तथ्य पडताळणीः भारतीय सैन्याने खरंच भाजपला चेतावणी दिली आहे का?

False राजकीय राष्ट्रीय

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथील जैश-ए-मुहंमदचे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर तापलेल्या राजकीय वातावरणात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यानुसार, भारतीय सेनेने सत्ताधारी पक्ष भाजपला चेतावणी देत सेनेच्या नावावरून राजकारण केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली आहे.

कोकणी मित्रमंडळ या फेसबुक पेजवरून वरील ही पोस्ट एक मार्च रोजी अपलोड करण्यात आली होती. त्यासह इतर पेजेसवरूनही अशा पोस्ट शेयर करण्यात आल्या आहेत.

तथ्य पडताळणी

कोकणी मित्रमंडळच्या पोस्टमध्ये खालील फोटो शेयर करून लिहिले आहे की – आजपर्यंत भारताच्या इतिहासात कधीच भारतीय सेनेकडून कोणत्या राजकीय पक्षाला अशी चेतावणी दिली नाही. पण आता भाजपला चेतावणी दिली याचा अर्थ भारतीय सेनेला देखील भाजपचे राजकारण समजले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने मग वरील फोटोमध्ये दिलेली लिंक शोधली. त्यासाठी गुगलवर – बहुत हो चूका ढिंढोरा – असे सर्च केले. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केलेल्या एका ट्विटची लिंक मिळाली. ते ट्विट तुम्ही खाली पाहू शकता.

दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट 9 ऑक्टोबर 2016 रोजी केले होते. यामध्ये शेयर केलेली लिंक आणि सोशल कोकणी मित्रमंडळने शेयर केलेल्या फोटोतील लिंक सारखीच आहे.

ट्विटमधील लिंकवर क्लिक केल असता हे पेज आणि वेबसाईट बंद असल्याचे आढळले.

फॅक्ट क्रेसेंडोने मग द इंटरनेट अर्काइव्ह या संग्रहण स्थळावर सदरील लिंकचा शोध घेतला. त्यानुसार खालील पेज आढळले.

द पॉलिटिकिल फंडा नावाच्या वेबसाईटवर 9 ऑक्टोबर 2016 रोजी हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. दीपक झा नामक एका व्यक्तीने तो लिहिला असून, उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेण्यासाठी सुरू झालेल्या राजकीय वादावर टीका करण्यात आली आहे.

संपूर्ण लेख वाचल्यावर लक्षात येते की, सदरील लेखात हा भारतीय सेनाप्रमुखांनी सत्ताधारी सरकारवर टीका किंवा चेतावणी दिलेली नाही. दीपक झा नामक लेखकाचा तो लेख आहे.

मूळ संपूर्ण लेख तुम्ही येथे वाचू शकता – द पॉलिटिकल फंडा

सदरली लेखात असणारा फोटो लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांचा आहे. 29 सप्टेंबर 2016 रोजी पत्रकार परिषदेत सर्जिकल स्ट्राईकची माहिती देते वेळीचा हा फोटो आहे. खाली या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडियो पाहू शकता. तसेच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर यासंबंधीचे ट्रान्सस्क्रीप्ट वाचू शकता.

सध्याचे भारतीय सेनाप्रमुख जनरल बिपीन रावत आहेत.

निष्कर्ष

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे सिद्ध होते की, ज्या लिंकचा आधार घेऊन भारतीय सैन्याने भाजपला चेतावणी दिल्याचे म्हटले जात आहे, ती लिंक मूळात दोन वर्षांपूर्वीची असून त्यामध्ये भारतीय सेनेने अशी काही चेतावणी दिलेली नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे. तसेच हा लेख आणि वेबसाईट दोन्ही बंद आहेत.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः भारतीय सेनेने खरंच भाजपला चेतावणी दिली आहे का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False