नरेंद्र मोदींच्या दडपशाहीविरोधात अमेरिकेच्या संसदेत पुरावे सादर करण्यात आले का? वाचा सत्य

False राजकीय | Political

सुधारित नागरिक्तव कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता जगभरात उमटू लागले आहेत. अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर प्रदर्शनांचे फोटो प्रसिद्ध करून बातम्या दिल्या. त्यामुळे जगभरातून याविषयी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमिवर नरेंद्र मोदी गुजरात दंगलीसाठी जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्या दडपशाहीबद्दल भाषण करणाऱ्या एका विदेशी व्यक्तीचा व्हिडियो फिरत आहे. यासह दावा केला जातोय की, अमेरिकेच्या संसदेत मोदींच्या दडपशाहीविरोधात पुरावे सादर करण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

काय आहे पोस्टमध्ये?

सुमारे अडीच मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये हा व्यक्ती मोदींवर भारतात नाझी-स्टाईल दडपशाही आणल्याचा आरोप करतो. त्यासाठी आरएसएस, मास-किलर्स, हिटलर यांचे उदाहरण देतो. व्हिडियोसोबत पोस्टकर्त्याने लिहिले की, उघडा डोळे पहा नीट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हा RSS चा हस्तक असून तो भारतातील लोकशाही मोडीत काढून तेथे हिटलरची नाझी शाही आणू इच्छितो… त्यांचे पुरावे अमेरिकेच्या संसदेत सादर केले… हा तोच व्हीडिओ…

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

हा व्यक्ती कोण आहे आणि तो कुठे बोलत आहे याचा शोध घेतला. व्हिडियोमध्ये #HowdyModi असे लिहिले दिसते. त्यानुसार कीवर्ड्सद्वारे शोधले असता कळाले की, हा व्यक्ती पीटर फ्रेड्रिक आहे. तो कॅलिफोर्निया येथील मुक्त पत्रकार आहे. या व्हिडियोमध्ये तो अमेरिकेतील ह्युस्टन शहराच्या नगरपालिकेमध्ये बोलत आहे.

काय होता विषय?

ह्युस्टन शहरामध्ये 23 सप्टेंबर 2019 रोजी ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम पार पडला होता. यामध्ये नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला अमेरिकेतील काही संघटना व नागरिकांनी विरोध केला होता. पीटर फ्रेड्रिक त्यापैकी एक होते. 

ह्युस्टन शहरात आयोजन होत असल्यामुळे तेथील नगरपालिकेत (HOUSTON CITY COUNCIL) फ्रेड्रिक यांनी या कार्यक्रमाला 17 सप्टेंबर 2019 रोजी विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी हे भाषण केले होते. याचाच अर्थ की, अमेरिकन संसदेत नाही तर, ह्युस्टनच्या नगरपालिकेत भाषण केले होते. फ्रेड्रिकने त्यांच्या फेसबुक व युट्यूब पेजवर हा व्हिडियो शेयर केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकयुट्यूब

आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, नॉर्वेत 77 निष्पाप जणांचा बळी घेणाऱ्या अँडर्स ब्रिविकने आरएसएसच्या कट्टर हिंदुत्वाचे कौतुक केले होते. त्यांच्याकडून जगभरातील कट्टरपंथियांनी शिकले पाहिजे, असे त्याने मॅनिफेस्टोमध्ये म्हटले होते. आरएसएसची स्थपान नाझींच्या प्रेरणेतून झाल्याचे फ्रेड्रिक म्हणतो. 

“अशा या संघाच्या मुशीतून नरेंद्र मोदी तयार झाले आहेत. त्यांच्या सरकारच्या काळात गुजरात दंगलीमध्ये (2002) शेकडो मुस्लिमांचा रक्तपात झाला. याकारणाने त्यांच्यावर अमेरिकेत येण्यास 10 वर्षे बंदी होती. आता ह्युस्टन शहर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. मी तर म्हणतो त्यांना ‘हाऊडी मोदी’ नाही तर ‘आडिओस मोदी’ (गुडबाय मोदी) केले पाहिजे.”

मूळ बातमी येथे वाचा – द टेलिग्राफ

भाषणाच्या शेवटी ते मोदी आणि आरएसएस यांच्या कृत्याबद्दल 50 पानी माहितीपत्र काऊन्सिल सदस्यांना देतात. फ्रेड्रिक यांच्या या भाषणाची दखल भारतातील मीडियानेसुद्धा घेतली होती. ‘द टेलिग्राफ’ वेबसाईटवर याची बातमी प्रसिद्ध झाली होती. 

सिटी काऊन्सिलमध्ये सामान्य नागरिक बोलू शकते?

अमेरिकेत सिटी काऊन्सिलमध्ये सामान्य नागरिकांनादेखील बोलण्याची मुभा असते. ह्युस्टन सिटी काऊन्सिलच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, दर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत सामान्य नागरिक आधी वेळ घेऊन आपले म्हणने व्यक्त करू शकते. प्रत्येकाला बोलण्यासाठी तीन मिनिटांचा अवधी दिला जातो. 

मूळ वेबसाईटला भेट द्या – ह्युस्टन सिटी काऊन्सिल

कोण आहे पीटर फ्रेड्रिक?

पीटर फ्रेड्रिक कॅलिफोर्निया येथील मुक्त पत्रकार आहे. दक्षिण आशियाविषयी ते विविध प्रकासनांसाठी लिहित असतात. त्यांच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी भारत व या भागाविषयी अभ्यास केला. ते आरएसएस व महात्मा गांधी दोहोंचे विरोधक आहेत. त्यांनी Gandhi: Racist or Revolutionary and Captivating the Simple-Hearted हे पुस्तकदेखील लिहिले आहे.

निष्कर्ष

पीटर फ्रेड्रिक हे निवडूण आलेले प्रतिनिधी नाहीत. सामान्य नागरिक म्हणून वैयक्तिक पातळीवर त्यांनी ह्युस्टन सिटी काऊन्सिलमध्ये मोदींच्या कार्यक्रमाचा विरोध केला होता. ही काही संसदीय कार्यवाही नव्हती. ते केवळ आपले मत व्यक्त करीत होते. जे सिटी काऊन्सिलने ऐकून घेतले. त्यामुळे अमेरिकन संसदेत मोदींच्या दडपशाहीविरोधात पुरावे सादर करण्यात आले असा दावा चुकीचा ठरतो.

Avatar

Title:नरेंद्र मोदींच्या दडपशाहीविरोधात अमेरिकेच्या संसदेत पुरावे सादर करण्यात आले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False