‘घर से निकलते ही’ गाणारे नौदलातील गिरीश लुथरा आहेत. ते आगामी लष्करप्रमुख मनोज नरवणे नाहीत. वाचा सत्य

False सामाजिक

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे लवकरच लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. या पार्श्वभूमिवर एक सैन्यअधिकाऱ्याचा लोकप्रिय हिंदी गीत गातानाचा व्हिडियो पसरविला जात आहे. त्यासोबत दावा केला जातोय की, हे सैन्यअधिकारी म्हणजे आगामी लष्करप्रमुख मनोज नरवणे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

चार मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक सैन्यअधिकारी “घर से निकलते ही” हे लोकप्रिय गीत गात आहे. समोर प्रेक्षकांमध्येसुद्धा सैन्यअधिकारी बसलेले आहेत. पोस्टकर्त्याने लिहिले की, “आपल्या देशाचे नवीन लष्कर प्रमुख श्री. नरवणे सरांनी गायलेले गाणे ऐका, थक्क व्हाल!” फॅक्ट चेक करेपर्यंत हा व्हिडियो 2100 वेळा शेयर तर त्याला 25 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळालेल्या आहेत.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हिडियोमधील अधिकाऱ्याने पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म परिधान केलेला आहे. मनोज नरावणे हे लष्करामध्ये अधिकारी आहेत. लष्कराच्या युनिफॉर्मचा रंग वेगळा असतो. त्यामुळे व्हिडियोची सत्यता शंकास्पद वाटते. इंटरनेटवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च आणि कीवर्ड्सद्वारे शोध घेतल्यावर कळाले की, व्हिडियोमध्ये गाणारे अधिकारी नौदलातील निवृत्त वाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा आहेत. वेस्टर्न नेव्हल कमांडच्या 50 व्या स्थापनादिनाच्या सोहळ्यात त्यांनी हे गीत परफॉर्म केले होते.

गिरीश लुथरा यांनी स्वतः हा व्हिडियो त्यांच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. व्हिडियोच्या सुरूवातीलाच सूत्रसंचालक गिरीश लुथरा यांचे नाव पुकारतो. आतापर्यंत 22 लाखांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडियो पाहिला गेला आहे.

गिरीश लुथरा यांनी 1979 साली नौदलात प्रवेश केला होता. मे 2016 साली ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख झाले. 31 जानेवारी 2019 रोजी ते नौदलातून निवृत्त झाले. डिसेंबर 2018 मध्ये कमांडच्या गोल्डन ज्युबली सोहळ्यात त्यांनी हे गीत गायिले होते. इंटरनेटवर या व्हिडियोला खूप प्रेम मिळाले. उद्योगपती हर्ष गोएंका यांनीसुद्धा ट्विट करून हा व्हिडियो शेयर केला होता. मीडियानेसुद्धा त्यावर बातम्या केल्या. दैनिक भास्करच्या वेबसाईटवरदेखील तशी बातमी आढळली.

मूळ बातमी येथे वाचा – दैनिक भास्कर

हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर ‘द क्विंट’ने लुथरा यांची मुलाखत घेतली होती. यामध्ये त्यांनी करियरविषयी, गाण्याच्या आवडीविषयी आणि देशात सुरू असलेल्या परिस्थितीविषयी त्यांना काय वाटते हे सांगितले आहे. भारतीय नागरिकांनी माहितीपूर्वक भूमिका निवडावी आणि देशात शांतात कशी कायम राहिल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणातात.

मग मनोज नरवणे कोण आहेत?

पुणे येथील ज्ञानप्रबोधीनी येथून श्री नरवणे यांचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांचे वडील हवाईदलात अधिकारी होते. 1980 मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या सातव्या बटालियनमधून त्यांचा लष्करप्रवेश झाला. त्यांची कारकीर्द गौरवास्पद ठरली आहे. त्यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. नरवणे हे देशाचे 28 वे लष्कर प्रमुख असतील. अधिक सविस्तर येथे वाचा – लोकसत्ता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, व्हायरल व्हिडियोमध्ये ‘घर से निकलते ही’ गाणे गाणारे अधिकारी आगामी लष्करप्रमुख मनोज नरवणे नाहीत. हा व्हिडियो नौदलातील निवृत्त वाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांचा आहे. वेस्टर्न नेव्हल कमांडच्या 50 व्या स्थापनादिनाच्या सोहळ्यात गेल्या वर्षी त्यांनी हे गीत परफॉर्म केले होते.

Avatar

Title:‘घर से निकलते ही’ गाणारे नौदलातील गिरीश लुथरा आहेत. ते आगामी लष्करप्रमुख मनोज नरवणे नाहीत. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False