष्ठभागांवर तीन तास ते तीन दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे जनता कर्फ्यू नंतर करणा विषाणू नष्ट होणार नाही. आरोग्य मंत्रालयाने दिलेले खबरदारीचे निर्देश पाळावेत.

Avatar

Title:कोरोना विषाणू 12 तासानंतर नष्ट होत नाही. तो व्हायरल मेसेज खोटा आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False