FAKE : चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक (1098) उरलेले अन्न गोळा करण्यासाठी नाही

False राष्ट्रीय

लग्नसमारंभातील उरलेले अन्न फेकून देण्याऐवजी ते गरजूंना वाटण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर (1098) संपर्क साधण्याचे आवाहन करणारा मेसेज व्हायरल होत आहे. अधिकचे अन्न वाया जाण्याऐवजी ते गोरगरीबांना मिळावे या हेतूने प्रंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही सेवा सुरू केल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की सगळीकडे फिरणारा हा मेसेज चुकीचा आहे. सदरील हेल्पलाईन क्रमांक उरलेले अन्न गोळा करण्यासाठी सुरू करण्यात आलेला नाही.

काय आहे दावा?

व्हायरल मेसेजमध्ये म्हटले की, “भारतात आनंदाची बातमी: पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे- तुमच्या घरी एखादा कार्यक्रम/पार्टी असेल आणि जेव्हा तुम्हाला दिसले की बरेच अन्न वाया जात आहे, तर कृपया 1098 (केवळ भारतात कुठेही) कॉल करण्यास अजिबात संकोच करू नका – चाइल्ड हेल्प लाइन .ते येऊन अन्न गोळा करतील…कृपया हा संदेश प्रसारित करा ज्यामुळे अनेक मुलांना खायला मदत होईल. कृपया ही साखळी तोडू नका. प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा मदतीचे हात चांगले आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम 1098 हा क्रमांक नेमका काय आहे याचा शोध घेतला. त्यातून कळाले की, ‘चाईल्डलाईन’ हा केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अठरा वर्षांखालील मुला-मुलींकरिता कार्यरत असणारी मोफत सेवा आहे. व्यसनमुक्ती, बालमजुरी, बालविवाह, बाल भिक्षेकरी, लैंगिक शोषण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ही ‘चाईल्डलाईन’ मदतीसाठी कार्य करते. ती मदत मिळवण्यासाठी 1098 या क्रमांकावर संपर्क साधता येतो.

चाईल्डलाईन वेबसाईटवर कुठेही उरलेले अन्न घेऊन जाण्याचे काम ते करतात असे म्हटलेले नाही. वेबसाईटवरील माहितीनुसार, कोणालाही जर लहान मुले अडचणीत आढळले, तर त्वरित 1098 क्रमांकावर त्यांची माहिती द्यावी. ‘चाईल्डलाईन’ची टीम एका तासाच्या आत त्या मुलांपर्यंत पोहचेल आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेईल. 

‘चाईल्डलाईन’च्या ट्विटर अकाउंटवरून सदरील व्हायरल मेसेजबाबत खुलासा करण्यात आलेला आहे. अगदी 2010 सालीच चाईल्डलाईनने या मेसेजला खोटे म्हटलेले आहे. 

“खोट्या माहितीसह आमचा हेल्पलाईन क्रमांक फिरवला जात आहे. ‘चाईल्डलाईन’ द्वारे उरलेले अन्न गोळा केले जात नाही. अशा खोट्या माहितीमुळे आमची हेल्पलाईन सतत बिझी राहत आहे. त्यामुळे गरजू मुलांना मदत मिळण्यास विलंब अथवा अडचणी येऊ शकते. त्यामुळे असे मेसेज फॉरवर्ड करणे टाळावे, असे आवाहन ‘चाईल्डलाईन’तर्फे करण्यात आले होते.

याचा अर्थ गेल्या अनेक वर्षांपासून हा चुकीचा मेसेज फिरत आहे. अहमदाबाद मिररने 2017 साली या मेसेजचे खंडन करणारी बातमी केली होती. डेक्कन क्रोनिकल्सनेसुद्धा तेलंगणामध्ये या फेक मेसेजचा सुळसुळाट झाल्याची बातमी 2018 मध्ये प्रकाशित केली होती.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते, की चाईल्डलाईन हेल्पलाईन क्रमांचे काम उरलेले अन्न गोळा करण्याचे नाही. ही हेल्पलाईन लहान मुलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेली आहे.(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:FAKE : चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक (1098) उरलेले अन्न गोळा करण्यासाठी नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


Leave a Reply