मंदिरावर मोर बसल्याचा व्हिडियो औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिराचा नाही; वाचा सत्य

False सामाजिक

गेल्या काही दिवसांपासून मंदिराच्या शिखरावर मोर बसल्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. हा व्हिडियो औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिराचा असल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता हा व्हिडियो औरंगाबादचा नसल्याचे समोर आले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

तीस सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये एक मोर पक्षी उडत उडत मंदिराच्या शिखरावरील ध्वजखांबावर जाऊन बसतो. सोबतच्या पोस्ट आणि मेसेजमध्ये लिहिलेले आहे की, संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील खडकेश्वर मंदिरावर बसलेला मोर बघा…

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह  । युट्यूब

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर की-वर्ड्स आणि रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोध घेतला असता हा व्हिडियो विविध शहरांच्या नावे फिरत असल्याचे लक्षात आले. कोणी हा व्हिडियो गुजरातमधील म्हणत आहे तर कोणी ऋषीकेशचा सांगत आहे.

15 जुलै रोजी म्हणजे औरंगाबादच्या नावे व्हायरल होण्यापूर्वी हा व्हिडियो गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील भाभर तीर्थ येथील असल्याचा म्हणून शेयर झाला होता. तेथील श्री मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिरावर हा मोर बसल्याचे एका ट्विटमध्ये म्हटले होते. (परंतु, हा व्हिडियो तेथील आहे याची पुष्टी झालेली नाही.)

अर्काइव्ह

त्यामुळे हा व्हिडियो औरंगाबादचा आहे की नाही याबाबत शंका घेण्यास वाव आहे. खडकेश्वर मंदिराचा फोटो आपण खाली पाहू शकता. व्हायरल व्हिडियोतील मंदिर आणि खडकेश्वर मंदिराची रचना यांमध्ये फरक असल्याचे लगेच लक्षात येते.

खडकेश्वर मंदिराचा ध्वजखांब शिखरापेक्षा कमी उंचीचा आहे, तर मोराच्या व्हिडियोतील खांब शिखरापेक्षा उंच आहे. तसेच खडकेश्वर मंदिरावरील ध्वज भगव्या रंगाची पताका आहे. व्हायरल व्हिडियोतील ध्वज लांब आणि विविध रंगांचा आहे. 

खाली दिलेल्या तुलनेत याबाबी लगेच स्पष्ट होतात. 

यावरून हे तर स्पष्ट होते की, हा व्हिडियो औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिराचा नाही. 

मग हा व्हिडियो कुठला आहे?

हा व्हिडियो नेमका कोणत्या शहरातील आहे, हे समोर आलेले नाही. परंतु, व्हिडियोच्या बारकाई अभ्यासाअंती आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहचलो आहोत की, हे जैन मंदिर आहे.

उदाहरणार्थ, व्हिडियोतील मंदिरावरील कळस आणि ध्वज हे जैन मंदिराकडे निर्देशित करतात.

निष्कर्ष

मंदिराच्या ध्वजखांबावर मोर बसल्याचा व्हिडियो औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिराचा नाही. हा व्हिडियो एखाद्या जैन मंदिराचा आहे.

Avatar

Title:मंदिरावर मोर बसल्याचा व्हिडियो औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिराचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False